Saturday, December 7, 2019


विशेष लेख क्र . 3
रब्बी होणार सुखदायी….!

ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठया प्रमाणात झाला. त्यामुळे आता रब्बीची पिके चांगली येणार असल्याचा विश्वास शेतक-यांमध्ये निर्माण झाला आहे. रब्बीमध्ये ज्वारी, करडई, हरभरा, गहू, जवस, सूर्यफुल, भुईमुग आदी पिकांचे नियोजन केले आहे. त्याबरोबरच चारा पिकांची लागवड ही पाण्यात घेणार आहेत.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांबरोबर इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु आता मात्र रब्बीचे पिक चांगले येण्याची शेतकरी आशा बळगताना दिसतोय. रब्बीच्या पेरणीला वेग आला असून या हंगामात ज्वारी, करडई, हरभरा, गहू, जवस, सूर्यफुल, भुईमुग आदी पिके घेण्यास शेतक-यांचा कल दिसतो. उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने पहावे लागणार आहे. उन्हाळयात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून चारा पिके घेतल्यास चारा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
रब्बी हंगामातील पिके ही उपलब्ध पाण्यावरच घ्यावयाची असल्याने त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन योग्य -हेने व्हावे यासाठी मुलस्थानी जलसंधारण, बियाण्यांचा वापर, खत अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड नियोजन, पाणी व्यवस्थापन आदी बाबींचा योग्य अवलंब करावा लागेल. पीक उत्पादन वाढीसाठी योग्य बियाणांची निवड करून खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पिकांवर होणा-या किडींचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी योग्य प्रमाणात द्रावणाची फवारणी करावी.
पिक पध्दतीत बदल
रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पारंपरिक पिकांबरोबर नवीन पिकांची निवड करावी. त्याबरोबरच आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल, असे कृषी अधिकारी यांनी सांगितले. उपलब्ध पाणीसाठयामुळे शेतकरी वर्ग आता फळबाग, तुती, चारा पिके तसेच इतर बागायती पिके घेण्याकडेही वळताना दिसतोय. संरक्षित सिंचानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने पीक उत्पादकतेत वाढ होण्यास मदत मिळेल. औरंगाबाद विभागातील शेतक-यांचा कल गहू आणि हरभरा पिकाकडे वाढताना दिसतो आहे.
चारा पिके
चारा पिकांचे व्यवस्थापन करताना दुभत्या जनावरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा. ही यशस्वी दुग्धोत्पादनाची पहिली पायरी आहे. समिश्र चारा उत्पादन हे पशुंच्या आहाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यात एकदल द्विदल चारा पिके घ्यावीत. एकदल आणि व्दिदल चा-याचे प्रमाण निम्मे निम्मे असावे. चारा पिकांची निवड करताना योग्य बियाणांची निवड करावी. पिकांवर किडीचा प्रदुर्भाव होणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
गहू उत्पादन वाढीचे सुत्र
गहू पिकासाठी थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान उपयुक्त असते. त्यामुळे कोरडवाहू पिकासाठी योग्य वाणाची निवड करावी. बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. पाणी देताना जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणपणे 18 ते 20 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 5 ते 6 पाळया पिकवाढीच्या अवस्थेमध्ये देणे आवश्यक आहे. पिक संरक्षणासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात.
पिकनिहाय आतापर्यंत झालेली पेरणी
औरंगाबाद विभागात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यात गहू  आणि हरभरा पिक घेण्याकडे 
शेतक-यांचा  कल दिसतो आहे. विभागात 54 टक्के पेरणी झाली असून 4 लाख 41 हजार 286 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात रब्बी ज्वारीची पेरणी 2 लाख 34 हजार 586 हेक्टर, गहू 53 हजार 723 हेक्टर, मका 9 हजार 979 हेक्टर, इतर तृणधान्य 15 हजार 47 हेक्टर, हरभरा 1 लाख 41 हजार 671 हेक्टर, इतर कडधान्य 209 हेक्टर, करडई 456 हेक्टर, मोहरी 4 हेक्टर, कराळं 6 हेक्टर, जवस कडधान्य 53 हेक्टर, सूर्यफुल 3 हेक्टर, इतर गळीतधान्य 341 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

                                                             -प्रतीक्षा परिचारक, संहिता लेखक,
विभागीय माहिती कार्यालय, औरंगाबाद 


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...