वीज अंगावर पडू नये
यासाठी बचावाच्या उपाययोजना
नांदेड दि. 22 :- दरवर्षी जगात विजा पडून होणाऱ्या
मृत्युंचे प्रमाण खपूच जास्त आहे. नांदेड जिल्हयात वारंवार विजा पडून
मोठया प्रमाणावर वित्त आणि जीवीतहानी झालेली आहे.
याबाबत सखोल संशोधन करण्यासाठी भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पृथ्वी विज्ञान विभाग भारत
सरकार, पुणे येथील दोन वरीष्ठ शास्त्रज्ञांनी नांदेड
जिल्हयातील वीज प्रवण गावांना भेटी दिल्या होत्या. त्यांचा संशोधनाचा अहवाल
जिल्हा प्रशासनास पाठविलेला होता.
त्यांच्याद्वारे स्थापित करण्यात आलेल्या
विजपात पूर्वसूचना Lightning Information & Predicition
System (LIPS) देणारी यंत्रणा व त्याचे सेंसर स्थापित करण्यात
आले आहेत. एखादया ठिकाणी विजांचा कडकडाट होत असेल तर ही प्रक्रिया आजुबाजुला पसरते
आणि ही यंत्रणा 200 कि.मी.
परिक्षेत्रात याची पूर्व सूचना देते. त्यामुळे खबरदारी म्हणून
तेथील यंत्रणेला दूरध्वनी, मोबाईल आणि व्हॉटस्अप प्रणालीवर संदेश प्रसारीत करुन
जास्तीत जास्त एक ते दीड तास आधी याची पूर्वसूचना देवून संभावीत धोका आणि होणारी
वित्त व जीवीतहानी टाळता येणे शक्य होते. हे संदेश आपल्याव्दारे
सुद्धा पुढे प्रसारीत होणे आवश्यक आहे.
मान्सून सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर
अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्या काळात विजा कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. पाऊस पडण्याच्या आधी
साधारणत: दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आकाशात अचानक ढग जमतात आणि
काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात व मोठया आवाजासह कुठेतरी पडतात. याच
कालावधीत शिवारात खरिपाची तयारी सुरु असते. त्यामुळे शेतात काम करीत असलेल्या
शेतक-यांचा, मजुरांचा आणि जनावरांच्या अंगावर विजा पडून मृत्यू
झाल्याच्या घटना नियमितपणे घडतात. उंच झाड हे कोसळणाऱ्या
विजेला आकर्षित करतात त्यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्याही परिस्थितीत घेवू नये. याबाबत तहसीलस्तरावर वेळोवेळी
घेण्यात येणा-या तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, सरपंच, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षण, वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदींना विजेबाबत माहिती दिल्यास व
सूचना फलकावरही माहिती डकविल्यास मोठया प्रमाणावर जनजागृती होते.
विजापासून सुरक्षित राहण्यासाठी सूचविण्यात
येत असलेल्या उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत. कोसळणारी वीज ही उंच वस्तूवर, ठिकाणावर कोसळते
आणि धातूच्या वस्तूवर जास्त आकर्षित होते.
हे टाळा :- एकटे उभे असलेले मोठे झाड आणि टेकडी किंवा
डोंगराचा माथा येथे विजा चमकत असताना आश्रय घेणे टाळावे. सगळयात जास्त धोका झाडाखाली
थांबल्यामुळे उद्भवतो ज्यांच्या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्या असतात. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे
समुह विजेला आकर्षित करतात. झाडाच्या जवळ किंवा खाली उभे राहिल्यामुळे
मनुष्याला अशा प्रकारे ईजा होण्याची, दगावण्याची शक्यता असते. धातुंच्या वस्तू
जसे छत्री, चाकु, गोल्फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर
का शरीराच्या वरच्या बाजुला असल्यास
विजा चमकत असताना दूर ठेवाव्यात.
अचानक होणा-या वीज वादळापासून स्वत:चा बचाव
करण्यासाठी पुढील सूचना पाळाव्यात. तात्काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्ही पाय
गुडघ्याजवळ घेउन त्यांना दोन्ही हातानी आवळुण ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या
गुडघ्यांवर टेकवावी.
विजा चमकत असताना किंवा वादळी परिस्थिती
निर्माण झाल्यास काय करावे व काय करु नये - विद्युत सुवाहक असणा-या वस्तुंपासुन
दूर राहावे. यात आगीचे स्थान, वाहनाचे रेडीएटर्स, स्टोव्ह,
धातुचे पाइप, धातुचे वाँश बेसीन, मोबाइल फोन इत्यादी. विजा चमकत असताना विद्युत प्लगमध्ये
कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक वस्तूची जोडणी देण्यात येवू नये. जसे
हेयरडायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर. जर वीज आपल्या
घरावर कोसळली तर त्यातील प्रभार प्लगच्या माध्यमातून विद्युत प्लगमध्ये येवू
शकते. विजा चमकत असताना मोबाईल,
इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्ही, दुरध्वनी यांचा वापर करु नये, वीज यामुळे
आकर्षित होवू शकते. चारचाकी
वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा कडाडत
असताना त्यातुन बाहेर येवू नये.
धातुंच्या वस्तू विजा चमकत असताना त्या घेवून
बाहेर जावू नये. जसे
छत्री, धातुंची भांडी इत्यादी. पाण्यात असल्यास त्वरीत
बाहेर यावे. यात जर का होडी किंवा नाव असल्यास त्यातून
लवकर बाहेर पडावे. विजा चमकत असताना जर आपण बाहेर आहात तर त्वरीत
सुरक्षित आसरा घ्यावा. इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत
उपलब्ध नसल्यास गुफा, कपार हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत
आश्रय उपलब्ध झालेच नाही तर उंचीच्या वस्तुंखाली आश्रय घेवू नका. जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनिला टेकून
बसा. उंचझाड वीजपाताला आकर्षित
करतात. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्यास
अंगावरील केस उभे राहतात किंवा त्वचेला मुंग्या, झिणझिण्या आल्यासारखे वाटते. तेंव्हा समजून घ्यावे की, वीज आपल्यावर
पडणार आहे यावेळी त्वरीत आपल्याला जमिनीवर बसलेल्या मुद्रेत जावे. या विविध उपाययोजनांमुळे वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण कमी
करण्यासाठी मदत होईल व वादळी विजांपासून आपला जीव वाचू शकेल, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
00000