Tuesday, August 1, 2017

लहान मुले एक कोरी कॅसेट त्यांना
 जसे शिकविले तसे शिकतात  - न्या. वसावे
           नांदेड दि. 1 :- लहान मुले म्हणजे कोरी कॅसेट आहे, त्यामध्ये जे साठवले ते साठून राहते. अर्थात लहान मुलांना जसे शिकविले तसे ते शिकतात. म्हणून त्यांना घडवण्याचे कार्य हे माता-पित्याचे असते, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे यांनी  केले.
          
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडतर्फे 31 जुलै  रमाबाई बहुउद्येशिय सेवाभावी संस्था तरोडा (खु), नांदेड येथे ‘‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’’ या विषयावर कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन न्या वसावे बोलत होते..
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. वसावे पुढे म्हणाले की, गर्भजल परिक्षण बंदी कायदा, बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 याबा मार्गदर्शन केले. गर्भजल परिक्षणाविषयी बोलताना त्यांनी अल्ट्रा साऊंड सिस्टिमचा गर्भलिंग निदानासाठी केला जाणारा दुरूपयोग याबाबत माहिती दिली. चाडेचार महिन्यांतरच्या अर्भकाचा गर्भपात केल्यास गर्भवती महिलेच्या जीवास धोका होण्याची शक्यता अधिक असल्याने हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यातील दोषी गर्भपात करणारा-करविणारा यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचा कायदा आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या प्रकरणांमध्ये खावटीच्या केसेस वाढत असल्याचे त्यांनी सांगीतले. 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण हा मुलांचा हक्क असून, एखादया शिक्षण संस्थेने प्रवेशासाठी प्रवेश पुर्व परिक्षा घेणे, त्याच्यासाठी शुल्क आकारल्यास त्या संस्थेस 20 हजार रुपयांपर्यंत  दंड होवू शकतो असे श्री. वसावे यांनी सांगीतले.
तत्पुर्वी अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष जगजीवन भेदे, अॅड. श्रीमती गितांजली सुकळकर, अॅड. पी. जी. हाणवते, अॅड. श्रीमती व्ही. व्ही. गणोरे, शिवाजी पवार, अॅड. वैशाली ढवळे, राज गोडबोले यांनी उपस्थितांना जिजामाता, सावित्रीबाई फुले, रमाबाई, सुनिता विल्यम्स आदी स्त्रियांची विविध उदाहरणे देवून मुलगा आणि मुलगी यामध्ये कुठलाही भेदभाव करण्याचे सांगून उपस्थितांना गर्भधारणा पुर्वी नंतर गर्भलिंग निदान प्रतिबंधक अधिनियम भृणहत्या या कायद्या विषयी उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अनुराधा मठपती यांनी केले. सुत्रसंचालन आभार अॅड. नय्युम खान पठाण यांनी केले. यावेळी तरोडा भागातील महिलांनी उत्फुर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी रमाबाई बहुउद्येशिय सेवा भावी संस्थेचे सदस्ययांनी परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...