Wednesday, December 21, 2022

 विशेष वृत्त


मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या

नागोजी नाईक यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण

 

·   श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पालखीचा बहुमान अनेक पिढ्यांपासून नाईक घराण्याकडे

·    जिल्हा परिषदेच्यावतीने विविध विभागाचे स्टॉल्स

·   पशुधनासाठी यात्रा कालावधीत 24 तास वैद्यकिय सुविधा

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील खंडोबाच्या पालखीला नाईक घराण्याचा मान हा अनेक पिढ्यांपासूनचा आहे. माळेगाव पासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या रिसनगावचे हे नाईक कुटुंब. या घराण्यातील नागोजी नाईक यांनी सन 1809 च्या अगोदर निझामशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी बंड पुकारले. त्यांना पकडून कंधार येथे निझामाने तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने नाईक घराण्याने दिलेल्या बलिदानाचे संपूर्ण नांदेड जिल्हा कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत आहे.  

 

खंडोबा हे महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धेचे दैवत आहे. माळेगाव हे खंडोबाचे पवित्र स्थान म्हणून गणल्या गेले आहे. खंडोबाच्या मंदिराचे काम 17 व्या शतकात झाले असावे. मंदिर व यात्रेची व्यवस्था निजाम राजवटीत कंधार परगण्याचे राजे गोपालसिंघ कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद यांच्याकडे असल्याचा उल्लेख आहे. मुळात 13 व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या अधिष्ठानावर नंतरच्या काळात हे मंदिर उभारण्यात आले.

 

दरवर्षी माळेगावची यात्रा खंडोबाचा उत्सव म्हणून मार्गशीष मधील एकादशीला सुरु होते. येथील गुरांचा बाजार, विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जात पंचायती हे या यात्रेचे अलिकडच्या चार दशकात वैशिष्ट्ये म्हणून नावारुपास आले आहे. या यात्रेला सुमारे 300 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असल्याने येथील विविध शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाटक असा समृद्ध मराठी लोककला संस्कृतीचा अविष्कार पाहायला मिळतो. यावर्षी गायवर्गात आढळणाऱ्या लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. याचबरोबर माळेगावसह अन्य कुठेही गो वर्गीय पशुधनाच्या प्रदर्शन, मेळावे, खरेदी-विक्री, वाहतूक यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तथापि इतर आश्व, श्वान, कुक्कुट व शेळीगट यांच्या स्पर्धा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने केले आहे.

 

जिल्हा परिषदेच्यावतीने याठिकाणी लोककल्याणकारी योजनांचे विविध स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कृषि विभाग, पशुसंवर्धन, समाज कल्याण व इतर विभागांचा समावेश आहे. या यात्रेत आश्व, श्वान, कुक्कुट व इतर प्राण्यांची संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यात्रा कालावधीत 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभाग सतर्क ठेवण्यात आला आहे. माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रमास  कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 20 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्रीपासून ते 28 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक माणिक डोके यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत. 

0000 

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश   

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 8 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 8 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजनेच्या

प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचे प्रस्ताव ऑनलाईन भरुन त्याची सत्यप्रत समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेल्या 285 बचतगटांचे प्रस्ताव ऑनलाईन भरुन त्याची एक सत्यप्रत कार्यालयाकडे सादर केली आहे. ऑनलाईन प्रस्ताव सादर केलेल्या सर्व बचतगटांच्या प्रस्तावाची तपासणी केली असता, त्यामध्ये काही बचतगटाच्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या आहेत. या बचतगटांनी त्यांच्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता बुधवार 28 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

या योजनेअंतर्गत इच्छूक लाभार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात व शासन निर्णयातील अटी, शर्तींची पुर्तता करुन पात्र बचतगटांना लाभ देण्यात येतो.  ज्या बचत गटांच्या प्रस्तावामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. अशा बचतगटांना ऑनलाईन त्यांच्या प्रस्तावातील त्रुटींबाबत संदेश पाठविण्यात आलेला आहे.

00000

 मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत

नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना ही दिनांक 17 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयाने सन 2022-23 पासुन पुढील पाच वर्ष सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे.  यात तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबीया, मसाला आदी पिक समुह आधारित प्रक्रिया उद्योगाशी निगडीत काढणी पश्चात पुर्व प्रक्रियेमध्ये केंद्राचा समावेश आहे. ही योजना क्रेडिट लिंकड बॅक एन्डेड सबसिडी या तत्वानुसार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आपल्या प्रकल्पासाठी बँकेची कर्ज मंजुरी घेतल्यानंतर विहीत नमुन्यात अर्ज, सविस्तर प्रकल्प आराखडा व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 30 डिसेंबर 2022 पर्यंत  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

या योजनेत तीन उपघटकांचा समावेश आहे. यात कृषि व अन्न प्रक्रिया प्रस्थापना (नवीन प्रकल्प उभारणी), कार्यरत असलेल्या कृषि व अन्न प्रक्रिया उद्योगाचे स्तरवृध्दी विस्तारीकरण व आधुनिकीकरण करणे, मूल्यवर्धन, शितसाखळी आणि साठवणूकीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे. यासाठी पात्र लाभार्थी, वैयक्तीक उद्योजक, सक्षम शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, नव उद्योजक, ॲग्रीगेटर, भागीदारी प्रकल्प, भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक गट-संस्था-कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था व खाजगी संस्था हे आहेत. सदरील योजनेत कारखाना मशीनरी व प्रक्रिया प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी दालने यांच्या बांधकाम खर्चाच्या 30 टक्के अनुदान (कमाल मर्यादा 50 लाख रुपये) अनुदान देय आहे. तसेच अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी CFTRI, NIFTEM, SAU इत्यादी केंद्र / राज्य संस्थांकडुन प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती साठी प्रशिक्षण शुल्काच्या 50 टक्के आर्थिक सहाय्य देय राहील, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे 

- जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस हे शारिरीक, मानसिक व बौद्धिक वाढीसाठी महत्त्वाचे असतात. बाळाच्या जीवनातील हा सुवर्णकाळ आहे.  स्तनपानासंबंधी समाजातील गैरसमजुती व चुकीच्या प्रथा दूर करण्यासाठी जनजागृती करावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.

 

महिला व बालविकास विभागाच्यावतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्तनपान व शिशु पोषण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  रेखा काळम-कदम, युनिसेफचे राज्य सल्लागार पी. डी. सुदामे यांची उपस्थिती होती. स्तनपानामुळे बाळाच्या पोषणासह बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही वाढते, असे मत संदीप माळोदे यांनी व्यक्त केले.

 

यावेळी युनिसेफचे पी. डी. सुदामे ह्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत त्याची लांबी 86 सेंटीमीटर होऊ शकते, बाळ 75 टक्के हुशार होऊ शकते, बाळाचे वजन 12 कि.ग्रॅ. पर्यंत वाढू शकते. यासाठी गरोदर माता व स्तनदा माता यांनी गरोदरपणात दिवसातून चार वेळेस आहार घेणे आवश्यक आहे. कुटुंबातून यासाठी मातेला मदत, प्रोत्साहन व संरक्षण प्रत्येक सदस्याने द्यावे. बाळंतपण दवाखान्यातच करावे. जन्म झाल्यावर आईचा व बाळाचा एकमेकाला स्पर्श करून स्तनपानाची सुरुवात करावी, पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपान करावे, सहा महिने पूर्ण झाल्यावर घरगुती स्वच्छतापूर्वक बनवलेला पुरेसा व मऊसर आहार बाळास सुरू करून किमान दोन वर्षे आपले दूध बाळाला पाजावे. 


स्तनपान देताना व भरवताना बाळाशी संवाद साधावा. स्तनपान व योग्य पूरक आहारामुळे 20 टक्के बालमृत्यू टाळता येतात हा संदेशही उदाहरणांद्वारे त्यांनी पटवून दिला. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका यांनी सदर प्रशिक्षण त्यांच्या विभाग स्तरावर राबवून अंगणवाडी सेविका यांना या ज्ञानाचे दूत करून घरोघरी हे ज्ञान पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सोनवणे तर उपस्थितांचे आभार विशालसिंग चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका ह्यांची उपस्थिती होती.

00000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...