Tuesday, April 29, 2025

 वृत्त क्रमांक 454 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

 

नांदेड दि. 29 एप्रिल :- महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस समारंभ गुरूवार 1 मे 2025 रोजी वजिराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावेअसे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालयसंस्थाआदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नयेअसेही आवाहन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमसमारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाहीयाची दक्षता संबंधितानी घ्यावीअसेही आवाहनही केले आहे.

 

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस समारंभ गुरूवार 1 मे 2025 रोजी साजरा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे 28 एप्रिल 2025 रोजी परिपत्रक निर्गमित झाले आहे. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी कार्यक्रमाचे आयोजन करावेअसे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.

00000



 मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

मुंबई, दि.२९: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

वेव्हज २०२५ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.

००००



 वृत्त क्रमांक 454

बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ

अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती कार्यक्रम

नांदेड, दि. २९ एप्रिल :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपजिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रुपाली रंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, गजानन जिदंमवार, बी.पी. बडवने, युनिसेफच्या मोनाली धुर्वे तसेच जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक अरुण कांबळे, निलेश कुलकर्णी, आशा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून देत, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था व युनिसेफ यांच्या संयुक्त पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात नागरिकांनी बालविवाहास थारा देऊ नये आणि समाजात बालविवाहविरोधी संदेश पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००






 वृत्त क्रमांक 453 

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 29 एप्रिल :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे 30 एप्रिल व 1 मे रोजी दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील 

बुधवार 30 एप्रिल 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे रात्री 9.30 वा. आगमन व राखीव. 

गुरूवार 1 मे 2025 रोजी सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून पोलीस कवायत मैदान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8 वा. पोलीस कवायत मैदान नांदेड येथे आगमन व महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजिराबाद नांदेड. सकाळी 9 ते 9.45 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे अभ्यांगतांच्या भेटीसाठी राखीव. सकाळी 10 ते 10.45 वाजेपर्यंत नमस्ते नांदेड उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- दैनिक सत्यप्रभा कार्यालय नांदेड. सकाळी 11 वा. जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2025 पूर्व आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 12.45 वा. अमरनाथ राजुरकर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव. दुपारी 1.15 ते 2.30 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील व शहरातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- कुसुम सभागृह नांदेड. दुपारी 2.30 वा. कुसुम सभागृह नांदेड येथून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

0000

 

 वृत्त क्रमांक 452 

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई  

·  ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन   

नांदेड दि. 29 एप्रिल :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.  

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

  वृत्त क्रमांक   515 मधुमित्र व मधुसखी पुरस्काराचे नाशिक येथे वितरण    नांदेड दि. 20 मे :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावती...