Friday, April 5, 2019


फळे (आंबे) पिकविण्यासाठी
कार्बाईड गॅस ऐवजी इथेपॉन पावडरचा वापर करावा 
नांदेड दि. 5 :- कृत्रीमरित्या फळे पिकविण्यासाठी कार्बाईड गॅस (कॅलशियम कार्बाईड)चा वापर करण्याऐवजी इथेपॉन पावडर (इथेलीन गॅसचा) वापर फळे (आंबे) पिकविण्यासाठी करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
सध्या आंब्याचा मोसम सुरु होत असून फळांचा राजा आंबाची आवक बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. नैसर्गीकपणे आंबा पिकवून तो विक्रीसाठी बाजारात आणणे अभिप्रेत असतांना आंब्याचे व्यापारी त्याची वाहतूक, साठा करतांना कार्बाइडी गॅस (कारपेट) चा वापर करतात. अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या तरतुदीनुसार कार्बाइड गॅस (कॅलशियम कार्बाइड) चा वापरास प्रतिबंध असून त्याचा वापर करुन आंबे पिकविल्यास शरीराच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आंबा पिकविण्यासाठी इथेपॉन पावडर (इथेलीन गॅस) चा मर्यादीत स्वरुपात वापर करण्याबाबत दिल्लीच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. सदर पावडर वापरतांना ती फळांच्या (आंब्याच्या) प्रत्यक्ष संपर्कात येणार नाही याची दक्षता फळ विक्रेत्यांनी घ्यावी. हे पावडर एका आवरणात छोट्या स्वरुपात पॅक करुन फळाच्या (आंब्याच्या) ठिकाणी ठेवावे, जेणे करुन आंबा पिकविण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत.
आंबा किंवा इतर फळे पिकवतांना कार्बाइड गॅस (कॅलशीयम कार्बाईड) चा वापर न करता आवश्यकता वाटल्यास इथेपॉन पावडर (इथेलीन गॅस) मर्यादीत स्वरुपात विक्रेत्यांनी वापर करावा. त्याशिवाय नैसर्गिकरित्या आंबा किंवा इतर फळे पिकवण्यासाठी प्राधान्य दयावे. तसेच फळे व भाजीपाला विक्रेते कमिशन एजंट, वाहतूकदार यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा. FSSAI या वेबसाईटवर ऑनलाईन परवाना, नोंदणी घ्यावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
00000


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड दि. 5 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र हद्दीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून 16 ते 18 एप्रिलच्या कालावधीसाठी नेमणूक केली आहे.
नांदेड जिल्‍ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील :- 83-किनवट, 84-हदगांव विधानसभा मतदार संघ व 16-नांदेड लोकसभा मतदार संघातील :- 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगांव, 90-देगलूर, 91-मुखेड विधानसभा मतदार संघ तसेच 41-लातूर (अ.जा.) :- लोकसभा मतदार संघातील 88-लोहा विधानसभा मतदार संघ असे एकुण 9 विधानसभा मतदार संघात, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्‍या कामासाठी (325) क्षेत्रिय अधिकारी (Zonal Officer) यांची नियुक्‍ती केली असून त्यांना विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र हद्दीपार्यंत 16 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 18 एप्रिल 2019 पर्यंतच्‍या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करून त्‍यांना वरील संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 अन्वये अधिकार प्रदान केले आहेत. हा आदेश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी 5 एप्रिल 2019 रोजी निर्गमीत केला आहे.
000000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यात 21 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 7 एप्रिल ते 21 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000

  वृत्त क्र.  696     जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न   नांदेड ,  दि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच...