सोयाबिन,मुग,उडीदच
शेतकऱ्यांना देईल संजिवनी
खरीप
पिकांचे उत्पन्न विक्रमी मार्गावर
नांदेड (जिमाका) दि. 7 :- गत दहा
वर्षात खरीप पिकांसाठी वेळेवर आवश्यक असलेला असा मोजका पाऊस कधी झाला नाही.
जिल्ह्यातील मुग, उडीद, सोयाबिन, कापूस आदि खरिपातील पिकांना वेळेवर पावसाचे पाणी
मिळाल्यामुळे पिके शेतात डौलाने डुलत आहेत. निसर्गाने अजून दोन आठवडे साथ दिल्यास मुग,
सोयाबिन आणि उडीद या पिकांचे विक्रमी उत्पादन जिल्हाभरात होईल, अशा विश्वास जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी व्यक्त केला. या पिकांसाठी आठवडाभरात
दोन पाऊस झाले तरी पुरेसे ठरतील असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील 16 तालुक्यात एकुण 7 लाख 42 हजार 861
हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून या क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजेच 7 लाख 55 हजार 18
हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीप हंगामात पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी
101.64 एवढी झाली. जिल्ह्यात सर्वात जास्त देगलूर तालुक्यात सर्वसाधारण खरीप
पिकाच्या क्षेत्रापेक्षा 15.39 टक्क्यांनी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. या खरीप
हंगामात जिल्ह्यात 920 हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी, ज्वारी 31 हजार 481, बाजरी
21, मका 691 असे एकुण तृणधान्य 33 हजार 113 हेक्टरवर लागवडी खाली आहे. तर तूर 72
हजार 510, मुग 25 हजार 859, उडीद पिकाची 26 हजार 942 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकुण
कडधान्य हे 1 लाख 25 हजार 311 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. याची वार्षिक सरासरी
107.61 टक्के एवढी आहे. तीळ 455 हेक्टर, कारळ 282 हेक्टर, सोयाबिन 3 लाख 81 हजार
373 हेक्टर, इतर गळीत धान्य 74 हेक्टर क्षेत्रावर पेरणीखाली आहे.
कापसात
मुग, उडिदाचे अंतरपिक झाले फायदाचे - ज्ञानेश्वर चपाट
“ज्या सोयाबिनने
सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तेच सोयाबिन आता कोरडवाहू
शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. निसर्गाची वेळेवर कृपा आजवर खरीप पिकांना
मिळाल्यामुळे सर्वच पिके आता दाटून उभी आहेत. माझ्यासारख्या काही शेतकऱ्यांनी
कापसात अंतरपिक म्हणून 70 दिवसात येणारे मुग व उडिदाचे पिक घेऊन बघितले आहे. या
अंतरपिकामुळे एरवी कापसात वाढणाऱ्या तणाला चांगला अटकाव बसला असून निंदणीचा खर्च
वाचण्याबरोबर उडीद, मुगाच्या पिकातून दोन अधिकचे पैसे आता आमच्या हाती पडतील”
असा विश्वास शेतकरी चपाट यांनी बोलून दाखविला.
बिबिएफ
पद्धतीच्या पेरणीने सोयाबिनला तारले - रंगनाथ लोकेवार
“सोयाबिन पिकासंदर्भात
पेरणीच्या काळात काही मोजक्या शेतकऱ्यांना वेगळा अनुभव जरी आला असला तरी आमच्या या
ढोकी शिवारात इथल्या पेरणीच्या पद्धतीमुळे आम्हाला तारल्याची भावना” ढोकीचे शेतकरी रंगनाथ लोकेवार यांनी बोलून दाखविली.
बिबिएफ (रुंद सरीवरंबा) पद्धतीने सोयाबिनची लागवड करण्याचा सल्ला आम्हाला आमचे
कृषि अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिला. त्यानुसार ही लागवड झाल्यामुळे सोयाबिनचे
हे पिक हेक्टरी 25 क्विंटल पर्यंत उत्पन्न देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील
अनेक वर्षात खरीपाचे असे पिक पाहिल्याचे आठवत नाही, असे त्यांनी सांगितले.
000000
No comments:
Post a Comment