Wednesday, May 13, 2020


विशेष श्रमिक रेल्वेने उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे
1 हजार 464 मजूरांचे झाले रवाना
भारत माता की जय या घोषणा देवून आनंद व्यक्त  
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- कोरोना प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील रहिवासी असलेले 1हजार 464 मजुरांना हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून विशेष श्रमिक रेल्वे ने आज सायंकाळी 6.25 वा. उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला. मजुरांच्या चेहऱ्यांवर आपण आपल्या गावी जात असल्याचा आनंद दिसत होता. उपस्थितांनी टाळ्या वाजवून भारत माता की जय या घोषणा देवून आनंद व्यक्त केला. तसेच मजूरांनी प्रवासा दरम्‍यान जिल्‍हा प्रशासनाला आभार मानत धन्‍यवाद देत होते.
यावेळी आमदार मोहन हंबर्डे, जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्‍त डॉ. सुनिल लहाने, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्‍हाधिकारी सचिन खल्‍लाळ, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसीलदार अरुण जऱ्हाड, रेल्‍वे विभागाचे कालीचरण आदि संबंधित विभागाचे प्रमुखांची उपस्थिती होती.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार उत्तरप्रदेश येथील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी नांदेड येथून रेल्वे सोडण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण तयारी केली होती. या प्रयत्नामुळे मजुरांना घरी जाण्याचा दिलासा मिळाला आहे. मजुरांच्या रेल्वे तिकिटाचा खर्च प्रशासनाने केला आहे. जिल्‍हा प्रशासन व स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍यावतीने प्रवासापूर्वी मजुरांची थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, प्रवासात जेवण, नाश्ता, पाणी बॉटल तसेच आवश्यक सुविधा सोबत देऊन सामाजिक अंतर राखून मजुरांना रेल्वे बोगीपर्यंत सोडण्यात आले होते. त्यानंतर विशेष श्रमिक रेल्वे ने त्यांचे उत्तरप्रदेशकडे प्रयाण झाले.  
लॉकडाऊन काळात नांदेड जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या मजुरांची नांदेड येथील विविध मंगल कार्यालयात तसेच शिबिरांमध्ये राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली  होती. नांदेड तरोडा भागातील विश्वलक्ष्मी मंगल कार्यालयात परराज्यातील 85 लोकांची मागील एक महिन्यांपासून निवास व जेवण्याची व्यवस्था केली होती. त्यापैकी 65 लोकांना हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून विशेष श्रमिक रेल्वेने उत्तरप्रदेश (गोरखपूर) कडे रवाना करण्यात आले.
00000







नांदेड जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा नवीन रुग्ण नाही ;
अबचलनगर येथील कोरोना रुग्ण उपचारानंतर निगेटिव्ह ;
  आतापर्यंत 1 लाख 3 हजार 142 व्यक्तींची तपासणी
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- नांदेड अबचलनगर येथील 26 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण काल मंगळवार 12 मे रोजी पूर्ण उपचारानंतर त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथून सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवार 13 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 3 हजार 142 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 131 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 879 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 157 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी एकुण 63 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या 63 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे तर पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 43 रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  
पॉझिटिव्ह 5 मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.  कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


डेंग्युताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावी काळजी
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांचे आवाहन
नांदेड दि. 13 :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. 
नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन शनिवार 16 मे 2020 रोजी साजरा होत आहे. त्याअनुषंगाने सध्या उन्हाळा सुरु असल्याने जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा असल्याने नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. त्याअनुषंगाने साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासोत्पत्ती होते.
डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्यतपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील पाच वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. ( घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन 2016 - (776) 182 (एक). सन 2017 - (953) 200 (निरंक). सन 2018 - (1245) 378 (निरंक). एप्रिल 2019 -(1527) 473 (निरंक) तर 30 एप्रिल 2020 अखेर- (134) 59 (निरंक).
भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगणात व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरन घेवून झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.
नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.
00000


शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प जलाशयाच्या
दोन्ही तीरांवरील मोटारींचा विद्युत पुरवठा नियंत्रीत
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयाच्या दोन्ही तीरावरील मोटारींचा विद्युत पुरवठा शनिवार 30 मे 2020 पर्यंत नियंत्रीत करण्यात आला असून  जलाशयाच्या दोन्ही तीरावरील बागायतदारांनी बंद कालावधीत मोटारी बंद ठेवू जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जलाशयावरील विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा नियंत्रित करण्यासंदर्भात आढावा बैठक बुधवार 13 मे रोजी घेण्यात आली होती. या बैठकीतील निर्देशानुसार शेतीचा पाणी वापर काही प्रमाणात मर्यादीत करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या आदेशानुसार शनिवार 30 मे पर्यंत या भागातील सिंगल फेज विद्युत पुरवठा वेळापत्रकाप्रमाणे दररोज सुरु राहिल. परंतू जलाशयावरील पंपासाठीचा थ्री फेज विद्युत पुरवठा तसेच विहिर व खाजगी बोअरचा विद्युत  पुरवठा एक दिवस आड सुरु ठेवण्यात येईल.
या नियोजनानुसार पाण्याचा योग्य वापर करुन पाण्याचा नाश, अपव्यय टाळावा. विद्युत पुरवठा बंद कालावधीत अनाधिकृत विद्युत जोडणी होत असल्यास व अवैध पाणी उपसा करीत असल्याचे निदर्शनास असल्यास संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन प्रसंगी विद्युत मोटार जप्त करण्यात येईल, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...