Friday, August 7, 2020

सुधारीत वृत्त

गणेशोत्सवात स्वयंशिस्तीला देवू अधिक प्राधान्य 

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  आध्यात्मिक उत्साहाला प्रतिबिंबीत करणारा उत्सव म्हणून गणेशोत्वाकडे आपण पाहत जरी असलो, तरी यावर्षी कोविड -19 या संसर्गजन्य प्रादुर्भावामुळे यावर्षी प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्तीला अधिक प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश मंडळ पुर्वनियोजन आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.  

 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे जबाबदार वर्तन अपेक्षित आहे. सार्वजनिक पातळीवर लोकसहभागातून लोकांच्या इच्छेनुसार जी कांही वर्गणी गोळा होईल त्यातील वर्गणीचा कांही भाग हा वैद्यकीय उपकरणांसाठी रुग्णालयांना दिल्यास ती खऱ्या अर्थाने विवेकाचे प्रतिक ठरेल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत साधेपणावर भर देवून शासनाने आखून दिलेल्या नियम व अटीच्या चौकटीत हा उत्सव साजरा करतील असा विश्वासही  त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी या गणेशोत्वासाठी खालील अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत.

 सार्वजनिक गणेश मंडळे

·      सार्वजनिक गणेश मंडळांना प्रतीवर्षी प्रमाणे स्‍थानिक प्रशासनाची पुर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहिल. (महानगरपालिका, पोलिस प्रशासन)

·      मोठे मंडप टाळुन मर्यादित स्‍वरुपाचे मंडप उभारावेत. श्री गणेशाची मूर्ती 4 फुट उंचीच्‍या मर्यादेतच असावी.

·      सजावट साधी असावी त्‍यात भपकेबाजी नसावी. तसेच बंदी असलेले प्‍लास्‍टीक व थर्माकोलचा वापर करु नये

·      आरोग्‍य विषयक व सामाजिक हिताच्‍या जाहिराती प्रदर्शित करण्‍यास पसंती द्यावी.

·      उत्‍सवाकरीता वर्गणी / देणगी स्‍वच्‍छेने दिल्‍यास स्विकार करावा.

·      सांस्‍कृतीक कार्यक्रमाऐवजी आरोग्‍यविषयक उपक्रम उदा. रक्‍तदान शिबिरे, कोरोना, डेंग्‍यु, मलेरिया इ. आजार व त्‍यांचे प्रतिबंधात्‍मक उपाय तसेच स्‍वच्‍छतेबाबत जनजागृती करण्‍यात यावी.

·      आरती, भजन, किर्तन वा अन्‍य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्‍यावी. तसेच ध्‍वनी प्रदुषणासंबंधिचे नियमांचे पालन करावे.

·      श्री गणेशाच्‍या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबलनेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इ. व्‍दारे उपलब्‍ध करुन देण्‍यावर भर दयावा.

·      मंडपामध्‍ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्‍क्रीनिंगची पर्याप्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.

·      दर्शनार्थी भाविक मास्‍क, सॅनिटायझर वापरतील तसेच पुरेसे शारीरिक अंतर राखतील यावर विशेष लक्ष दयावे.

·      श्रीं चे आगमन व विसर्जनाच्‍या मिरवणुका काढण्‍यास शासनाची परवानगी नाही.

·      विसर्जन स्‍थळी होणारी आरती मंडपातच करुन विसर्जन स्‍थळी कमीत कमी वेळ थांबावे. शक्‍य झाल्‍यास यावर्षी श्रींच्‍या मूर्तींचे विसर्जन न करता पुढील वर्षी करावे. लहान मुले व ज्‍येष्‍ठ नागरीकांनी विसर्जन स्‍थळी जाणे टाळावे.

·      मंडळांनी प्रतिवर्षी वापरता येतील अशा धातुच्‍या मूर्ती वापरण्‍यावर भर दयावा.

·      सांस्‍कृतिक कार्यक्रमांना गर्दी होते त्‍यामुळे कोव्‍हीड-19 साथरोगाचा प्रसार होण्‍यास मदत होते त्‍यामुळे असे कार्यक्रम टाळून वाचणा-या निधीतुन कोव्‍हीड-19 प्रति‍बंधासाठी (व्‍हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर, बेड्स) इ. वस्‍तु स्‍वरुपात महानगरपालिका / शासकीय रुग्‍णालयास दयावे.

·      मंडळांनी त्‍यांचे परिसरातील खुल्‍या जागांवर मियावाकी पदधतीने घनवन निर्मीती करण्‍यासाठी वृक्षारोपण करावे.

·      चालु वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता सार्वजनिक मंडळांनी यावर्षी उत्‍सव शक्‍यतो टाळावा अथवा एक गाव एक गणपती किंवा चार पाच शेजारच्‍या कॉलनी/नगरे यांनी मिळुन एके ठिकाणी गणेश उत्‍सव साजरा करावा.

·      मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्‍यात येतील त्‍यांचा वापर करावा.

घरगुती गणेशोत्‍सव

·      घरगुती श्री गणेशाची मूर्ती  2 फुट उंचीच्‍या मर्यादेतच असावी.

·      शक्‍यतो धातु अथवा संगमरवर अशा मुर्तींचे पुजन करावे.

·      मूर्ती शाडु मातीची पर्यावरण पुरक असल्‍यास तिचे विसर्जन घरच्‍या घरी करावे.

·      ते शक्‍य नसल्‍यास महानगरपालिकेतर्फे झोन निहाय निर्माण केल्‍या जाणा-या ‘मूर्ती स्विकार केंद्रांवर’ मूर्ती नेऊन देण्‍यात यावी.  त्‍यांचे विसर्जन महानगरपालिका व सेवाभावी संस्‍थेमार्फत करण्‍यात येईल.

·      मूर्ती खरेदी करीता होणा-या गर्दी मुळे कोव्‍हीड-19 साथरोगाचा प्रसार होण्‍यास मदत होते हे लक्षात घेता योग्‍य शारिरीक अंतर राखुन खरेदी करावी.

·      या वर्षी हरीत गणेश संकल्पनेवर भर द्यावा. घरच्‍या घरी पर्यावरण पुरक मूर्ती बनवून पूजन करावे. यातुन  पालकांच्‍या व मुलांच्‍या  कलात्‍मकतेला देखिल वाव मिळेल.

·      अशा प्रकारे ‘मूर्ती स्विकार केंद्रात’ मूर्ती आणून देणा-या नागरीकांना जिल्‍हाधिकारी, पोलीस अधिक्षक व महानगरपालिका आयुक्‍त यांच्‍या स्‍वाक्षरीने ‘पर्यावरण मित्र’ प्रमाणपत्र दिले जाईल.

·      विसर्जन स्‍थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्‍थळी कमीत कमी वेळ थांबावे.

·      मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्‍यात येतील त्‍यांचा वापर करावा.

000000

 

विशेष वृत्त क्र. 738

                                             सोयाबिन,मुग,उडीदच शेतकऱ्यांना देईल संजिवनी

खरीप पिकांचे उत्पन्न विक्रमी मार्गावर

नांदेड (जिमाका) दि. 7  :- गत दहा वर्षात खरीप पिकांसाठी वेळेवर आवश्यक असलेला असा मोजका पाऊस कधी झाला नाही. जिल्ह्यातील मुग, उडीद, सोयाबिन, कापूस आदि खरिपातील पिकांना वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यामुळे पिके शेतात डौलाने डुलत आहेत. निसर्गाने अजून दोन आठवडे साथ दिल्यास मुग, सोयाबिन आणि उडीद या पिकांचे विक्रमी उत्पादन जिल्हाभरात होईल, अशा विश्वास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी व्यक्त केला. या पिकांसाठी आठवडाभरात दोन पाऊस झाले तरी पुरेसे ठरतील असे त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्ह्यातील 16 तालुक्यात एकुण 7 लाख 42 हजार 861 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून या क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजेच 7 लाख 55 हजार 18 हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीप हंगामात पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 101.64 एवढी झाली. जिल्ह्यात सर्वात जास्त देगलूर तालुक्यात सर्वसाधारण खरीप पिकाच्या क्षेत्रापेक्षा 15.39 टक्क्यांनी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. या खरीप हंगामात जिल्ह्यात 920 हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी, ज्वारी 31 हजार 481, बाजरी 21, मका 691 असे एकुण तृणधान्य 33 हजार 113 हेक्टरवर लागवडी खाली आहे. तर तूर 72 हजार 510, मुग 25 हजार 859, उडीद पिकाची 26 हजार 942 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकुण कडधान्य हे 1 लाख 25 हजार 311 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. याची वार्षिक सरासरी 107.61 टक्के एवढी आहे. तीळ 455 हेक्टर, कारळ 282 हेक्टर, सोयाबिन 3 लाख 81 हजार 373 हेक्टर, इतर गळीत धान्य 74 हेक्टर क्षेत्रावर पेरणीखाली आहे.

 

कापसात मुग, उडिदाचे अंतरपिक झाले फायदाचे - ज्ञानेश्वर चपाट

ज्या सोयाबिनने सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तेच सोयाबिन आता कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. निसर्गाची वेळेवर कृपा आजवर खरीप पिकांना मिळाल्यामुळे सर्वच पिके आता दाटून उभी आहेत. माझ्यासारख्या काही शेतकऱ्यांनी कापसात अंतरपिक म्हणून 70 दिवसात येणारे मुग व उडिदाचे पिक घेऊन बघितले आहे. या अंतरपिकामुळे एरवी कापसात वाढणाऱ्या तणाला चांगला अटकाव बसला असून निंदणीचा खर्च वाचण्याबरोबर उडीद, मुगाच्या पिकातून दोन अधिकचे पैसे आता आमच्या हाती पडतील असा विश्वास शेतकरी चपाट यांनी बोलून दाखविला.

 

बिबिएफ पद्धतीच्या पेरणीने सोयाबिनला तारले - रंगनाथ लोकेवार

सोयाबिन पिकासंदर्भात पेरणीच्या काळात काही मोजक्या शेतकऱ्यांना वेगळा अनुभव जरी आला असला तरी आमच्या या ढोकी शिवारात इथल्या पेरणीच्या पद्धतीमुळे आम्हाला तारल्याची भावना ढोकीचे शेतकरी रंगनाथ लोकेवार यांनी बोलून दाखविली. बिबिएफ (रुंद सरीवरंबा) पद्धतीने सोयाबिनची लागवड करण्याचा सल्ला आम्हाला आमचे कृषि अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिला. त्यानुसार ही लागवड झाल्यामुळे सोयाबिनचे हे पिक हेक्टरी 25 क्विंटल पर्यंत उत्पन्न देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील अनेक वर्षात खरीपाचे असे पिक पाहिल्याचे आठवत नाही, असे त्यांनी सांगितले.   

000000





108 व्यक्तींना आज कोरोनातून बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी

जिल्ह्यात 182 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू 

 नांदेड (जिमाका) दि. 7 :-  जिल्ह्यात आज  7 ऑगस्ट रोजी सायं. 6  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 108  व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 182 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण  1 हजार 459 अहवालापैकी 1 हजार 234 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 3 हजार 42 एवढी झाली असून यातील 1 हजार 323 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 590 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 85 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

 गुरुवार 6 ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यातील तामसा येथील 75 वर्षाचा एक पुरुष, भावसार चौक नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील कांझी मोहल्ला येथील 42 वर्षाची महिला, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर मोमीन गल्ली मुखेड येथील 86 वर्षाचा एक पुरुष मुखेड कोविड केअर सेंटर येथे,  एसव्हीएम कॉलनी 52 वर्षाची एक महिला गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे  उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 114 एवढी झाली आहे.   

आज बरे झालेल्या 108 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 6, हदगाव कोविड केअर सेंटर 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल 6, देगलूर कोविड केअर सेंटर 11, मुंबई येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 25, मुखेड कोविड सेंटर 25, गोकुंदा कोविड केअर सेंटर 2, अर्धापूर कोविड केअर सेंटर 1, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 15, औरंगाबाद येथील संदर्भित 2 असे एकूण 108 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र 19, अर्धापूर तालुक्यात 5,बिलोली तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 7, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 4, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 7, किनवट तालुक्यात 6, मुखेड तालुक्यात 13, उमरी तालुक्यात 1, परभणी 1, असे एकूण 80 बाधित आढळले. 

अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 38, अर्धापूर तालुक्यात 5, बारड 3, बिलोली तालुक्यात  1, धर्माबाद तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 6 , मुखेड तालुक्यात 3, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 6, मुदखेड तालुक्यात 5, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 21 असे एकूण 102 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 590 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 152, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 596, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 98, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 36, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 121, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 93, लोहा कोविड केअर सेंटर येथे 15, हदगाव कोविड केअर सेंटर 60, भोकर कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 14, कंधार कोविड केअर सेंटर येथे 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 30, किनवट कोविड केअर सेंटर येथे 35, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 22, मुदखेड कोविड केअर सेटर 17, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 10, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 28, बारड कोविड केअर सेंटर 5, महसूल भवन कोविड केअर सेंटर 47, खाजगी रुग्णालयात 118, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 1 तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

 

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 753,

घेतलेले स्वॅब- 20 हजार 76,

निगेटिव्ह स्वॅब- 15 हजार 554,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 182,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 42,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 18,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,

मृत्यू संख्या- 114,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 323,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 590,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 100. 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 85

 प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


विशेष वृत्त क्र. 738

सोयाबिन,मुग,उडीदच शेतकऱ्यांना देईल संजिवनी

खरीप पिकांचे उत्पन्न विक्रमी मार्गावर

नांदेड (जिमाका) दि. 7  :- गत दहा वर्षात खरीप पिकांसाठी वेळेवर आवश्यक असलेला असा मोजका पाऊस कधी झाला नाही. जिल्ह्यातील मुग, उडीद, सोयाबिन, कापूस आदि खरिपातील पिकांना वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यामुळे पिके शेतात डौलाने डुलत आहेत. निसर्गाने अजून दोन आठवडे साथ दिल्यास मुग, सोयाबिन आणि उडीद या पिकांचे विक्रमी उत्पादन जिल्हाभरात होईल, अशा विश्वास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी व्यक्त केला. या पिकांसाठी आठवडाभरात दोन पाऊस झाले तरी पुरेसे ठरतील असे त्यांनी स्पष्ट केले.

 

जिल्ह्यातील 16 तालुक्यात एकुण 7 लाख 42 हजार 861 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून या क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजेच 7 लाख 55 हजार 18 हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीप हंगामात पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 101.64 एवढी झाली. जिल्ह्यात सर्वात जास्त देगलूर तालुक्यात सर्वसाधारण खरीप पिकाच्या क्षेत्रापेक्षा 15.39 टक्क्यांनी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. या खरीप हंगामात जिल्ह्यात 920 हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी, ज्वारी 31 हजार 481, बाजरी 21, मका 691 असे एकुण तृणधान्य 33 हजार 113 हेक्टरवर लागवडी खाली आहे. तर तूर 72 हजार 510, मुग 25 हजार 859, उडीद पिकाची 26 हजार 942 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकुण कडधान्य हे 1 लाख 25 हजार 311 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. याची वार्षिक सरासरी 107.61 टक्के एवढी आहे. तीळ 455 हेक्टर, कारळ 282 हेक्टर, सोयाबिन 3 लाख 81 हजार 373 हेक्टर, इतर गळीत धान्य 74 हेक्टर क्षेत्रावर पेरणीखाली आहे.

 

कापसात मुग, उडिदाचे अंतरपिक झाले फायदाचे - ज्ञानेश्वर चपाट

ज्या सोयाबिनने सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तेच सोयाबिन आता कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. निसर्गाची वेळेवर कृपा आजवर खरीप पिकांना मिळाल्यामुळे सर्वच पिके आता दाटून उभी आहेत. माझ्यासारख्या काही शेतकऱ्यांनी कापसात अंतरपिक म्हणून 70 दिवसात येणारे मुग व उडिदाचे पिक घेऊन बघितले आहे. या अंतरपिकामुळे एरवी कापसात वाढणाऱ्या तणाला चांगला अटकाव बसला असून निंदणीचा खर्च वाचण्याबरोबर उडीद, मुगाच्या पिकातून दोन अधिकचे पैसे आता आमच्या हाती पडतील असा विश्वास शेतकरी चपाट यांनी बोलून दाखविला.

 

बिबिएफ पद्धतीच्या पेरणीने सोयाबिनला तारले - रंगनाथ लोकेवार

सोयाबिन पिकासंदर्भात पेरणीच्या काळात काही मोजक्या शेतकऱ्यांना वेगळा अनुभव जरी आला असला तरी आमच्या या ढोकी शिवारात इथल्या पेरणीच्या पद्धतीमुळे आम्हाला तारल्याची भावना ढोकीचे शेतकरी रंगनाथ लोकेवार यांनी बोलून दाखविली. बिबिएफ (रुंद सरीवरंबा) पद्धतीने सोयाबिनची लागवड करण्याचा सल्ला आम्हाला आमचे कृषि अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिला. त्यानुसार ही लागवड झाल्यामुळे सोयाबिनचे हे पिक हेक्टरी 25 क्विंटल पर्यंत उत्पन्न देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील अनेक वर्षात खरीपाचे असे पिक पाहिल्याचे आठवत नाही, असे त्यांनी सांगितले.   

000000

 


 

 वृत्त क्र. 737  

माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड, दि. 7 :- सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक / विधवा व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज 10 सप्टेंबर 2020 पर्यंत मागविण्यात येत आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नर्तन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य आदींना विशेष गौरव पुरस्कार आर्थिक स्वरूपात देण्यात येतो.

राष्ट्रीय पातळीवर कामगीरीसाठी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय पातळीसाठी 25 हजार रुपयाचा पुरस्कार, शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद माजी सैनिकांसाठी असलेल्या कल्याणकारी निधीमध्ये आहे.

दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून विभागात पहिल्या पाच मुलांमध्ये येणाऱ्या पाल्यासांठी, पदवी व पदव्यूत्तरमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येणाऱ्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्याना एक रक्कमी गौरव पुरस्कार 10 हजार रुपये देण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील सर्व पात्र माजी सैनिकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 वृत्त क्र. 736  

मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 नांदेड (जिमाका), दि.7:- एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्हयातील पात्र माजी सैनिक / विधवा यांचे पाल्य दहावी व बारावीमध्ये सर्वाधिक गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत.  त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 10 सप्टेंबर 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यामधून दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एका पाल्यास दिला जातो. या पुरस्काराची रक्कम 5 हजार रुपये आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

000000

 वृत्त क्र. 735    

कृषि विद्यापिठाच्या शिफारसनुसार

शेतकऱ्यांनी किडनाशकांचा करावा वापर    

नांदेड (जिमाका), दि.7:- सोयाबिन पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी नांदेड, मुदखेड, अर्धापुर, लोहा, कंधार या तालुक्यातील शेतकरी बांधवानी विविध उपाययोजना करुन कृषि विद्यापिठाने शिफारस केलेल्या किडनाशकांचा वापर करावा, असे आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे. 

 नांदेड जिल्हयात बेताचा पाऊस व पोषक हवामानामुळे सोयाबिन पिक समाधानकारक असून सोयाबीन पिक मुख्य पिक आहे. सोयाबिन पिकावरील किड नियंत्रणासाठी पुढील उपाय योजना कराव्यात. चक्रीभुंगा या किडीचा प्रौढ मादी भुंगेरा सोयाबीन पिकांचा देठ, फांदी किंवा मुख्य खेाडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करुन त्यामध्ये अंडी घालतो. त्यामुळे जमिनीतील अन्नपुरवठा बंद होतो आणि खापाच्या वरचा भाग वाळुन जातो. या चक्री कापात चक्रीभुंग्याचा मादी भुंगेरा 8 ते 72 अंडी घालतो. भुंग्याची अळी खोडातील पुर्ण गर खात असल्याने शेंगा (फोल) होप होतात. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते. या किडीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या आत असल्यास शेतकऱ्यांनी बाधीत झाडे किंवा प्रादुर्भावग्रस्त झाडांचे भाग काढुन टाकावेत.

 पानाच्या विशिष्ट भाग सुकन्यापासुन यापध्दतीचा 15 दिवसांतुन दोन वेळा अवंलब केल्यास होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी करता येते तसेच 5 टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी. किडीने नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास ट्रायझोफॉस 40 ई सी 16 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायक्लोप्रीड 21.7 एस.सी 15 मिलि. प्रति 10 लिटर पाणी अथवा क्लो-यानट्रानीप्रोल 18.5 एस. सी. 150 मिलि. प्रति हेक्टरी अथवा थायमिथोक्झाम 12.6 टक्के + 12.6 लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के, झेड. सी. 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन वैकल्पिकरीत्या फवारावे. प्रादुर्भाव दिसताच 7 ते 10 दिवसात वरील किटकनाशकांची फवारणी करावी.

 सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव दिसताचा 5 टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी. किंवा 20 ग्रॅम बी.टी. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तंबाखुवरील पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रोफेनोफॉस 50 ई.सी. 25 मिलि. प्रति 10 लिटर पाणी अथवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के ई.सी. 7 मिलि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असेही आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 734    

                            सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात

रानभाजी महोत्‍सवाचे आयोजन

 नांदेड (जिमाका), दि.7:- जिल्ह्यात रानभाजी महोत्‍सव सोमवार 10 ऑगस्‍ट 2020 रोजी सकाळी 10 वा. जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड साजरा केला जाणार आहे. कोवीड-19 च्‍या पार्श्‍वभुमीवर सर्व नियमांचे पालन करुन येथे कंदभाज्या, सेंद्रीय हिरव्‍याभाज्‍या, फळभाज्‍या, फूलभाज्‍या रानफळांचे प्रदर्शन व विक्री होणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे.

 या महोत्‍सवात शेतकरीगट व महिलागटांचा सहभाग असणार आहे. या विक्रीच्‍या ठिकाणी उपलब्‍ध होणाऱ्या रानभाज्‍यामध्‍ये कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुईआवळी इत्यादी कंदभाज्या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फुलभाज्‍या व रानफळांचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

 मानवी आरोग्‍यामध्‍ये सकस अन्‍नाचे अनन्‍यसाधारण महत्‍व आहे.  सकस अन्‍नामध्‍ये विविध रानभाज्‍यांचा समावेश आवश्‍यक आहे. सद्यपरिस्थितीमध्‍ये रानातील, जंगलातील व शेतशीवारातील नैसर्गिकरित्‍या उगवल्‍या जाणाऱ्या रानभाज्‍यांचे, रानफळांचे महत्‍व व आरोग्‍यविषयक माहिती सर्वसामान्‍य नागरिकांना होणे आवश्‍यक आहे. रानभाज्‍यांचा समावेश हा त्‍या- त्‍या भागातील शेतकऱ्यांच्या आहारात होत असतो.

 रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. या रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. पुर्णपणे नैसर्गिक असल्‍याने या संपत्‍तीचा योग्‍य वापर आवश्‍यक आहे. शहरी लोकांमध्‍ये याबाबत जागृती करणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्‍हयात आयोजित करण्‍यात येणार आहे.

00000

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...