Wednesday, September 17, 2025

वृत्त क्रमांक 975

हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन 

नांदेड, दि. 17 सप्टेंबर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती सार्वजनिक वाचनालय, बिलोली आणि हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालय, अर्जापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व माजी आमदार अॅड. गंगाधर पटने आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर अर्जापूर येथील प्रदर्शनाचे उद्घाटन मुकींदर कुडके यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्मलकुमार सुर्यवंशी हे होते. त्यांच्या हस्ते वाचनप्रेमींना प्रतीकात्मक स्वरूपात पुस्तके देण्यात आली. उद्घाटनापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या भव्य प्रदर्शनात 50 हजारांहून अधिक ग्रंथ वाचकांसाठी खुले करण्यात आले होते. इतिहास, साहित्य, चरित्र, विज्ञान, समाजशास्त्र अशा विविध विषयांवरील दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करण्यात आले. विशेष म्हणजे वाचकांना आवडते पुस्तक थेट प्रदर्शनातून घरी नेऊन वाचण्याची संधी देण्यात आली. कोणतेही शुल्क अथवा डिपॉझिट न घेता, फक्त अभिप्राय नोंदवून पुस्तक परत करण्याची ही अभिनव पद्धत राबविण्यात आली.

या वेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे, सचिव निर्मलकुमार सुर्यवंशी, सहसचिव संजय पाटील, संचालक कुबेर राठोड, विविध वाचनालयांचे अध्यक्ष, ग्रंथपाल, मान्यवर तसेच पत्रकार माधव पटने व प्रा. शंकर पवार उपस्थित होते. मान्यवरांनी ग्रंथसंपदेचे कौतुक करून वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोंडावार सर यांनी केले. प्रास्ताविक वाचनालय पदाधिकाऱ्यांनी तर आभारप्रदर्शन ग्रंथपालांच्यावतीने करण्यात आले.

००००




No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...