Sunday, January 26, 2025

  वृत्त क्रमांक 107

'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे

२२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा

नांदेड, दि. २६ जानेवारी : भोकर मतदार संघातील युवकांसाठी श्रीजया चव्हाण यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. युवा उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन युवकांना रोजगाराची संधी मिळेल अशी आशा, राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये आयोजित युवा उमेदवार नावाच्या फेसबुक पेजच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ. अजित गोपछडे,  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलवार,आदी मान्यवर उपस्थित होते. 

आमदार झाल्यानंतर श्रीजया चव्हाण यांनी पहिल्याच महिन्यात त्या कामाला लागल्या असून, त्यांच्या 'युवा उमेद' उपक्रमातून युवकांना रोजगाराची संधी चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री ना अतुल सावे यांनी व्यक्त केली. रोजगार व स्वयंरोजगार तसेच शैक्षणिक दर्जोन्नतीसाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी सुरु केलेल्या 'युवा उमेद' उपक्रमाचे फेसबुक पेज व इन्स्टाग्रामचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

'युवा उमेद'च्या वतीने शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा आणि मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे विमोचन देखील पालकमंत्री व इतर मान्यवरांनी याप्रसंगी केले. मराठवाड्यात अनेक उद्योग येत असून, ती संधी साधण्यासाठी आपल्या भागातील तरुणांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री ना. अतुल सावे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांच्या ओबीसी विकास खात्यांतर्गत असलेली संस्था 'महाज्योती'चा स्टॉल अर्धापूरच्या रोजगार मेळाव्यात उपलब्ध असेल, असेही त्यांनी आवर्जून घोषित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली. मराठवाड्यासारख्या भागात देखील ही गुंतवणूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे खा. अशोकराव चव्हाण या कार्यक्रमात म्हणाले. आ. श्रीजया चव्हाण यांनी रोजगार मेळावा तर आयोजित केलाच आहे; सोबतच कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखत कशी होते, तिथे कसे बोलायचे, कसे कपडे घालायचे, आदींबाबत माहिती देणारे मेळावापूर्व प्रशिक्षण देखील आयोजित केले आहे. यातून मुलाखतीसाठी जाताना युवकांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा लाभ होईल, असा विश्वास खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आ. श्रीजया चव्हाण यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन मदत करावी, यासाठी आम्ही 'युवा उमेद' उपक्रम सुरु केला. या माध्यमातून रोजगाराची संधी व तरुणांमधील अंतर कमी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात यशवंत महाविद्यालयाच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.

0000








 वृत्त क्रमांक 106

पोलीस कवायत मैदानावर

पालकमंत्र्यांच्या हस्ते अनेकांचा सत्कार पुरस्कार  

•  पालमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांशी केले हितगुज

* चित्ररथाच्या सादरीकरणाचेही कौतुक   

नांदेड दि. 26 जानेवारी :  76 व्या प्रजास्त्ताक दिनानिमित्त आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात आज अनेक मान्यवरांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. काहींना त्यांच्या उपलब्धीसाठी तर काहींना विशिष्ट सेवेसाठी मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी चित्ररथांनी देखील मैदानावरील पथावर संचलन केले. 

या कार्यक्रमाला पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, वारसपत्नी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

स्वातंत्र्य सैनिकांशी हितगुज 

ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारस पत्नींची भेट घेतली. यावेळी त्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत घटनेच्या प्रास्ताविकेचे फोटो देण्यात आले. यावेळी बाबुराव भानुदास जोशी, गयाबाई व्यंकटराव कर्डीय, गंगाबाई शामराव नरंगळे, यमुनाबाई मारोती कुरुडे, सुर्यकांता गंगाधरराव गणमुखे, प्रभावती दत्तात्रय टेळकीकर, सुमंत त्र्यंबकराव कुलकर्णी, प्रेमिलाबाई रामराव अंबुलगेकर आदींची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.  

संविधान प्रास्ताविकेचे वितरण 

यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान अभियानांतर्गत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सर्व स्वातंत्र्य सैनिकांना वितरण केले. 

पुरस्काराचे वितरण

पोलीस विभागातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक संजय जोशी, भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलीस हवलदार दिलीप राठोड, ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेल्या शेतकऱ्यांमध्ये खैरगाव येथील रामदास लांडगे, हनवता चव्हाण, सोमनाथ सिनगारे, विजय लंगडे, गंगाधर बासरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.   

विद्यार्थ्यांना टॅब वाटप

यावेळी विजाभज प्रवर्गातील आश्रम शाळेतील इयत्ता 5 वी ते 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे टॅब वाटप करण्यात आले. विजाभज प्रवर्गातील आश्रमशाळेतील हे 5 विद्यार्थी असून बारावी विज्ञानमध्ये शिकत आहेत. यामध्ये प्रतिक्षा पवार, अश्विनी राठोड, आरती लिमकर, माऊली जगदाडे, दत्ता आडे या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.  

ग्रामपंचायत विभाग 

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत उल्लेखनीय कार्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील सरपंच प्रतिक्षा पवार, ग्रामपंचायत अधिकारी शैलेंद्र वडझकर, पंचायत विभागाचे आनंद गुणाजी राहटीकर, सचिन पंडितराव सोनुने, मधुकर मानसिंग मोरे यांना पंचायत विभागातील विविध उपलब्धीबाबत पुरस्कृत करण्यात आले. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार भोकर तालुक्यातील नागपूर ग्रामपंचायतला देण्यात आला. द्वितीय पुरस्कार हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव ग्रामपंचायतला देण्यात आला तर तृतीय पुरस्कार कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचोलीला देण्यात आला.  

पथकाचे पथसंचलन

परेड कमांडर डॉ. अश्विनी जगताप यांच्या संचलनात आज अनेक पथकांनी पथसंचलन केले. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीसबल मुदखेड नेतृत्व निशान सिंह, सय्यद इरफान, जलद प्रतिसाद पथक नेतृत्व योगेश बोधगिरे, वशिष्ठ बिक्कड, पोलीस मुख्यालयाचे दंगा नियंत्रण पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, उमेश कदम, सशस्त्र पोलीस पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे, सुरेश टेंगसे, सशस्त्र महिला पोलिस पथक नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शालीनी गजभारे, श्रीमती किरण बेंबडे, सशस्त्र पोलीस पथक ग्रामीण विभाग नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक सुनिल बुलंगे, प्रदीप साखरे, गृहरक्षक दल पुरूष पथक नेतृत्व बळवंत अटकोरे, रवी जनकुट, गृहरक्षक दल महिला पथक नेतृत्व श्रीमती छाया वाघमारे, श्रीमती मंगल बाराते, अग्निशामक दल प्लाटून अग्निशम अधिकारी निलेश कांबळे, सगरोळीचे राजर्षि श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय नेतृत्व शिवराज कदम, मोहित रावणगावकर, राष्ट्रीय छात्रसेना पथक नेतृत्व स्वराज बोरगावे, कु. रंजना यादव, महसूल पथक मंडळ अधिकारी हयुन पठाण, ग्राम महसूल अधिकारी राजकुमार मुंडे, स्काऊट पथक महेश डोबाळे, करण येनगेवाड, एसपीसी प्लाटून शिवांशू मिनू, पोलीस बॅड पथक पीएसआय बी. आर. वाघमारे व सहकारी कर्मचारी, चार्ली (पोलीस विभागाचे मोटार सायकल रायडर) पोलीस कॉ. बंदुके, कैलासे, गायकवाड, बोकारे, श्वान पथक (डॉग स्कॉड युनिट) श्वानाचे नाव आजाद नेतृत्व लकडे, वाहेद बेग, श्री केंद्रे,  मार्क्समॅन वाहन नेतृत्व सचिन घोगरे, रेड्डी. बॉम्ब शोधक व नाशक पथक नेतृत्व प्लाटून कमांडर सोनकांबळे, प्रविण चंदेल, डायल 112 वाहन सय्यद मोईन, दंगा नियंत्रण वाहन नेतृत्व श्री स्वामी, जायभाये, अग्निशमन दलाचे वाहन अग्निशामक अधिकारी के. एस. दासरे, प्रकाश ताटे, 108 रुग्णवाहिका डॉ. रमेश वरवटकर व चालक देविदास किर्तन यांचा समावेश होता. 

विविध विभागाचे चित्ररथ

यावर्षीच्या पथसंचनालनाचे आकर्षण विविध चित्ररथ व सादरीकरण होते. यात महिला व बालविकास विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, राजर्षि श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय सगरोळी, भोकरच्या शाहू महाराज विद्यालयाचे मुलींचे लेझीम पथक, मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा, क्षयरोग निवारण जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना, पीएम स्वनिधी योजना, क्रीडा कार्यालयाचे विविध खेळांचे प्रात्याक्षिक, विद्युत वितरण कंपनीचे अपारंपारिक ऊर्जा जनजागृती, कृषिरथ, जिल्हा माहिती कार्यालयाचा शंभर दिवस कामाचे नांदेडच्या विकासाचे, चार्ली पोलीस विभाग मोटारसायकल रायडर या चित्ररथाचा समावेश होता.   

00000












 वृत्त क्रमांक 105

समाज कल्याण कार्यालयात

प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन  

नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्यण कार्यालयात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सकाळी 7.40 वा. ध्वजारोहण करण्यात आले. 

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील, जिल्हा जात पडताळणी समिती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे व विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, बार्टीचे प्रकल्प अधिकारी व बाह्यस्त्रोत मनुष्यबळ, समतादूत व तालुका समन्वयक असे एकूण 115 अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमीत्त भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने संविधान प्रस्ताविकेचे सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात सामुहिक वाचन करण्यात आले. घरघर संविधान निमित्त संविधान प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले. राज्यगीत घेवून सामूहिक तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. सदर प्रजासत्ताक ध्वजारोहण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

0000



 वृत्त क्रमांक 104 

जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन    

नांदेड दि. 26 जानेवारी : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वा. झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

पोलीस मैदानावरील मुख्य समारंभापूर्वी हे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

0000 






   

 वृत्त क्रमांक 103 

शाश्वत शेती, शाश्वत ऊर्जेच्या

माध्यमातून परिवर्तन घडवू या : पालकमंत्री अतुल सावे 

  पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण

  चित्ररथ व सादरीकरणाने लक्ष वेधले

  पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन 

नांदेड दि. 26 जानेवारी : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे झाले. यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत शेती व शाश्वत ऊर्जेच्या सर्व प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा संदेश यंत्रणांना दिला. आजचा प्रजासत्ताक दिन विविध विभागांचे लक्षवेधी सादरीकरण व चित्ररथांमुळे स्मरणीय ठरला. 

आज सकाळी 9.15 वा. पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर पोलीस वाहनातून त्यांनी संचलन करणाऱ्या पथकांचे निरीक्षण केले. आजच्या परेडचे नेतृत्व पोलीस उपअधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी केले.  

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र सैनिक, वारसपत्नी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

आज या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांना अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपलब्धीसाठी त्यांचा सत्कारही करण्यात आला. 

यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी केंद्र व राज्य शासनाने शेती आणि अपारंपरिक ऊर्जेच्या स्त्रोतांना शाश्वत सुत्रामध्ये बांधण्याचे धोरण अधोरेखीत केले. जिल्ह्यातील सिंचन सुविधा आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी किवळा साठवण तलाव पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणल्यास सिंचन क्षमता आणखी वाढेल. यासाठी तातडीने शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या सूचना केल्या. 

भारताला अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात भरारी घ्यायची आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात जोरदार पावले टाकणे सुरू केली आहेत. दावोसमधील नुकत्याच झालेल्या व्यापारी करारामध्ये मोठे प्रकल्प अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतामध्ये होत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे या क्षेत्रात नांदेड जिल्हा अग्रेसर राहील यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतासोबतच शेतीच्या शाश्वत विकासाची हमी बारमाही सिंचन सुविधांनी वाढविण्यासाठी त्यांनी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, शेततळे व जलसंधारणाच्या अन्य कामाकडे जिल्ह्यामध्ये पुढील काळात लक्ष दिले जाईल असे सुतवाच केले. 

शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र व राज्याच्या कृषी क्षेत्राशी संबंधित प्रधानमंत्री किसान योजना, नमो सन्मान योजना, पिक विमा योजना तसेच खते बियाणे कीटकनाशके याच्या खरेदीसाठी पतपुरवठा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी यंत्रणेला दिले. जिल्ह्यात सुरू असलेल्या उच्च मूल्य शेती अभियानाचे त्यांनी कौतुक केले मात्र नैसर्गिक शेती क्षेत्रात वाढ करण्याचे लक्ष्य त्यांनी यावेळी निर्धारित केले.

गेल्या वर्षी झालेल्या शेतीच्या नुकसानी संदर्भात 812 कोटीची मदत शासनाकडून करण्यात आली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पशुसंवर्धन दुग्धविकास याबाबत जिल्ह्याच्या प्रगतीला वाव असल्याचे सांगताना त्यांनी पशुधनाची जी जनगणना सध्या सुरू आहे त्यामध्ये पशुपालकांनी शेतकऱ्यांनी प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहनही या व्यासपीठावरून केले. 

राज्य शासनाच्या लोकप्रिय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करीत त्यांनी जिल्ह्यातील साडेआठ लाख महिला लाभार्थ्यांचे शासनाला साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले लाडकी बहीण योजना यापुढेही कायम सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात पदभरती सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी केला मराठा समाजासाठी मोठ्या प्रमाणात अण्णासाहेब पाटील योजनेतून कर्ज वितरण सुरू आहे त्याचा लाभ घेण्याच्या आवाहन त्यांनी केले. 122 कोटीचा व्याज परतावा या योजनेतून शासनाने उद्योग व्यवसाय स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांसाठी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध घरकुल योजनांमध्ये ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरे देण्यासाठी यंत्रणा आणखी गतिशील करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. घरकुल व आवास योजनेसंदर्भातील उर्वरित सर्व प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे त्यांनी सुचविले. 

अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यांक इतर मागासवर्गीय भटक्या विमुक्त जातीसाठींच्या असणाऱ्या विविध योजना तसेच तृतीयपंथीयांसाठी असणाऱ्या योजनांची 100 टक्के अंमलबजावणी जिल्ह्यातील झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या संबोधनात यावेळी केली. 

समाज कल्याण विभागामार्फत वसतिगृहांच्या योजनेत कोणत्याही घटकातील विद्यार्थी सुविधांशिवाय वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी विभागांना सुचविले. 

आरोग्य यंत्रणेने वंध्यत्व निवारणासारख्या समस्येवर सार्वत्रिक प्रयत्न सुरू केल्याबद्दल समाधान त्यांनी व्यक्त केले सोबतच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात यावी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय सुविधा औषधोपचार व तात्काळ प्रतिसाद अधिक गतिशील करण्याबाबत त्यांनी यावेळी यंत्रणेला सूचना केली. 

नांदेडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील व राज्यस्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजन क्रीडा विभागामार्फत होत आहे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विभागामध्ये नांदेडकडे क्रीडा विषयक अधिक सुविधा आहेत त्यामुळे नांदेड शिक्षणाप्रमाणेच खेळातही स्पोर्ट्स हब व्हावे ,अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात शेवटी व्यक्त केली.यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उपलब्धीसाठी प्रमाणपत्र बहाल केले.

चित्ररथ ठरले लक्षवेधी

यावर्षी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वेगवेगळ्या विभागांना मोठ्या प्रमाणात आपल्या उपलब्धीला चित्ररथाच्या स्वरूपात मांडण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत अनेक विभागांनी आपले चित्ररथ तयार केले होते पालकमंत्र्यांनी या चित्ररथाचे निरीक्षण केले. महानगरपालिका, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, समाज कल्याण विभाग व क्रीडा विभागाचे चित्ररथ लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली नाथू, रविंद्र पांडागळे यांनी केले.

0000






























    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...