Tuesday, August 1, 2017

महसूल दिन उत्साहात संपन्न
          
नांदेड दि. 1 :-  जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्यावतीने महसूल दिन डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आज उत्साहात संपन्न झाला. महसूल दिन कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडीत विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित होते. मनपा आयुक्त गणेश देशमुख, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
         यावेळी जिल्ह्यातील 53 सेवानिवृत्‍त अधिकारी, कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्‍या एकुण 27 गुणवंत पाल्‍यांना डिक्शनरी व प्रशिस्‍तीपत्र देऊन सन्‍मान करण्‍यात आला. तसेच जिल्‍हयातील एकूण 52 उत्‍कृष्‍ट अधिकारी कर्मचारी यांचा प्रशिस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी यांनी  केले.
           सुत्रसंचलन नायब तहसिलदार मुगाजी काकडे, श्रीमती स्नेहलता स्‍वामी यांनी केले. कार्यक्रमास जिल्‍हयातील महसूल अधिकारी, कर्मचारी बहुसंख्‍येने उपस्थित होते. शेवटी नायब तहसिलदार श्री काकडे यांनी आभार मानले.
00000


लोकराज्यचा अंक प्रकाशित
           नांदेड दि. 1 :- "महाकर्जमाफी" चा आढावा घेणारा ऑगस्ट‍ महिन्याचा लोकराज्यचा अंक नुकताच प्रकाशित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे सविस्तर विश्लेषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले. त्यासंबंधीचा वृत्तांत हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
वस्तू व सेवाकर अधिनीयम 1 जुलै पासून देशभर लागू झाला. राज्याने त्याचे कशाप्रकारे स्वागत केले या संबंधीचा लेख या अंकात घेण्यात आला आहे. राज्य शासनाने यावर्षी 4 कोटी वृक्षलागवडीचा निर्धार केला होता. या मोहीमेचे यश, इको टास्क फोर्स बटालियन व लावलेले वृक्ष, स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 70 वर्षांमध्ये देशाने कोणकोणत्या क्षेत्रात आघाडी घेतली यासंबंधीचा थोडक्यात आढावा, सौर ऊर्जेद्वारे आवश्यक तेवढी वीज घरीच कशी तयार करायची याचे मार्गदर्शन, कृषी माल निर्यात करण्यासाठीचे प्रशिक्षण, क्रीडा विभागाच्या योजना असे विविध लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
जलयुक्त शिवार, स्वच्छतेची सप्तपदी, आपला गाव, कृषी यशकथा, सायबर महागुरू, स्पर्धा परीक्षा, प्रेरणा, आरोग्य, नोंदी, स्मरण आदी सदरांमधील माहिती प्रेरणादायी व उपयुक्त आहे. या माहितीपूर्ण व संग्राह्य अंकाची किंमत 10 रुपये एवढी आहे.

000000
विद्यार्थ्यांनी तंबाखू पदार्थांपासून दूर रहावे
- डॉ. गवई
           नांदेड दि. 1 :-  तंबाखूच्या सेवनामुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम होतात. विद्यार्थ्यांनी तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थापासून दूर राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. डी. यु. गवई यांनी केले.
           जिल्हा रुग्णालयाच्यावतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग दिन व सप्ताह निमीत्त सायन्स महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी तंबाखुच्या दुष्परीणामाबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरुन  प्राचार्य डॉ. गवई बोलत होते.
यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ. रोशनी चव्हाण, प्रा. डॉ. वी. बी. चव्हाण, प्रा. डी. बी. देशमुख, प्रा. डॉ. एल. पी. शिंदे, जिल्हा रुग्णालयातील सदाशिव सुवर्णकार, बालाजी गायकवाड उपस्थित होते.

डॉ. चव्हाण यांनी तंबाखूच्या  सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत साजरा केला जात असलेल्या  कर्करोग सप्ताहबद्द श्री. गायकवाड यांनी माहिती दिली. प्रास्ताविक प्रा. डॉ.  देशमुख यांनी तर सुत्रसंचलन डॉ. चव्हाण यांनी केले.
00000000
जिल्हा कारागृहात फिरते कायदे विषयक शिबीर संपन्न
           नांदेड दि. 1 :-   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांच्या आदेशानुसार जिल्हा कारागृह नांदे येथे नुकतेच कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  
         या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे, फिरत्या लोकन्यायालयाचे पॅनल प्रमुख सेवानिवृत्त न्यायाधीश भीमराव नरवाडे पाटील, अॅड. प्रविण अयाचित, अॅड. एम. एल. गायकवाड, अॅड. प्रदिप शिंदे  हे उपस्थित होते.  
          जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी प्ली बारगिनिंग बाबत माहिती देतांना 7 वर्षा पेक्षा कमी शिक्षा असलेल्या किरकोळ स्वरूपाच्या गुन्हयाची कबुली बंदयांनी केली तर प्ली बारगिनिंग रु ते प्रकरण लवकर निकाली काढण्यास मदत होते, असे सांगीतले. जामिनाच्या तरतूदी, न्यायाधीन बंदी सिध्ददोष बंदी यांचे अधिकार या विविध विषयावरील कायदची माहिती यावेळी बंदयांना देण्यात आली.
          सेवानिवृत्त न्यायाधीश पाटील यांनी एकमेकाबद्दल भेदभाव करता आपल्या क्रोधावर आवर घालण्याचे आवाहन केले. या एका सेकंदाच्या क्रोधामुळेच आपल्या आयुष्यातील बहुमुल्य क्षण आपण कारागृहात वाया घालवत आहात. कारागृहातील बंदयांच्या हक्कांविषयी त्यांना मिळणारा जाम याविषयी वेगवेगळी उदाहरणे देवून बंद्यांना मार्गदर्शन केले
           प्रास्ताविक सुत्रसंचालन अॅड. अयाचित यांनी केले तर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक,  जी. के. राठोड यांनी आभार मानले.  कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी कारागृहातील कर्मचारी यांनी केले.

000000
लहान मुले एक कोरी कॅसेट त्यांना
 जसे शिकविले तसे शिकतात  - न्या. वसावे
           नांदेड दि. 1 :- लहान मुले म्हणजे कोरी कॅसेट आहे, त्यामध्ये जे साठवले ते साठून राहते. अर्थात लहान मुलांना जसे शिकविले तसे ते शिकतात. म्हणून त्यांना घडवण्याचे कार्य हे माता-पित्याचे असते, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे यांनी  केले.
          
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडतर्फे 31 जुलै  रमाबाई बहुउद्येशिय सेवाभावी संस्था तरोडा (खु), नांदेड येथे ‘‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’’ या विषयावर कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन न्या वसावे बोलत होते..
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. वसावे पुढे म्हणाले की, गर्भजल परिक्षण बंदी कायदा, बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 याबा मार्गदर्शन केले. गर्भजल परिक्षणाविषयी बोलताना त्यांनी अल्ट्रा साऊंड सिस्टिमचा गर्भलिंग निदानासाठी केला जाणारा दुरूपयोग याबाबत माहिती दिली. चाडेचार महिन्यांतरच्या अर्भकाचा गर्भपात केल्यास गर्भवती महिलेच्या जीवास धोका होण्याची शक्यता अधिक असल्याने हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यातील दोषी गर्भपात करणारा-करविणारा यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचा कायदा आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या प्रकरणांमध्ये खावटीच्या केसेस वाढत असल्याचे त्यांनी सांगीतले. 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण हा मुलांचा हक्क असून, एखादया शिक्षण संस्थेने प्रवेशासाठी प्रवेश पुर्व परिक्षा घेणे, त्याच्यासाठी शुल्क आकारल्यास त्या संस्थेस 20 हजार रुपयांपर्यंत  दंड होवू शकतो असे श्री. वसावे यांनी सांगीतले.
तत्पुर्वी अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष जगजीवन भेदे, अॅड. श्रीमती गितांजली सुकळकर, अॅड. पी. जी. हाणवते, अॅड. श्रीमती व्ही. व्ही. गणोरे, शिवाजी पवार, अॅड. वैशाली ढवळे, राज गोडबोले यांनी उपस्थितांना जिजामाता, सावित्रीबाई फुले, रमाबाई, सुनिता विल्यम्स आदी स्त्रियांची विविध उदाहरणे देवून मुलगा आणि मुलगी यामध्ये कुठलाही भेदभाव करण्याचे सांगून उपस्थितांना गर्भधारणा पुर्वी नंतर गर्भलिंग निदान प्रतिबंधक अधिनियम भृणहत्या या कायद्या विषयी उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अनुराधा मठपती यांनी केले. सुत्रसंचालन आभार अॅड. नय्युम खान पठाण यांनी केले. यावेळी तरोडा भागातील महिलांनी उत्फुर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी रमाबाई बहुउद्येशिय सेवा भावी संस्थेचे सदस्ययांनी परिश्रम घेतले.

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...