Monday, September 14, 2020

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी 30 सप्टेंबरपुर्वी

महास्वयंम पोर्टलवर माहिती अद्ययावत करावी

-         सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार

नांदेड (जिमाका) 14:- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची नोंदणी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने http://www.rojgar.mahaswaya.gov.in हे वेबपोर्टल व गुगल प्लेस्टोअरमध्ये Mahaswaya हे Application विकसित केले आहे. या वेबपोर्टलवर सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त‍ रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

यापूर्वी ज्या उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. मात्र आधारक्रमांक नोंदणी क्रमांकाशी संलग्न केलेला नाही. तसेच ई-मेल, मोबाईल क्रमांक व पत्ता अद्ययावत केलेला नाही. अशा उमेदवारांनी संबंधित वेब पोर्टलवर अथवा गुगल प्लेस्टोअरमधुन Mahaswaya हे Application ॲन्ड्रॉइड मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन नोंदणी करुन सर्व माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार 30 सप्टेंबरपुर्वी आपली माहिती अद्ययावत करावी अन्यथा महास्वयंम वेब पोर्टलवरील नोंदणी रद्द होईल असेही पत्रकाद्वारे कळविले आहे.   

नोंदणी अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना काही अडचण आल्यास nandedrojgar@gmail.com या ई-मेलवर अथवा दुरध्वनीवरुन (02462-251674) संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

00000

 

341 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

353 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  सोमवार 14 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 341 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 353 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 176 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 177 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 62 अहवालापैकी  665 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 11  हजार 837 एवढी झाली असून यातील  7  हजार 696 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 761 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 58 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी कैलास नगर नांदेड येथील 70 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे, रविवार 13 सप्टेंबर रोजी अर्धापूर तालुक्यातील दिग्रस येथील 60 वर्षाचा एका पुरुषाचा, बालाजी मंदिर परिसर मुखेड येथील 68 वर्षाच्या एका महिलेचा, हनुमानगड नांदेड येथील 51 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे, तर सोमवार 14 सप्टेंबर रोजी मगनपुरा नांदेड येथील 65 वर्षाचा एका पुरुषाचा, बजरंग कॉलनी नांदेड येथील 63 वर्षाच्या एका पुरुषाचा यांचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा हदगाव कोविड रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 318 झाली आहे.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 7, बिलोली कोविड केंअर सेंटर 8, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 6, माहूर कोविड केंअर सेंटर 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 33, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 19, हदगाव कोविड केंअर सेंटर 8, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 193, कंधार कोविड केंअर सेंटर 5, मुदखेड कोविड केंअर सेंटर 23, नायगाव कोविड केंअर सेंटर 4, उमरी कोविड केंअर सेंटर 8असे 341 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 85, अर्धापूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 9, भोकर तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 27, बिलोली तालुक्यात 1, मुदखेड तालुक्यात 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 7, हदगाव तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 11, उमरी तालुक्यात 13, कंधार तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 8, देगलूर तालुक्यात 4, हिंगोली 4 असे एकुण 176 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 104,  हदगाव तालुक्यात 1, अर्धापूर तालुक्यात 13, किनवट तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 4, मुदखेड तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 15, बीड 1, नांदेड ग्रामीण 5, मुदखेड तालुक्यात 7, लोहा तालुक्यात 15, कंधार तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 4, हिंगोली 3 असे  एकुण 177 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 761 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 267, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 763, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 71, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 21, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 138, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 113, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 186,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 50, लोहा कोविड केअर सेंटर येथे 115, हदगाव कोविड केअर सेंटर 58, भोकर कोविड केअर सेंटर 30, कंधार कोविड केअर सेंटर येथे 54,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 202, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 35, मुदखेड कोविड केअर सेटर 70,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 34, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 58, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 45, उमरी कोविड केअर सेंटर 96, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 8, बारड कोविड केअर सेंटर 14, खाजगी रुग्णालयात 330 बाधित, लातूर येथे 1 बाधित, औरंगाबाद 1, निजामाबाद 1  संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 65 हजार 862,

निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 912,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 353,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 11 हजार 837,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 31,

एकूण मृत्यू संख्या- 318,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 7 हजार 696,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 761,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 183, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 58,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 67.17 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

सुट्टीच्या दिवशी शिकाऊ, पक्की अनुज्ञप्ती चाचणी सुरु

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत 

नांदेड (जिमाका), दि. 14 :- शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी उशीराने अपॉईंटमेंट मिळत असल्याने प्रतिक्षा कालावधी वाढला आहे. हा कालावधी कमी करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने आता प्रत्येक शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी अपॉईंटमेंट उपलब्ध करण्यात आली आहे. अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंटमेंट घेवून त्यादिवशी चाचणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित रहावे. परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीचा कोटा वाढविण्यात आलेला आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000

 

 

 

माझे कुटूंब-माझी जबाबदारी मोहिमेचे

15 सप्‍टेंबराला प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी येथे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात 15 सप्‍टेंबर पासून माझे कुटूंब-माझी जबाबदारी ही मोहिम नांदेड जिल्‍ह्यामध्‍ये यशस्‍वीरित्‍या व प्रभावीपणे राबविण्‍यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सुक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले आहे. या मोहिमेचा प्रातिनिधीक शुभारंभ जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांच्‍या हस्‍ते भोकर तालुक्यातील भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्‍य प्रकाशराव भोसीकर, पंचायत समिती सभापती श्रीमती निता राऊलवाड, सरपंच श्रीमती रत्‍नमाला शिंगेवाड, डॉ. शिवशक्‍ती पवार, प्रशासकिय अधिकारी डॉ. अनिल रुईकर, जिल्हा परिषदेचे माहिती अधिकारी सुभाष खाकरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. डोंगरे उपस्थित राहणार आहेत. 

या मोहिमेसाठी गावानिहाय पथकांची स्‍थापना करण्‍यात येऊन दरदिवशी किमान 50 घरामधील व्‍यक्‍तींची चौकशी तसेच पल्‍स ऑक्‍सीमीटर व थर्मल गनच्‍या सहाय्याने तपासणी करण्‍याचे  नियोजन करण्‍यात आले आहे.  जिल्‍ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्‍यासाठी सहवासितांचा शोध व तपासण्‍या अधिक प्रमाणात करण्‍याबरोबरच अलगीकरणावर प्रशासनाने भर दिला आहे. माझे कुटूंब-माझी जबाबदारी ही मोहिमेत सर्व नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

"माझे कुटुंब-माझी जबाबदारी" ही राष्ट्रसेवा समजून  

मोहिमेत उत्स्फुर्त सहभागी व्हा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गजन्य असल्याने बाधितांची वाढती संख्या दुर्लक्षून चालणार नाही. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाच्या जबाबदार वर्तणाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये जबाबदार वर्तणाची जाणीव व आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम हाती घेतली आहे. प्रत्येक घरा-घरातील अबाल वृद्धांपर्यंत आरोग्य सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात यावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तींने या मोहिमेत राष्ट्रसेवा समजून उत्स्फुर्त सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची झुमॲपद्वारे आढावा बैठक नुकतीच झाली. या बैठकीत त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करुन ही मोहिम अधिकाधिक लोकाभिमूख कशी करता येईल याबाबत विचारविनिमय केला. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय व शहरात, महानगरात वार्ड निहाय पथके स्थापन करण्यात आली असून या पथकातील सदस्य घरो-घरी जाऊन प्रत्येकांची आरोग्यविषयक चौकशी करतील. एका पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. हे पथक घरातील सर्व सदस्यांचे तापमान (SpO2) तपासणी व घरातील एखादा सदस्याची कमोबीड स्थिती आहे का याची माहिती घेतील. 

या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत आणि दुसरा टप्पा 14 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व विभागांचा योग्य तो समन्वय साधला गेला असून स्थानिक स्वयंसेवक यासाठी पुढे येऊन सर्वांच्या आरोग्या सुरक्षितेच्यादृष्टिने आपआपले योगदान देतील अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केली. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी आहे मोहिम 

कोविड-19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोवीड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम पुढीलप्रमाणे आहे. माझे कटुंब-माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. ही मोहिम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर 2020 या कालावधीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

·         या मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार केली आहेत. प्रत्येक जिल्ह्यास आवश्यक आरोग्य पथकांची संख्या सोबत जोडली जात आहे. एका पथकामध्ये 1 आरोग्य कर्मचारी आणि 2 स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील.

·         एक पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. भेटी दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान Sp02 तपासणे तसेच Comorbid Condition आहे का याची माहिती घेईल.

·         ताप, खोकला, दम लागणे, Sp02 कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic मध्ये कोविड-19 प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील.

·         कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीसाठी संदर्भित केले जाईल.

·         प्रत्येक 5 ते 10 पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा दिली जाईल.

·         घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोवीड आणि पोस्ट कोवीड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समाजवून सांगितले जातील.

·         लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेवीका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेतला जात आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम कोवीड-19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल आणि सर्व संशयीत कोवीड-19 रुग्ण आणि कोमॉर्बीड व्यक्ती यांना तपासणी, चाचणी व उपचार या सेवा मिळतील याची दक्षता घेतील. 

मोहिमेचे उद्दिष्ट 

·         गृहभेटीद्वारे संशयीत कोवीड तपासणी व उपचार.

·         अति जोखमीचे (Co-morbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण.

·         सारी / इली (SARI / ILI)  रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोवीड-19 तपासणी आणि उपचार.

·         गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोविड-19 बाबत आरोग्य शिक्षण. 

मोहिमेची व्याप्ती  

·         माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कटक मंडळ इ. ठिकाणी राबविली जाईल.

·         या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व शहरे, गावे, वाडी, तांडे, पाडे इ. मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंमलबजावणी  

·         गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि 2 स्वयंसेवक (एक पुरुष व एक स्त्री) असे तिघांचे पथक असेल.

·         एक पथक 1 दिवसात 50 घरांना भेटी देईल.

·         पहिली फेरी 15 दिवस असे गृहीत धरुन संपूर्ण लोकसंख्येसाठी एकुण पथकांची संख्या निश्तिच केली जाईल. उदा. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची लोकसंख्या 50 हजार असेल तर या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षेत 10 हजार घरे असतील. एकुण 15 दिवस गृहभेटी दयावयाच्या करावयाचे झाल्यास दररोज सरासरी 650 घरांना भेटी दयाव्या लागतील. यासाठी 13 टीम आवश्यक आहेत. ग्रामीण भागासाठी 30 हजार लोकसंख्येच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साधारणत: 6 हजार कुटुंबे असतील एकुण 15 दिवस गृहभेटी दयावयाच्या झाल्यास दररोज सरासरी 400 घरांना भेटी दयाव्या लागतील. यासाठी 8 पथके स्थापन करावी लागतील. सदर गणित लक्षात घेऊन प्रशासनातर्फे नियोजन केले जात आहे.

·         एकुण पथकांची संख्या आणि स्वयंसेवक ठरल्यानंतर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पथकास लोकसंख्येनुसार गाव‍ निश्चित करुन दिलेल्या तक्त्यामध्ये नियोजन करतील. शहरी भागामध्ये पथकाचे दैनंदीन सर्वेक्षणासाठीचा भाग निश्चित करताना गल्ली, रस्ता, घर नंबर यावरुन निश्चिती केली जाईल. 

पथकाचे स्वरुप

·         पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा आणि 2 स्थानीक स्वयंसेवक ( 1 पुरुष व 1 स्त्री) असतील. हे स्वयंसेवक स्थानिक सरपंच, नगरसेवक यांच्या सहाय्याने निश्चित केले जातील.  

·         पथकातील सदस्यांना कोरोना दूत असे संबोधण्यात येईल.

·         मा. सरपंच, नगरसेवक यांचेकडून स्वयंसेवक प्राप्त न झाल्यास त्याऐवजी एक आरोग्य कर्मचारी / आशा असेल. अशावेळी पथकात 2 आरोग्य कर्मचारी / आशा असतील.

·         महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भाग यामध्ये खालील पैकी आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणासाठी घेण्यात येतील. बहुविध आरोग्य सेविका (स्त्री) (ए.एन.एम.), बहुविध आरोग्य सेवक (पुरुष) (आरोग्य सेवक), आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यकतेनुसार महिला व बाल कल्याण विभागांची परवानगी घेऊन), किमान 10 वी पास कोविड दुत (स्वयंसेवक). प्रत्येक पथकात 1 पुरुष व 1 स्त्री, प्रत्येक 5 ते 10 पथकामागे 1 डॉक्टर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक किंवा समुदाय आरोग्य अधिकारी. 

गृहभेटी – पहिली फेरी

·         प्रत्येक घरात शिरण्यापूर्वी दाराबाहेर सोयीच्या ठिकाणी स्टिकर लावले जातील. घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक सदस्याची ॲपमध्ये नोंद घेतली जाईल आणि त्यानंतर Infrared Thermometer ने तापमान Pulse Oxymeter ने SpO2 मोजले जाईल.

·         ताप असलेली व्यक्ती आढळल्यास (तापमान 98.6 F) अशा व्यक्तीस खोकला, घशात दुखणे, थकवा इ. लक्षणे आहेत का याची माहिती घेतली जाईल.

·         घरातील प्रत्येकास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा इ. आजार आहेत का याबाबत विचारणा करावी आणि दिलेल्या उत्तरानुसार ॲपमध्ये माहिती नोंदविली जाईल.

·         ही माहिती ताप 100.4 अंश फॅरनहाईट (38 सी) इतका किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा SpO2 95 टक्के पेक्षा कमी असल्यास रुग्णांस जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भीत केले जाईल.

·         रुग्णांस SARI / ILI लक्षणे असल्यास Fever Clinic मध्ये संदर्भीत केले जाईल.

·         संदर्भीत करतांना रुग्णास संदर्भ चिठ्ठी देवून तसेच कोविड-19 प्रतिबंधाचे सर्व संदेश रुग्ण व घरातील सर्व नातेवाईकांना समजून सांगण्यात येतील.

·         घरातील कोणत्याही व्यक्तीस मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, Organ transplant, लठ्ठपणा, दमा किंवा इतर मोठे आजार असल्यास त्यांची SpO2 तपासणी पुन्हा करुन खात्री करतील. अशा रुग्णांचे तापमान 98.7 F (37.C)  पेक्षा जास्त असेल आणि 100.4 F पेक्षा कमी असेल तरी सुद्धा त्यांना Fever Treatment Center येथे संदर्भीत केले जाईल.

·         ताप SpO2 95 पेक्षा कमी, Co-morbid Condition या तीन पैकी कोणतेही 2 लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीस High risk संबोधून त्वरीत रुग्णवाहिका बोलावून जवळच्या Fever Treatment Center / Vovid Care Center  ला संदर्भीत केले जाईल. 

गृहभेटी- दुसरी फेरी

·         कुटुंबातील सदस्यांची माहिती पहिल्या फेरीत घेतलेली असल्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये दररोज 75-100 घरे करतील. 

·         दुसऱ्या फेरीमध्ये सर्वांचे तापमान व SpO2 मोजून दरम्यानच्या काळात घरातील कोणाला मोठा आजार होऊन गेला काय याची खात्री केली जाईल.

·         पुन्हा एकवेळा आरोग्य संदेश दिले जातील.

·         ताप 100.4 फॅरनहरिट (38.C) पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि हे SpO2 94 टक्के पेक्षा कमी असल्यास रुग्णास संदर्भीत करतील.

·         पहिल्या फेरीच्या वेळी गैरहजर असणाऱ्या घरातील व्यक्तींची Co-morbid Condition साठी चौकशी करतील.

 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम बक्षिस योजना

·         बक्षिस योजना व्यक्ती आणि संस्थांसाठी असतील. व्यक्तींसाठीच्या योजनांमध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, आरोग्य शिक्षण मेसेजेसच्या स्पर्धा इ. घेण्यात येतील तर संस्थांसाठी वेगवेगळ्या संस्थांच्या कामकाजानुसार बक्षिस योजना देण्यात येईल.

·         बक्षिस योजनेची माहिती राज्यस्तरावरुन वृत्तपत्राद्वारे दिली जाणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक बक्षिसासाठीचे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याबाबत कळविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी हे एक अधिकारी निश्चित करतील.

·         आलेले साहित्य तपासून त्यांना गुणानुक्रमांक देण्यासाठी जिल्हाधिकारी हे स्थानिक स्तरावर एक समिती नेमतील व त्या समितीचे प्रमुखाने गुणानुक्रमांक निश्चित करतील.  

·         व्यक्तींसाठीच्या बक्षिस योजनेत विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांचेसाठी या योजना लागू असतील. राज्यस्तरावर वृत्तपत्रांमध्ये आणि दुरचित्रवाणीवरुन जनतेला सहभागासाठी आवाहन करण्यात येईल.

·         प्राप्त झालेले निबंध, पोस्टर्स, मेसेजेस, शॉर्ट फील्म या अनुभवी परिक्षकांकडून तपासले जातील. बक्षिस मिळालेला निबंध, पोस्टर्स, फील्मस इ. ना राज्य शासनातर्फे प्रसिद्धी देण्यात येईल. विजेत्यांना ढाल आणि खालीलप्रमाणे बक्षिस देण्यात येईल.

·         पहिले बक्षिस- राज्यस्तर 10 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 5 हजार, आमदार मतदार संघ स्तर 3 हजार. दुसरे बक्षिस- राज्यस्तर 5 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 3 हजार, आमदार मतदार संघ स्तर 2 हजार. तिसरे बक्षिस- राज्यस्तर 3 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 2 हजार, आमदार मतदार संघ स्तर 1 हजार राहील.

·         जिल्हास्तरावर नागरी आणि ग्रामीण असे 2 विभाग असतील प्रत्येक विभागात प्रथम 3 संस्था निवडण्यात येतील व त्यांना बक्षिस दिले जाईल.

·         संस्थेचा गुणानुक्रम काढण्यासाठी खालील प्रमाणे निकष असतील.

·         मोहिम पहिल्या फेरीमधील गृहभेटीचे प्रमाण (10 गुण).

·         प्रति हजार लोकसंख्येमध्ये कोविड-19 चाचणी (मोहिम कालावधीमध्ये) प्रमाण (30 गुण).

·         सीएसआर अंतर्गत किती मास्क व हात धुण्यासाठी साबण वाटप केले प्रति हजार लोकसंख्या (20 गुण).

·         किती SARI / ILI रुग्ण प्रती हजार लोकसंख्येत शोधून त्यांची चाचणी केली (10 गुण).

·         कोविड-19 मृत्यू प्रमाण (30 गुण).

·         मिळालेल्या गुणांनुसार ग्रामपंचायत / वार्डातील हिरवे (75 टक्के प्लस) पिवळे (41-74 टक्के) लाल (41 टक्के पेक्षा कमी) कार्ड देण्यात येईल.

·         हिरवे कार्ड दिलेल्या संस्थांना ढाल आणि खालीलप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.

·         पहिले बक्षिस-

राज्यस्तर 1 लाख, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 50 हजार, आमदार मतदार संघ स्तर 10 हजार. दुसरे बक्षिस-

राज्यस्तर 50 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 30 हजार, आमदार मतदार संघ स्तर 5 हजार. तिसरे बक्षिस-

राज्यस्तर 30 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 20 हजार, आमदार मतदार संघ स्तर 3 हजार राहील.  

·         बक्षिस मिळालेल्या संस्थांना जिल्हा आणि राज्य स्तरावर समारंभ आयोजित करुन जिल्हा स्तरावरुन मा. पालकमंत्री यांचे हस्ते आणि राज्य स्तरावर मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते बक्षिसे वितरण करण्यात येईल.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...