Thursday, October 20, 2016

शाळा, महाविद्यालय संच मान्यतेसाठी
सोमवार पासून नांदेडमध्ये शिबीर
नांदेड दि. 20 :- शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यांच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील अनुदानीत कनिष्ठ माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांचे सन 2016-17 ऑफ लाईन संच मान्यता शिबीर 24 ऑक्टोंबर ते 25 ऑक्टोंबर रोजी यशवंत कनिष्ठ महाविद्यालय नांदेड येथील ग्रंथालयात आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार 24 ऑक्टोंबर रोजी उमरी, मुदखेड, माहूर, लोहा, बिलोली, हिमायतनगर, किनवट तर मंगळवार 25 ऑक्टोंबर रोजी देगलूर, धर्माबाद, अर्धापूर, भोकर, हदगाव, नायगाव, नांदेड, कंधार असे वेळापत्रक आहे.
प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी शिबिरामध्ये उपस्थित राहून सन 2016-17 ची ऑफ लाईन संच मान्यता करुन घेण्याची जबाबदारी राहील. संच मान्यता प्रस्तावासोबत 1 ते 12 कागदपत्रे व विहित प्रपत्रामध्ये माहिती सोबत आणावी. प्रस्तावाची फाईल शिबिरामध्ये सादर करावी. संच मान्यता प्रत नोव्हेंबर 2016 च्या वेतन देयकासोबत सादर करणे अनिवार्य आहे. सर्व अनुदानीत उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता करुन घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.

0000000
 रास्तभाव धान्य दुकानात
नोव्हेंबर साठीची साखर उपलब्ध
नांदेड दि. 20 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी नोव्हेंबर 2016 साठीची साखर रास्त भाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे. 
या नियतनानुसार  प्रती  व्यक्ती 500 ग्रॅम प्रमाणे साखर प्रौढ अथवा मुल-बालक अशा भेदभाव न करता शिधापत्रिकाधारकांना साखर वितरीत करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याला आवश्यक 4 हजार 575 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड-511, हदगाव-381, किनवट-546, भोकर-177, बिलोली-294, देगलूर-271, मुखेड-523, कंधार-358, लोहा-318, अर्धापूर-126, हिमायतनगर-190, माहूर-188, उमरी-150, धर्माबाद-152, नायगाव-251, मुदखेड-139. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घेवून स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहनही  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
सैन्य, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी
अनुसूचित जाती, नवबौध्द युवकांना संधी
25 ऑक्टोंबर रोजी नांदेड येथे निवड शिबिर
नांदेड दि. 20 :- अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील युवकांसाठी अमरावती येथे आयोजित सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी मंगळवार 25 ऑक्टोंबर 2016 रोजी नांदेड जिल्हयातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी ईच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्य आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केलेले आहे.
            सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य, , क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींना सैन्य व पोलीस भरती करण्याकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे. प्रशिक्षणार्थी 38 पैकी 30 टक्के महिला आरक्षण असल्याने 27 पुरुष व 11 महिला प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी पात्र अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
            उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वयोगटातील असावे. उमेदवाराची पुरुष उंची 165 से.मी व महिला उंची 155 से.मी. छाती न फुगवता पुरुष 79 से.मी. (फुगवुन 84 से.मी. ) असावी. शैक्षणिक पात्रता इय्यता 12 वी पास. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नोंदणी आणि ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारिरीक व मानसिक दृष्टया निरोगी असावा.
            प्रशिक्षणाच्या निवडीसाठी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतीनी मंगळवार 25 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह एलआयसी कार्यालय, नांदेड च्या  पाठीमागे मूळ कागदपत्रासह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे . हजर राहिलेल्या उमेदवारांना जाण्या येण्याचा भत्ता दिला जाणार नाही. यांची नोंद घ्यावी , असे नांदेडचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी कळविले आहे.

                                                                  00000
लिडकॉमतर्फे थकबाकीदार लाभार्थ्यांना
वसुलीबाबत आवाहन
नांदेड, दि. 20 :-  संत रोहिदास चर्मोद्याग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील ज्या लाभार्थ्यांनी महामंडळाकडून कर्ज घेतले आहे त्यांनी महामंडळाच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक खात्यात आपली दरमहा देय वसुली जमा करावी, असे आवाहन महामंडळाच्यावतीने जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
महामंडळाच्या संबंधीत लाभार्थीने महामंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून आपली वसुली भरुन महामंडळास सहकार्य करावेत. महामंडळाचा पत्ता संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नमस्कार चौक बायपास रोड नांदेड येथे वसुली भरावेत किंवा जिल्हा व्यवस्थापकाच्या वसुली दौऱ्या दरम्यान वसुली भरुन घ्यावेत.
लाभार्थ्यांनी महामंडळाच्या खात्यावर, महामंडळाच्या कार्यालयात किंवा जिल्हा व्यवस्थापकाच्या वसुली दरम्यान वसुलीत वाढ होण्यासाठी हातभार लावण्यात यावा. जेणे करुन समाजातील बांधवांना पुन्हा महामंडळाचे कर्ज देणे, मंजूर करणे सोयीस्कर होईल याची नोंद घेवून वसुलीत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

0000000
  केळी पिक संरक्षणासाठी संदेश
नांदेड, दि. 20  :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापूर या तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत तीन किड सर्वेक्षक पिकावरील किड व रोगाचे सर्वेक्षण सुरु असून त्याआधारे पिक संरक्षणासाठी पुढील प्रमाणे संदेश देण्यात येत आहे.
केळीच्या खालील भागातील पानावर लहान-लहान पिवळे ठिपके आढळून आल्याबरोबर डायमेथोएट उदा. डायथेन एम-45 किंवा डायथेन झेड-78 या बुरशी नाशकांची फवारणी करावी. तसेच पानावरील रोगग्रस्त भाग काढून टाकावेत व डायथोकार्बोनेट या बुरशी नाशकांची फवारणी करावी, अशा संदेश उप विभागातील कृषि अधिकारी नांदेड यांनी दिला आहे.

000000
वाहन नोंदणीच्यावेळी रस्ता सुरक्षा निधी
अधिभार भरावा लागणार 
नांदेड, दि. 20 :- राज्य शासनाने रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रमासाठी राज्यात रस्ता सुरक्षा निधीची तरतूद केली आहे. दि. 17 ऑक्टोंबर 2016 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे वाहन प्रकार निहाय आकारावयाचा रस्ता सुरक्षा निधी अधिभार निश्चित केला असून तो पुढीलप्रमाणे आहेत.
मोटार वाहनाचे प्रवर्ग व कंसात उपकराचा दर (नवीन नोंदणीच्या वेळी किंवा स्थलांतरीत वाहनाची नोंद घेतेवेळे एकदाच वसूल करण्यात येईल.) एक रकमी कर भरणारी परिवहनेतर (खाजगी) संवर्गातील दुचाकी, तिचाकी व चारचाकी वाहने (एक रकमी देय कराच्या 2 टक्के). एक रकमी कर भरणारी हलकी मालवाहू वाहने (एक रकमी देय कराच्या 4 टक्के). वार्षिक कर भरणारी मध्यम व अवजड मालवाहू वाहने-(वार्षिक देय कराच्या 10 टक्के). (ऐच्छिक) एक रकमी कर भरणारी मध्यम व अवजड वाहने (एक रकमी देय कराच्या 2 टक्के). एक रकमी कर भरणारी कंत्राटी वाहने आसन क्षमता 6 अधिक 1 पर्यंत- (एक रकमी देय कराच्या 5 टक्के). वार्षिक कर भरणारी कंत्राटी वाहने  आसन क्षमता 6 अधिक 1 पर्यंत (वार्षिक देय कराच्या 5 टक्के). वार्षिक कर भरणारी कंत्राटी वाहने आसन क्षमता 7 अधिक 1 किंवा त्यापेक्षा जास्त (वार्षिक देय करांच्या 0.5 टक्के). वार्षिक कर भरणारी टप्पा वाहतुकीची वाहने (वार्षिक देय कराच्या 0.5 टक्के). वार्षिक कर भरणारी खाजगी सेवा वाहने (वार्षिक देय कराच्या 5 टक्के). यामध्ये समाविष्ट नसणारी इतर वाहनांसाठी (देयक कराच्या 5 टक्के) राहील.
हा अधिभार सोमवार 24 ऑक्टोंबर 2016 रोजी पासून लागू करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार राज्यात कायमस्वरुपी स्थालांतरीत होणाऱ्या वाहनांशी उपकराद्वारे रस्ता सुरक्षा निधी आकारण्यात येणार आहे. सर्वांनी या बाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000000
कायदासाथी प्रशिक्षण शिबीरात महिलांना मार्गदर्शन
नांदेड, दि. 20 :-  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तरोडा (बु.) नांदेड येथील कार्यालयात अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदासाथी शिबीर संपन्न झाले.
माविमद्वारे नांदेड शहरातील गरीब गरजू आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिलांचे एकूण 269 बचतगट स्थापन करून त्या माध्यमातून 3 हजार 211 महिलांना संघटीत करण्यात आले आहे. या महिलांचा आर्थिक, सामाजि राजकी दृष्टीने विकास व्हावा यासाठी माविम कार्य करीत आहे. त्यांना महिलांच्या संरक्षण कायदविषयी तसेच त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरूध्द कायदेशीर लढा देता यावा यासाठी बचतगटाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कायदासाथी या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. . आर. कुरेशी यांनी महिलांच्या अधिकाराबाबत त्यांच्या संरक्षणाबाबत असलेल्या विविध कायद्यांची विस्तृत माहिती देवून विविध कायद्यांच्या माहिती पत्रकांचे वाटप केले.
यावेळी अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश, जे. आर. पठाण, अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. एम. बिरादार, शिवाजीनगर, पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक श्री. पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भोंडवे, श्रीमती गंदेवार, अॅड. प्रविण अयाचित, अॅड. शिंदे, माविम जिल्हा समन्वयक अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी महिलांना मार्गदशन केले.

000000000
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 20 :-  राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल विकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 22 ऑक्टोंबर 2016 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 6.45 वा. नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 8 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने गंगाखेड जि. परभणीकडे प्रयाण करतील. सकाळी 11.45 वा. गंगाखेड येथून नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.50 वा. खाजगी विमानाने जुहू विमानतळ मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000

शहीद पोलिसांना मानवंदना

आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी संपूर्ण भारतभर 21 ऑक्टोबर हा दिवसपोलीस स्मृतीदिनम्हणून पाळला जातो. आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील 231 अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांना ही मानवंदना

देशाबाहेरील शत्रुंपासून राष्ट्राचे, राष्ट्रातील नागरिक, त्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय संरक्षण दलाच्या लष्कर, वायु सेना आणि नौदलातर्फे अहोरात्र पार पाडण्यात येत असते. तर देशांतर्गत शत्रूपासून, समाजविघातक कंटकांपासून नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे, कायदा सुव्यवस्था पाळण्याचे कर्तव्य संबंधित राज्याच्या पोलीस दलांकडून करण्यात येते.
आपले कर्तव्य बजावताना काही वेळा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वीरमरणदेखील पत्करावे लागते. अशाप्रकारे कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेले   पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरपोलीस स्मृतिदिनम्हणून पाळला जातो. त्याशिवाय भारतातील सर्व पोलीस दलांकडून कवायतींचे आयोजन करून 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट या कालावधीत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली जाते.
21
ऑक्टोबर हा पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्याचे कारण म्हणजे 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाखमधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादित निर्जन अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस दलातील 10 जवान गस्तीवर असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला कडवे आव्हान देत त्या 10 जवानांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि ते वीरगतीला प्राप्त झाले. त्या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दु:खाची छाया पसरली होती. या वीर पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना अतिशय उच्च कोटीचे शौर्य दाखवले होते. त्यांनी दाखविलेल्या त्या शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची राष्ट्रनिष्ठेची जाण प्रत्येकाच्या मनात तेवत राहावी, म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरपोलीस स्मृतिदिनया नावाने पाळला जातो.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी हे देखील वेळप्रसंगी आपल्या जिवाची बाजी लावून नागरिकांच्या जीविताचे मालमत्तेचे संरक्षण करण्यात तसूभरही कमी नाहीत. मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर,2008 रोजीच्या हल्ल्यात शहीद झालेले सहपोलीस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर, पोलीस निरीक्षक बापूराव धुरगूडे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भोसले, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, वाहनचालक अरुण चित्ते, पोलीस कॉन्स्टेबल सर्वश्री विजय खांडेकर, जयवंत पाटील, अंबादास पवार, योगेश पाटील आदींची शौर्यगाथा तर आपल्या मनावर कायमची कोरली गेली आहे.आपल्यासाठी शहीद झालेल्या या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कृतज्ञतापूर्ण मानवंदना.

-
देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती) (वृत्त).
Bottom of Form


समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...