Wednesday, June 16, 2021

 

प्रज्ञाशोध परीक्षेत नांदेडचा अरुण लिंगदळे राज्यात दुसरा

जिल्ह्यातील एकुण 35 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. दहावीसाठी राज्यस्तरीय चाचणी परीक्षा (लेबल-1) ही 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले असून अरुण ईश्वरराव लिंगदळे हा राज्यात दुसरा आला आहे. या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातून खुल्या प्रवर्गातून 12, ओबीसी प्रवर्गात 8, एससी प्रवर्गात 1, एसटी प्रवर्गात 13 तर इडब्लूएस प्रवर्गात 1 असे एकुण 35 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झाली आहे. शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करणे या हेतूने ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत लेबल 1 मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी हे केंद्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर एनटीएसई परीक्षा एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतसथळावर यथावकाश उपलब्ध होतील. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता एनटीएसई परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यापासून परीक्षेचे मार्गदर्शन संबंधित शाळांनी उपलब्ध करुन दयावे, असे शिक्षणाधिकारी (मा.) यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

 राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्टला आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने 10 जुलै ऐेवजी आता 1 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीराम जगताप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे  यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भुसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बॅंकेची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे लोकन्यायालयात निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन केले आहे.

00000

इयत्ता बारावीची परीक्षा रद्द 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करुन इयत्ता 12 परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे व परीक्षेशी संबंधीत सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील इ. 12 वी परीक्षा शासन निर्णायाद्वारे रद्द केली आहे. याची सर्व मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालकासह इतर सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव यांनी केले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

00000


 

नांदेड जिल्ह्यात 53 व्यक्ती कोरोना बाधित, एकाचा मृत्यू तर 92 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 684 अहवालापैकी  53 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 993 एवढी झाली असून यातील 88 हजार 173 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 362 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

16 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे अर्धापूर तालुक्यातील दिग्रस येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 900 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 9, नांदेड ग्रामीण 6, भोकर 1, कंधार 14, लोहा 1, मुदखेड 2, उमरी 1, किनवट 2, यवतमाळ 2, बीड 1 असे एकूण 53 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 92 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3,  मुखेड कोविड रुग्णालय 1,  बिलोली तालुक्यातर्गंत 1, हिमायतनगर तालुक्यातर्गत 3, किनवट कोविड रुग्णालय 4, कंधार तालुक्यातर्गत 1, अर्धापूर तालुक्यातर्गंत 2,  मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 68, हदगाव कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 362 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  23, हदगाव कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 3,   मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 57, खाजगी रुग्णालय 10  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 131 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 82 हजार 880

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 80 हजार 403

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 993

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 173

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 900

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-164

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 362

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 17 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय,  शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको अशा एकुण 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 150 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 15 जून पर्यंत एकुण 4 लाख 68 हजार 859 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 16 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 38 हजार 230 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 41 हजार 940 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 80 हजार 170 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 16 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक कैलाश तुकाराम मोरे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, तसेच पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर, 2020 16 मार्च 2020, 26 मार्च, 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

 

 

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. अपुऱ्या ओलाव्या पर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो. तसेच खंड पडल्यास पीक तग धरु शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर.टी. यांनी केले आहे. 

गेल्या आठ दिवसांपासुन महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदुर सारख्या प्रमाणात नसून कोंकण सोडुन इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबीन , तुर , भुईमुग व मका या पिकांच्या नियोजनाकरता पेरणीची पुर्वतयारीची कामे करावीत. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन , कापूस , तूर, उडीद , मुग , मका या खरीप पिक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळया देऊन तयार करावी असेही प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

गावाचे जल अंदाज पत्रक, पाण्याच्या ताळेबंदाची माहिती या विषयावर वेबिनार संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- भू.स.वि.यं. सुवर्ण महोत्सवी वर्ष 2021 निमित्त भूजल विषयक तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती व जनजागृती होण्यासाठी भूजलाशी निगडीत विविध विषयावर वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. त्यापैकी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी. गायकवाड यांनी  गावाचे जल अंदाजपत्रक / पाण्याच्या ताळेबंदाची माहिती  या विषयावर वेबिनारद्वारे नुकतेच सादरीकरण केले. या वेबिनारचा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र आदी विभागातील विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी व इतर महाविद्यालयातील असे एकूण 65 संख्येवर विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...