Friday, May 24, 2024

 वृत्त क्र. 444

जेईई JEE (Advanced) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 24 मे :- जेईई JEE (Advanced)-2024 परीक्षा रविवार 26 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत दोन सत्रामध्ये नांदेड जिल्ह्यात 4 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या आयऑन डिजीटल झोन विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूर रोड विष्णुपुरी नांदेड,  राजीव गांधी कॉलेज कॅम्पसविद्युतनगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगावरोड समोर  नांदला दिग्रस खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात रविवार 26 मे 2024 रोजी  सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डीभ्रमणध्वनीपेजरफॅक्सझेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 443 

रुग्णांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देऊ 

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

· डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे  विविध विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा 

 

नांदेड दि. 24 मे :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधीऑक्सीजनसर्जिकल साहित्य तसेच किट्स व केमिकल्सकरीता लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत उपलब्ध करुन देण्यात येईलअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी येथे विविध विषयांबाबत आढावा बैठक आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेस्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलसचिवनांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्तअधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुखवैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाणनियोजन अधिकारी बालाजी डोळेमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

रुग्णालयाची संवेदनशीलता लक्षात घेता रुग्णालय परीसरामध्ये पोलीस चौकी उभारण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला.

 

नांदेड मनपाकडून रुग्णालयास नियमीतपणे पाणी पुरवठा करण्याबाबतवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यानी राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रगतीपथावर असलेल्या बांधकामाचा आढावा घेवून बांधकामाची गती वाढविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

 

आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रुग्णालय संकुलातील अपघात विभागआय.सी.यु/एस.आय.सी.युलेबर रुम अशा विविध विभागांचा राऊंड घेतला. त्यामध्ये  विविध विभागामधील कर्तव्यावरील डॉक्टरनर्सिंग स्टाफ तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. रुग्णालयामधील स्वच्छताबाहयरुग्ण तसेच आंतरुग्ण विभागातील रुग्णांच्या संख्येमध्येमधील वाढरुग्णालय परीसरातील डुकरांचा नायनाटइतर देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

0000



 लेख : 

पशुधनाचे ईअर टॅगिंग 1 जूनपासून बंधनकारक

 

कोरोनाचा आजारानंतर सार्वत्रिक साथीचे आजार समाजासाठी आव्हान ठरत आहे. मनुष्य प्राण्यांसोबत पशुंनाही साथीच्या आजाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहू नये यासाठी आधार कार्ड च्या धरतीवर पशुंसाठी ईअर टॅगिंग केले जात आहे. सुदृढनिरोगी व उपयोगी पशुधनासाठी एक जून पासून प्रत्येक पशुचे इअर टॅंगींग आवश्यक करण्यात आले आहे. जनावरांची खरेदी विक्री करताना देखील ही बाब आवश्यक करण्यात आली आहे. याची समस्त शेतकऱ्यांनीपशुपालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

 

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे सोयीचे व्हावे यादृष्टीनेएखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करणेपशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्यादृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात येत्या 1 जून 2024 पासून तर ईअर टॅग शिवाय पशुधनाची खरेदी-विक्री बंद करण्यात येणार आहे. पशुंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय संस्थादवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत  याचाही यात समावेश करण्यात आला आहे. याबाबत पशुपालकांनी नोंद घ्यावीअसे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सर्व पशुपालकांना नियमीतपणे करण्यात येत आहे.

 

पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम-2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पशुधनास ईयर टॅगिंग करणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे. बाजारात विक्रीसाठी  येणाऱ्या सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करणे गरजेचे आहे.  दिनांक 1 जून 2024 पासून तर ईअर टँग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्याआठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केले जाणार आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समिती घेणार आहे. 

 

1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था,दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्तीविजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही. राज्यातर्गंत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास ईअर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्रतसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतुक प्रमाणपत्र द्यावे. पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय ती करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कार्यवाही होवू शकते. राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करुन घ्यावी. तसेच त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. 1 एप्रिल 2024 पासून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय बंद आहे. तसेच 1 जून 2024 पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्याआठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजारसमित्यामध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरीत अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात येणार आहे.

 

अलका पाटील

उपसंपादकजिल्हा माहिती कार्यालय नांदेड

00000








 वृत्त क्र. 442

इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे

आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

नांदेड दि. 24 :- इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रु-मार्च 2024 परीक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा, नियमित शुल्क सोमवार 27 मे 2024 ते शुक्रवार 7 जून 2024 पर्यत आहेत. विलंब शुल्क शनिवार 8 जून 2024 ते बुधवार 12 जून 2024 असा आहे.

उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा, शुक्रवार 31 मे 2024 ते शनिवार 15 जून 2024, उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार 18 जून 2024 अशी आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीनुसार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रु-मार्च 2024 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी-मार्च 2025 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयानी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...