Thursday, December 26, 2024

वृत्त क्र. 1232

स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप 

प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद साधतील 

 राज्याच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता 

नांदेड दि. 26 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या स्वामित्व योजनेला देशभरात मान्यता मिळाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे या योजने अंतर्गत वितरण करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत उद्या दिनांक 27 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींना सनद वाटप होणार आहे. 

लाभार्थ्यांना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार तुषार राठोड ,अन्य लोकप्रतिनिधींच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सनद वाटप करण्यात येईल. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता स्वामित्व योजने अंतर्गत सनद वाटप कार्यक्रम  आयोजित करण्यात येणार आहे. 

विभागात विशेष शिबिर घेवून सनद वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, महसूल, भूमीअभिलेख व अन्य विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वामीत्व हक्क योजनेअंतर्गत 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे , सनदचे ई वितरण होणार आहे .तसेच या योजनेतील काही लाभार्थ्यांची प्रधानमंत्री थोडक्यात संवाद साधतील. 

स्वामित्व योजनेचे फायदे  

अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने गावाठाणातील मिळकतीचे अचूक मोजमाप, नकाशा आणि मालमत्ता पत्रक तयार करणे सोपे व सुलभ झाले आहे, सिमा निश्चिती आणि मोजमापाची कामे आता अधिक प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होतील,मालमत्तेची कायदेशीर मालकी आणि सुरक्षिततेची हमी,कर्ज मिळण्याची सुलभ सुविधा, जमीनीशी संबंधित मतभेदाचे त्वरित निराकरण,मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ, गावांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा व चालना मिळणार आहे. त्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

विशेष लेख       

लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा !

दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात भरते. यावर्षी ही यात्रा रविवार 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधीत भरणार आहे. गेल्या काही वर्षात नांदेड व लातूर जिल्हा प्रशासनाने यामध्ये आपला सहभाग वाढवला आहे. नांदेड जिल्हा परिषदलोहा पंचायत समिती आणि माळेगाव ग्रामपंचायत या यात्रेचे आयोजन करते.

 

महाराष्ट्राची वैभवसंपन्न परंपरा जपणारी व मराठवाडयाचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्रीक्षेत्र खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर महामार्गावरील माळेगाव या गावी भरते. माळेगाव येथे मुख्य मंदिरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत. हजारो वर्षापूर्वीच्या हेमाडपंथी मंदिरातील महादेवाचे रुप म्हणजे खंडोबा याठिकाणी दर्शनासाठी विराजमान आहेत. लाकडी देवघर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. श्रीक्षेत्र माळेगाव येथील नागरिकांचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा असून अनेक जणांचे खंडोबा हे कुलदैवतही आहे. या यात्रेच्या निमित्ताने देशाभरातून विविध भागातून सर्व जातीधर्माचे लोक येथे येतात.


याठिकाणी सांस्कृतिक ऐक्याचेएकात्मतेने नटलेल्या विविधतेचे दर्शन पाहावयास मिळते. याठिकाणी मोठे-मोठे आकाश पाळणे सर्वांचे आकर्षण असून अनेक हौशी यात्रेकरु याचा आनंद घेतात. याठिकाणी जिल्हा परिषदेच्यावतीने विविध माहिती प्रदर्शनेकृषी प्रदर्शनेआरोग्य शिबिरखाद्य पदार्थाचे महोत्सव भरविले जातात. या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असल्याने येथील विविध शर्यतीप्रदर्शनकुस्त्यांची दंगललोककलासंगीत वाद्यलोकनाटक असा समृद्ध मराठी लोककला संस्कृतीचा अविष्कार पाहायला मिळतो. यात्रा ही जवळपास एक महिनाभर चालते. यात इथला जनावराचा बाजार हा सर्वदूर ओळखला जातो. यात घोडेउंटगायबैलम्हैसरेडेगाढवशेळयामेंढयाकुत्रे आदी पशु पक्षी इतर राज्यातूनही लोक घेवून येतात. मागील तीन ते चार वर्षापासून माळेगाव यात्रेत श्वानांची खरेदी विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या नांदेडच्या भागात आणि लातूर जिल्ह्यात आढळणारा कारवान आणि पश्मी जातीच्या श्वानाची पसंती वाढली आहे. त्याचबरोबर लाब्राडोरडोबरमन आणि जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांना पण मोठया प्रमाणात पसंती दिली जात आहे.


यावर्षी 29 डिसेंबर ते जानेवारी 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत माळेगाव यात्रा भरणार असून 29 डिसेंबर रोजी यात्रेच्या पहिल्या दिवशी देवस्वारी व पालखी पूजनमहिला व बालकांसाठी स्पर्धाभव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी अश्वश्वानकुकूट प्रदर्शन व विविध स्पर्धाचे उदघाटन व महिला आरोग्य शिबिर होणार आहे. तीसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगलचौथ्या दिवशी शंकरपट बैल गाडा शर्यतपारंपारिक लोककला महोत्सव२ जानेवारी पाचव्या दिवशी  सकाळी  11 वाजता पशुसंवर्धन विभागाचे बक्षिस वितरणदुपारी ३ वाजता लावणी महोत्सव असे सर्व कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेकडून नियोजन करण्यात आलेले आहे. स्थानिक परंपरेनुसार मल्लांना आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी कला व लावणी महोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगलीशंकरपट आयोजित  केले जातात.  कुस्त्यांच्या आखाडयातील फड जिंकणाऱ्या मल्लास रोख बक्षिसाबरोबर सन्मानाचा फेटा बांधून गौरविण्यात येते.


या यात्रेचे नियोजन दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. याही वर्षी यात्रेचे उत्तम नियोजन केले असून यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.  सर्व विभागांना करावयाच्या उपाययोजनेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाने आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण केली असून यात्रा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन केले आहे.

 

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविकयात्रेकरुव्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशी प्रदर्शन भरविण्यात येणार असून या यात्रेचे वैशिष्ट म्हणजे येथे पशुचा बाजार भरविला जातो. पशुअश्वकुक्कूट यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्या जातात. तसेच पशुसाठी लागणारे सर्व साहित्यबैलाचा साज अशा अनेक वस्तु ज्या इतर यात्रेत मिळणार नाहीत अशा आगळया- वेगळया वस्तू याठिकाणी पाहावयास विक्रीस उपलब्ध असतात. ग्रामीण संस्कृतीची नाळ जोडणारी ही यात्रा असून ग्रामीण भागात लागणारे शेतीविषयक साहित्यांची दुकाने  इथे  थाटली जातात.  महिलांसाठी गृहपयोगी वस्तुलाकडी साहित्यदुर्मिळ अशा कवडयाच्या माळेपासून ते  बैलांच्या साजापर्यत वैविध्यपूर्ण वस्तू या यात्रेत विक्रीसाठी उपलब्ध असतात.

 

यात्रेत वाघ्या मुरळीपोतराजवासुदेवगोंधळीउद्योग दालनेमेळावे इत्यादी पाहून यात्रेकरु आपले मन आनंदाने हरखून जातात अशी प्रेक्षणीय ही यात्रा असते. हा सांस्कृतिक वारसा महोत्सवाच्या रुपाने जवळून पाहण्यासाठी नागरिकांनी आपल्यासोबत नवी पिढी घेवून जाणे आवश्यक आहे. शेकडो वर्षाचा हा आपला वारसा या पिढीकडून त्या पिढीकडे देताना कर्तव्य म्हणून याकडे बघण्याची गरज आहे.


जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने यावर्षी ‘प्लास्टीक मुक्त माळेगाव यात्रा’ भरविण्यावर भर आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपआपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्लास्टीकचा वापर करु नये. यासाठी प्लास्टीक ग्लासप्लेटपिशवीचे पुष्पगुच्छप्लास्टीक आवरण यांचा वापर करु नये याऐवजी स्टील ग्लासचा वापर करावा. नळाच्या तोटीला स्टील ग्लास साखळीने बांधून ठेवावे. अशा अनेक उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत.

 

माळेगाव ही यात्रा शेकडो वर्षाची परंपरा आहे. यात्रेचे स्वरुप हळूहळू बदलत आहे. काही जून्या अंधश्रध्दांनाचालीरितीना टाळून पुढे जाताना पूर्वीच्या अनेक बाबी कालबाह्य होत आहेत. मात्र असे असले तरी आधुनिकतेचा कास धरण्यासाठी समाजाने स्विकारलेले परिवर्तन प्रत्यक्ष डोळयाने बघणेहे देखील या यात्रेचे वैशिष्ट ठरत आहे. त्यामुळे चला कुटूंबासह माळेगावच्या स्वारीवर गेले पाहिजे. बेल भंडाऱ्याची उधळण होताना आमच्या सांस्कृतिक गतवैभवाचा परिचयही झाला पाहिजे.


अलका पाटील

उपसंपादकजिल्हा माहिती कार्यालयनांदेड

000000










दि. 25 डिसेंबर, 2024

वृत्त क्र. 1231

 माळेगावात यावर्षी यात्रेकरूंना अधिक सुविधा व सुरक्षा बहाल करा 

 नांदेड व लातूर खासदारांच्या प्रशासनाला सूचना 

 माळेगावात यात्रा पूर्वतयारीची आढावा बैठक 

नांदेड दि. 25 डिसेंबर : दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण असणारी माळेगाव येथील यात्रा दिवसेंदिवस अधिक मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. प्रवासी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे यात्रेकरूंचा ओघ वाढला असून यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा, सुरक्षा, प्रवासी व्यवस्था व मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आज नांदेड व लातूर लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण व डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी प्रशासनाला दिले.

माळेगाव येथील यात्रा चार दिवसानंतर सुरू होणार आहे. नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व लोहा ग्रामपंचायत या यात्रेचे आयोजक असतात. आज या तीनही यंत्रणेने केलेल्या तयारीच्या संदर्भात पूर्वतयारी पाहणी करताना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

माळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह परिसरात झालेल्या या बैठकीला नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे , पंचायत समितीचे पदाधिकारी,यात्रा आयोजनात सहभागी असणारे मान्यवर, स्थानिक आयोजक व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

आजच्या बैठकीमध्ये पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन, कृषी पशुसंवर्धन, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण बीएसएनएल, महामार्ग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अन्न व औषधी प्रशासन, वन, जलसंधारण, समाज महिला व बालकल्याण पंचायत समिती लोहा अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यात्रे संदर्भात या विभागाने काय नियोजन केले याचा आढावा खासदार महोदयांनी घेतला.

 या आढावा बैठकीमध्ये यात्रा आयोजन करणाऱ्या मान्यवरांनी तसेच गावकऱ्यांनी ही काही सूचना केल्या, यामध्ये माळेगावला 'अ ' दर्जाचा तीर्थक्षेत्राची मान्यता मिळावी. माळेगाव जवळ महामार्गावर ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावा, माळेगावच्या लावणी महोत्सवाला सांस्कृतिक विभागाची मान्यता मिळावी, माळेगावात आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी हायमास प्रकाश व्यवस्था लावण्यात यावी, सर्व खाजगी कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभारण्यात यावे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यात यावे, माळेगावला बँक सुरू करण्यात यावी, यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी निवारा व्यवस्था उभारण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर दोन्ही खासदारांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. खासदार रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूची सुरक्षा आणि प्राथमिक सुविधा याबाबत दक्ष असण्याचे सांगितले. त्यांनी या ठिकाणी हायमास लाईट, यात्रेकरू आणि येणाऱ्या पशुधनासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, पोलिसांची सुरक्षा, महिला पोलिसांची उपलब्धता, अवैध दारू विक्रीवर नियंत्रण यासंदर्भात काळजी घेण्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील प्रायव्हेट मोबाईल नेटवर्क कडून तात्पुरती काही व्यवस्था होत असेल तर या संदर्भात उपाययोजना करण्याचे प्रशासनाला सांगितले.

 लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी यावेळी तीर्थक्षेत्राचा ' अ ' दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. माळेगावला येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा व यात्रेतील सहभागीत्वाचा सन्मान करण्यासाठी सन्मान चिन्ह देण्याची सूचना त्यांनी केली. तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याकडे अधिक गंभीरतेने लक्ष वेधण्याबाबत सांगितले.तसेच या ठिकाणाच्या तलावाची स्वच्छता करून ते पाणी पशुधनाच्या पिण्यायोग्य राहील याची खातरजमा करण्याची सूचना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले.

 माळेगावची यात्रा 29 डिसेंबर रोजी देव स्वारी पालखीने सुरू होणार आहे. 30 डिसेंबरला पशु, अश्व,शेळी, कुक्कुट व श्वान प्रदर्शन,31 डिसेंबरला कुस्त्यांची भव्य दंगल ,1 जानेवारीला पारंपारिक कला महोत्सव व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, 2 जानेवारीला लावणी महोत्सव व ३ जानेवारीला शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.२ जानेवारीचा लावणी महोत्सवात  नऊ लावणी संच सहभागी होणार आहे.

000















दि. 24 डिसेंबर, 2024

वृत्त क्र. 1230

ख्रिसमस व न्यू इयर निमित्ताने मद्यविक्रीस उशिरापर्यत परवानगी

 ३ दिवस रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहणार 

नांदेड दि.२४ डिसेंबर : नाताळ ( ख्रिसमस ) व नववर्षानिमित्ताने ( ३१ डिसेंबर ) विदेशी मद्य किरकोळ विक्रीची, बियर विक्रीची, परवाना कक्ष,क्लब परवाना असलेली तसेच मद्य विक्रीची दुकाने २४ डिसेंबर,२५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरला निर्धारित वेळेनंतर रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर काही दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

यामध्ये एफएल -२ (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलबीआर -२ (बंद बाटलीतून बीअर विक्री) दुकाने रात्री १०:३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर एफएल -३ (परवाना कक्ष) असलेली मद्यविक्रीची दुकाने आणि एफएल -४ (क्लब परवाना असलेली मध्यविक्रीची दुकाने) रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि सीएल -३ प्रकारातील मद्यविक्रीची परवाना दुकाने अ व ब वर्गाच्या नगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी  पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यासोबतच या दोन्ही सणाला साजरे करताना मद्य सेवन करताना आवश्यक परवाना सोबत बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षभरात अशा पद्धतीने अनधिकृतपणे मद्य प्राशन करताना आढळलेल्या पाच प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

एक दिवसाचा परवाना 

31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतार्थ पार्टी अथवा मेजवानी आयोजित करायची असेल व मद्यसेवनाचे आयोजन करायचे असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने एक दिवसाच्या विशेष परवानाची तात्काळ सोय उपलब्ध आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन एक दिवसाचा परवाना मिळू शकतो, असेही विभागाने कळविले आहे. यासाठी एक्साईज सर्विस महा ऑनलाईन या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत या काळात सहा पथके तयार करण्यात आली असून ही सहा पथके मद्य निर्मितीमध्ये विक्री व वाहतुकीवर विशेष लक्ष देणार आहे.

पहाटे पाच पर्यंत परमिट रूमला नववर्षाच्या स्वागताला परवानगी देण्यात आली आहे . मात्र अवैध धाबे, हॉटेल, खानावळ, रिसॉर्ट या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांवर विभागाचे लक्ष राहणार असून विनापरवानगी मालकाने परवानगी दिल्यास मालकावर, चालकावर तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,असेही राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी कळविले आहे.

नागरिकांनी ख्रिसमस व 31 डिसेंबर नववर्षाचे स्वागत नियमांचे पालन करून साजरे करावे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा न पोचविता अधिकृत लायसन्स जवळ बाळगून मद्य सेवन करावे व अनधिकृत ठिकाणी सण उत्सव साजरे करण्यास जाऊ नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

000000

दि. 24 डिसेंबर, 2024

  वृत्त क्र. 1229

ख्रिसमसला आरटीओ कार्यालयाला सुट्टी 

 25 डिसेंबरच्या सर्व चाचण्या पुढे ढकलल्या 

नांदेड दि. २४ डिसेंबTर : नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील ( आरटीओ ) शिकाऊ व पक्क्या लायसन्ससाठी ( अनुज्ञप्ती ) 25 तारखेला नियमित देण्यात आलेल्या चाचण्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार 25 डिसेंबरला ख्रिसमस सणानिमित्त सुट्टी असून या दिवशी कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी ज्यांना लायसन्स संदर्भात ऑनलाईन सूचना आली आहेत. त्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती ऑनलाईन सारथी प्रणालीवर तपासून पुढील तारखेवर चाचणीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

दि. 24 डिसेंबर, 2024

 वृत्त क्र. 1228

वाहनासाठी रिफ्लेक्टर वापरा ;अपघात टाळा 

जिल्हाधिकाऱ्यांचा चालकांशी संवाद 

 प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह 

नांदेड दि. २४ : रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत आज नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील साखर कारखान्यातील वाहनचालकांसोबत रस्ता सुरक्षा संदर्भातील संवाद साधण्यात आला. स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाहन चालकांना भेटून त्यांना रस्ता सुरक्षा विषयक सूचना केल्या.    

नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यामध्ये सध्या ऊसतोड व ऊस पोहचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे हजारो ट्रॅक्टर ट्रॉल्या गावागावातून प्रवास करतात.या ट्रॅक्टर ट्रॉल्यांना कोणताही अपघात होऊ नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्याकडून रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे व त्यांच्या अन्य सहकार्यांनी यासंदर्भात आज सर्व साखर कारखान्याच्या वाहन चालकांची वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूकदारांशी संपर्क साधला.

स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपप्रदेशक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांच्यासोबत लोहा येथील साखर कारखान्यामध्ये वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी ऊस वाहतूक करताना रिफ्लेक्टर कापड व रिप्लेक्टिव्ह रेडियम टेप ट्रॅक्टर वर लावण्यात यावा असे आवाहन केले. 

रात्रीच्या अंधारामध्ये अनेक वेळा ट्रॅक्टरचे इलेक्ट्रॉनिक रिफ्लेक्टर, लाईट काम करत नाहीत अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेप आणि रिफ्लेक्टर कापड याचा वापर करण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

तसेच जिल्हयातील उर्वरित 05 कारखान्यासाठी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगांव-येळेगांव ता.अर्धापूर, येथे सहायक मोटार वाहन निरिक्षक श्रीमती तेजस्विनी कलाले, एम.व्ही. के. अॅग्रो वाघलवाडा ता. उमरी सहायक मोटार वाहन निरिक्षक श्री. हेमंत साळुंके, श्री. सुभाष सागर, प्रा.लि. हडसणी ता. हदगांव श्री. पंकज कंतेवार, शिवाजी सर्व्हिस स्टेशन लि.बा-हाळी ता.मुखेड  सुनिल जारवाल, कुंटूरकर शुगर अॅन्ड अॅग्रो प्रा.लि. कुंटूर ता. नायगांव . संजय भोसले या कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येवून मा. प्रादेशिक परिवहन अधिकारी . विनय अहिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्रादेशिक परिवहन, नांदेड . संदिप निमसे यांच्या उपस्थितीत वाहन चालकांना सुरक्षित वाहतुक होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येवून कारखान्याच्या ठिकाणी असलेल्या रिफलेक्टर टेप लावण्यात आलेले आहे.असून दिनांक 01 जानेवारी 2025 पासून परिवहन विभागामार्फत जिल्हयातील सर्व रस्त्यावर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून येणार असून त्यांनी नमूद केलेल्या बाबीचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्यांचेविरुध्द मोटार वाहन कायदयातील तरतूदीनुसार कारवाई होणार असल्याचे सांगितले

सायकली, दुचाकी बैलबंड्याना रिफ्लेक्टर लावा 

यासंदर्भात साखर कारखान्यातील वाहतूक व्यवस्थेची संपर्क साधला असला तरी अन्य छोटी वाहने सायकली बैल बंड्या व दुचाकी वाहने चालवताना रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेपचा अधिकाअधिक वापर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनयकुमार अहिरे यांनी केले आहे. अल्प किमतीच्या या रिफ्लेक्टर मुळे रात्रीच्या वेळी मोठी सुरक्षा प्रदान होते. तसेच नागरिकांनी रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या रिफ्लेक्टरची सुरक्षाही सामाजिक जाणीवेतून करावी, सुरक्षा आदेशाचे पालन करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

श्री अहिरे यांनी भारतामध्ये होत असलेल्या अपघातांची संख्या बघता प्राथमिक सूचनांचे देखील पालन महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह रेडियम टेप रिफ्लेक्टर कापड मोठ्या संख्येने वापरण्यात यावा असे, आवाहनही केले आहे.

00000










दि. 24 डिसेंबर, 2024

वृत्त क्र. 1227

२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता 

दि 24 डिसेंबर: कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात अली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...