Friday, April 5, 2019


फळे (आंबे) पिकविण्यासाठी
कार्बाईड गॅस ऐवजी इथेपॉन पावडरचा वापर करावा 
नांदेड दि. 5 :- कृत्रीमरित्या फळे पिकविण्यासाठी कार्बाईड गॅस (कॅलशियम कार्बाईड)चा वापर करण्याऐवजी इथेपॉन पावडर (इथेलीन गॅसचा) वापर फळे (आंबे) पिकविण्यासाठी करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
सध्या आंब्याचा मोसम सुरु होत असून फळांचा राजा आंबाची आवक बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. नैसर्गीकपणे आंबा पिकवून तो विक्रीसाठी बाजारात आणणे अभिप्रेत असतांना आंब्याचे व्यापारी त्याची वाहतूक, साठा करतांना कार्बाइडी गॅस (कारपेट) चा वापर करतात. अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या तरतुदीनुसार कार्बाइड गॅस (कॅलशियम कार्बाइड) चा वापरास प्रतिबंध असून त्याचा वापर करुन आंबे पिकविल्यास शरीराच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आंबा पिकविण्यासाठी इथेपॉन पावडर (इथेलीन गॅस) चा मर्यादीत स्वरुपात वापर करण्याबाबत दिल्लीच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. सदर पावडर वापरतांना ती फळांच्या (आंब्याच्या) प्रत्यक्ष संपर्कात येणार नाही याची दक्षता फळ विक्रेत्यांनी घ्यावी. हे पावडर एका आवरणात छोट्या स्वरुपात पॅक करुन फळाच्या (आंब्याच्या) ठिकाणी ठेवावे, जेणे करुन आंबा पिकविण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत.
आंबा किंवा इतर फळे पिकवतांना कार्बाइड गॅस (कॅलशीयम कार्बाईड) चा वापर न करता आवश्यकता वाटल्यास इथेपॉन पावडर (इथेलीन गॅस) मर्यादीत स्वरुपात विक्रेत्यांनी वापर करावा. त्याशिवाय नैसर्गिकरित्या आंबा किंवा इतर फळे पिकवण्यासाठी प्राधान्य दयावे. तसेच फळे व भाजीपाला विक्रेते कमिशन एजंट, वाहतूकदार यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा. FSSAI या वेबसाईटवर ऑनलाईन परवाना, नोंदणी घ्यावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...