Wednesday, December 21, 2022

 बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस महत्त्वाचे 

- जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस हे शारिरीक, मानसिक व बौद्धिक वाढीसाठी महत्त्वाचे असतात. बाळाच्या जीवनातील हा सुवर्णकाळ आहे.  स्तनपानासंबंधी समाजातील गैरसमजुती व चुकीच्या प्रथा दूर करण्यासाठी जनजागृती करावी, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.

 

महिला व बालविकास विभागाच्यावतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्तनपान व शिशु पोषण या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  रेखा काळम-कदम, युनिसेफचे राज्य सल्लागार पी. डी. सुदामे यांची उपस्थिती होती. स्तनपानामुळे बाळाच्या पोषणासह बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही वाढते, असे मत संदीप माळोदे यांनी व्यक्त केले.

 

यावेळी युनिसेफचे पी. डी. सुदामे ह्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत त्याची लांबी 86 सेंटीमीटर होऊ शकते, बाळ 75 टक्के हुशार होऊ शकते, बाळाचे वजन 12 कि.ग्रॅ. पर्यंत वाढू शकते. यासाठी गरोदर माता व स्तनदा माता यांनी गरोदरपणात दिवसातून चार वेळेस आहार घेणे आवश्यक आहे. कुटुंबातून यासाठी मातेला मदत, प्रोत्साहन व संरक्षण प्रत्येक सदस्याने द्यावे. बाळंतपण दवाखान्यातच करावे. जन्म झाल्यावर आईचा व बाळाचा एकमेकाला स्पर्श करून स्तनपानाची सुरुवात करावी, पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपान करावे, सहा महिने पूर्ण झाल्यावर घरगुती स्वच्छतापूर्वक बनवलेला पुरेसा व मऊसर आहार बाळास सुरू करून किमान दोन वर्षे आपले दूध बाळाला पाजावे. 


स्तनपान देताना व भरवताना बाळाशी संवाद साधावा. स्तनपान व योग्य पूरक आहारामुळे 20 टक्के बालमृत्यू टाळता येतात हा संदेशही उदाहरणांद्वारे त्यांनी पटवून दिला. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका यांनी सदर प्रशिक्षण त्यांच्या विभाग स्तरावर राबवून अंगणवाडी सेविका यांना या ज्ञानाचे दूत करून घरोघरी हे ज्ञान पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सोनवणे तर उपस्थितांचे आभार विशालसिंग चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका ह्यांची उपस्थिती होती.

00000




No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्र.   74   नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन चा जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार   ·          विद्यार्थ्या...