Friday, July 2, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 14 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 281 अहवालापैकी  6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 253 एवढी झाली असून यातील 88 हजार 646 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 109 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 व नायगाव तालुक्यांतर्गत 3 असे एकूण 6 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 14 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 2, खाजगी रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन, गृह विलगीकरण व जम्बो कोविड सेंटर मधील 9 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 109 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 56, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 36 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 141 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 11 हजार 278

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 8 हजार 353

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 253

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 646

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.14 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-83

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-109

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2                       

00000

 

 

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 21 जुलै रोजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. 

लागू करण्यात आलेले ब्रेक दि चैनचे निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. 

बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.  कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक असेल असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

0000

 

कोव्हॅक्सीन-कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध

जिल्ह्यातील 102 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 102 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 3 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 14 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

श्री गुरुगोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल या 12 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 1 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 15 हजार 390 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 2 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 92 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 55 हजार 660 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 48 हजार 590 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या लाभार्थ्यांना

कागदपत्रे अपलोड करण्याचे कृषि कार्यालयाचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कृषि यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत विविध योजनेतून तसेच सुक्ष्म सिंचन या घटकाअंतर्गत विविध योजनेतून महाडीबीटी पोर्टलवर नांदेड जिल्हयातील 11 हजार 68 लाभार्थींची निवड झाली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना लघु संदेश पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त 4 हजार 533 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केली नाहीत, अशा सर्वांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

निवड झालेल्या लाभार्थ्यांसाठी यांत्रिकीकरण घटकासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे 7/12 उतारा, 8 अ उतारा, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन व तपासणी अहवाल, अ.जाती / अ. जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी आवश्यक असलेली असलेली कागदपत्रे 7/12 उतारा, 8 अ उतारा, सिंचनाची स्रोत नोंद, अ.जाती / अ.जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावीत. ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्यांना कागदपत्रे तपासून पूर्व संमती देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना पूर्व समंती मिळुनही सुक्ष्म संच कार्यन्वित केले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच प्रक्षेत्रावर कार्यान्वित करुनच देयके अपलोड करावीत, असेही आवाहन कृषि कार्यालयाने केले आहे.

00000

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे 


नांदेड (जिमाका) दि. 2 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम 2021 साठी गुरुवार 15 जुलै 2021 अशी आहे. योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा / न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणापत्र देणार नाहीत या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करुन योजनेत सहभागी करुन घेणेबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल.

 

योजनेंतर्गत पुढील जोखिम बाबींचा खरीप हंगाम 2021 साठी समावेश करण्यात आला आहे. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान यात खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख पिकांची अधिसुचित क्षेत्रात सुर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी / लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील.

 

पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान यात सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहील.

 

पिक पेरणीपासून काढणी पर्यन्तच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट यात टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासुन व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसुचित विमा क्षेत्र घटकातील पिक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसान भरपाई देय राहील.

 

स्थानिक नैसर्गिक आपत्ती  या बाबी अंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठरावीक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.

 

काढणी पश्चात नुकसानीत ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढया बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

 

काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप (Crop Insurance App) / संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक / बँक / कृषि व महसुल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.

 

या योजनेंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार असून पिकासाठी जोखीम स्तर हा 70 टक्के राहिल.

 

विमा संरक्षण प्रति हेक्टर ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये तर विमा हप्ता दर 24 टक्के असून विमा हप्ता रक्कम 6 हजार राहिल. शेतकरी हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 500 रुपये, केंद्र हिस्सा प्रति. हे. विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 750 तर राज्य हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 750 एवढी राहिल.   

 

सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये तर विमा हप्ता दर 30 टक्के असून विमा हप्ता रक्कम 13 हजार 500 राहिल. शेतकरी हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 900 रुपये, केंद्र हिस्सा प्रति. हे. विमा हप्ता दर 14 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 6 हजार 300 तर राज्य हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 14 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 6 हजार 300 एवढी राहिल.

 

मूग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये तर विमा हप्ता 24 टक्के असून विमा हप्ता रक्कम 4 हजार 800 राहिल. शेतकरी हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 400 रुपये, केंद्र हिस्सा प्रति. हे. विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 200 तर राज्य हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 200 एवढे राहिल.

 

उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये तर विमा हप्ता 26 टक्के असून विमा हप्ता रक्कम 5 हजार 200 राहिल. शेतकरी हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 400 रुपये, केंद्र हिस्सा प्रति. हे. विमा हप्ता दर 12 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 400 तर राज्य हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 12 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 400 एवढे राहिल.

 

तूर पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 3 हजार 500 रुपये तर विमा हप्ता 27 टक्के असून विमा हप्ता रक्कम 9 हजार 450 राहिल. शेतकरी हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 700 रुपये, केंद्र हिस्सा प्रति. हे. विमा हप्ता दर 12.5 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 4 हजार 375 तर राज्य हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 12.5 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 4 हजार 375 एवढे राहिल.

 

कापूस पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये तर विमा हप्ता 19 टक्के असून विमा हप्ता रक्कम 8 हजार 550 राहिल. शेतकरी हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 5 टक्के, विमा हप्ता रक्कम 2 हजार 250 रुपये, केंद्र हिस्सा प्रति. हे. विमा हप्ता दर 7 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 3 हजार 150 तर राज्य हिस्सा प्रति हे. विमा हप्ता दर 7 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 3 हजार 150 एवढे राहिल.

 

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 मध्ये इफ्को टोकिओ जनरल इंन्शुरन्स कं.लि. 10 वा मजला सुनीत कॅपिटल सोसायटी, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर, पुणे-411016 ई-मेल-supportagri@iffcotokio.co.in व टोल फ्रि क्रमांक -18001035490 या विमा कंपनीद्वारे योजना राबविण्यात येत आहे.

 

योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक पेरणी / लावणीपुर्व नुकसान भरपाई / हंगामाध्ये प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान / स्थानिक आपत्ती या जोखिमींच्या बाबींकरीता नुकसान भरपाईची पुर्तता करतील. त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारित व काढणी पश्चात नुकसान भरपाई या जोखिमीच्या बाबींसाठी नुकसान भरपाईची पुर्तता केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील.

 

विमा योजनेतंर्गत विविध जोखिमीतंर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन निश्चित केले जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगातुन प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करुन हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते.

 

बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपुर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करतांना पैसेवारी, दुष्काळ, टंचाई परिस्थिती आणि पुरामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात कोणत्याही शासकीय विभाग / संस्थेमार्फत घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरता येत नाही.

 

पिक विमा भरण्याची अंतिम दिनांक 15 जुलै असुन यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याने शेवटच्या दिवसांची वाट न बघता ज्या शेतकऱ्यांना या पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

000000


 

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजात

कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या

व्यक्तीच्या वारसदारासाठी कर्ज योजना  

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्यावतीने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी स्माईल (Smile) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड-19 या प्रादुर्भावामुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदाराला एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्याकडून 5 लाख रुपयापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची ही योजना विचाराधीन आहे.

 

यात एनएसएफडीसी कर्ज 4 लाख रुपयासाठी व्याजदार 6 टक्के तर भांडवली अनुदान हे 1 लाख रुपये राहिल. यासाठी मृत्यू व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्म दिनांक, लिंग, जात / पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तीची एकुण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार व वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयाच्या आत असावे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने ही माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कामठा रोड नांदेड येथे सादर करावी किंवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठवावी. अधिक माहितीसाठी https://forms.gle/Q485fSUQYEuL4xUx7 या लिंकवर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

000000

 

हत्तीरोग उच्चाटनासाठी सामुहिक औषधोपचार मोहीम 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  भारतात हिवताप खालोखाल हत्तीरोग ही सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोकांना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला आहे. त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर महाराष्ट्रात नांदेड, नागपूर, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतो. नांदेड जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्ट 2020 हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम सर्व्हेनुसार अंडवृद्धीचे 746 व हत्तीपायाचे 2 हजार 553 असे एकत्रित 3 हजार 299 हत्तीरोगाचे बाह्यलक्षणे युक्त रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात 1 ते 7 जुलै 2021 कालावधीत ग्रामीण भागात व शहरी व मनपा निवडक भागात 1 ते 15 जुलै या कालाधीत राबविली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 36 लाख 65 हजार 210 लोकसंख्या पैकी 31 लाख 47 हजार 378 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 29 लाख 27 हजार 64 आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे. 

बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतुची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुन: दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात. नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ ) 12 ते 18 महिने आहे. 

हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकागृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुद्धा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाह्य जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृद्धी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2021 पर्यंत उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते. 

जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी एक दिवसीय सामुहिक औषधोपचार एम.डी.ए. (मास ड्रग ॲडमिनिट्रेशन) सर्वांना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसतो) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये. 

या एम.डी.ए. ( एक दिवसीय सामुहिक औषधोपचार) मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपूर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे, शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम. डी. ए. या एकदिवसीय डी.ई.सी. अधिक ॲलबेनडॉझॅाल गोळ्याचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा ( डोस ) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ-जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो. 

एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळ्याचा डोस वयोगट- 2 वर्षापेक्षा कमी ( डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- निरंक) ( ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ.- निरंक ), 2 ते 5 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 1 गोळी) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी), 6 ते 14 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 2 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी), 15 वर्षावरील (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 3 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ - 1 गोळी). 

ही मोहिम नांदेड जिल्ह्यात राबविण्यासाठी 1 हजार 919 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आली आहे. त्यावर 384 पर्यवेक्षक, 20 जिल्हास्तरीय अधिकारी व 20 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक पाहणी करणार आहेत. ही मोहीम राबविण्यासाठी 78 लाख डि. ई. सी. गोळ्या व 31 लाख अलबेंडॉझॉल गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. तेंव्हा डी.ई.सी. व ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आपल्या घरी, अंगणवाडी व शाळामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेवक ग्रामीण भागात 1 ते 7 जुलै कालावधीत तर शहरी व मनपा निवडक भागात 1 ते 15 जुलै 2021 दरम्यान येतील तेंव्हा या गोळ्या जेवन करुन (उपाशी पोटी न घेता) घ्याव्यात. शासनाच्या या मोहिमेस नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास नक्कीच आपण हत्तीरोगापासून मुक्त होऊ, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...