Thursday, September 3, 2020

माविमकडून ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेचे व्हिडीओ १० सप्टेंबरपर्यंत पाठवावेत

 

            मुंबई, दि.३: सध्याच्या 'कोविड-१९' च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडीओ येत्या दि. १० सप्टेंबर, २०२० पर्यंत माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

            उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्यातील महिलांसाठी महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती निशुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविण्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडीओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे दिनांक १० सप्‍टेंबर, २०२० पर्यंत पाठवावा. 

 

स्पर्धेसाठीचे उखाणे नाविण्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणे हा मौखिक साहित्यिक प्रकार आहे. तरी या स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. सर्वसाधाणपणे पतीच्या नावाभोवती उखाणे गुंफले जातात. पण, या स्पर्धेत समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तीरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तीरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती उखाणे गुंफणे अपेक्षित आहे. उखाणा 'स्त्री पुरुष समानता' या मुल्यांचा पुरस्कार करणारा असावा. तो कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिट लांबीचा असावा. उखाणा पाठ असावा. 

 

जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हा स्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक आणि माविमेतर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा ६ याप्रमाणे साधारण एकूण ३६ पात्र व्हिडीओ एका विभागीयस्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. ६ विभागाचे मिळून ३६ पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे ३ असे ६ क्रमांक काढले जातील. मात्र, विभागीयस्तरावर ३६ पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय विजेत्या ६ महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येईल. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी माविम मुख्यालयाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री.महेंद्र गमरे (भ्रमणध्वनी क्र.९८९२५४८८५४) यांच्याशी किंवा जिल्हा कार्यालयांशी संपर्क साधावा. महामंडळाचे संकेतस्थळ www.mavimindia.org वर सर्व जिल्हा कार्यालयांचे संपर्क, संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक व इमेल उपलब्ध आहेत. 

000

224 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

443 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 3 :- गुरुवार 3 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 224 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 443 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 128 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 315 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 809 अहवालापैकी  1 हजार 297 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 7  हजार 850 एवढी झाली असून यातील  5  हजार 1 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 66.28 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 544 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 246 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात मृत्त पावलेले व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. मंगळवार 1 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात बोरबन परिसरातील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, बुधवार 2 सप्टेंबर रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे किनवट येथील 70 वर्षाची एक महिला, जुना मोंढा नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष, अक्सा कॉलनी येथील 45 वर्षाचा एक पुरुष, खाजगी रुग्णालयात गोकुळनगर येथील 75 वर्षाचा एक पुरुष, बोधडी किनवट येथील 47 वर्षाची एक महिला, हैद्राबाद येथील संदर्भीत 70 वर्षाचा लोहा येथील एक पुरुषाचा तर गुरुवार 3 सप्टेंबर रोजी खाजगी रुग्णालयात कंधार तालुक्यातील औराळ येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्तांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 251 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 2, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 28, हदगाव कोविड केंअर सेंटर 10, लोहा कोविड केंअर सेंटर 7, देगलूर कोविड केंअर सेंटर 6, भोकर कोविड केंअर सेंटर 6, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर 133, खाजगी रुग्णालय 11, किनवट कोविड केंअर सेंटर 6, मुदखेड कोविड केंअर सेंटर 3, बिलोली कोविड केंअर सेंटर 3 असे 224 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 52, किनवट तालुक्यात 7, भोकर 2, लोहा 25, नायगाव 1, कंधार 6, माहूर 1, यवतमाळ 2, मुंबई 1, नांदेड ग्रामीण 6, अर्धापूर 1, हदगाव 12, देगलूर 1, मुखेड 5, हिंगोली 3, लातूर 1, परभणी 2 असे एकुण 128 बाधित आढळले.  

 तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र, 186, अर्धापूर तालुक्यात 09, भोकर तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 13, किनवट तालुक्यात 7, नायगाव 4, देगलूर तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 8, हिमायतनगर 1, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 18, मुदखेड 13, बिलोली 12, लोहा 12, कंधार 4, हदगाव 2, माहूर 9, उमरी 4, परभणी 4 असे  एकुण 315 बाधित आढळले 

जिल्ह्यात 2 हजार 544 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 248, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1075, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 77, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 41, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 82, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 103,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 62, लोहा कोविड केअर सेंटर येथे 122, हदगाव कोविड केअर सेंटर 53, भोकर कोविड केअर सेंटर 19,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 31,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 93, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 32, मुदखेड कोविड केअर सेटर 32,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 48, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 38, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 63, उमरी कोविड केअर सेंटर 47, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 5, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 244 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

घेतलेले स्वॅब- 51 हजार 464,

निगेटिव्ह स्वॅब- 41 हजार 427,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 443,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 7 हजार 850,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,

एकूण मृत्यू संख्या- 251,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 1,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 544,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 503, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 246. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


                      सुरक्षित लोकोत्सवाचा नांदेड पॅटर्न 

सोळा तालुक्यांच्या विस्तीर्ण आणि तेवढ्याच वैविधतेने नटलेल्या नांदेड जिल्ह्यातील विविध लोकोत्सव, परंपरा या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जिल्ह्यातील ही सर्व वैविधतता आणि सार्वजनिक उत्सव कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनापुढे सामाजिक शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिने आव्हानात्मक होते. एका बाजुला संपूर्ण जिल्हाभरात आहे ती प्रशासकीय यंत्रणा मागील सहा महिन्यांपासून कोरोनाच्या व्यवस्थापनात असल्याने जिल्ह्यात पुर्वापार चालत आलेल्या विविध धार्मिक सण, उत्सव, लोकोत्सव यांना सध्याच्या पार्श्वभुमीवर अधिक जबाबदारी पूर्ण साजरे व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नवा पॅटर्न आकारास घातला. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येथील सर्व धार्मिक लोकोत्सवाचा आभ्यास करीत एक योजना आखली. गणेशोत्सव, मोहरम-ताजिया आणि इतर सण, उत्सवाला दरवर्षी सारखी गर्दी जर या कोरोनाच्या काळात गावा-गावात झाली असती तर जिल्हाभर आरोग्याच्या दृष्टिने मोठे संकट निर्माण झाले असते. हे सर्व शांततामय होण्यासाठी यावर्षीच्या सर्व लोकोत्सवाला लोकांच्याच सहभागातून सुरक्षित मार्ग काढण्याची एक योजना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आखली. 

महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येक वार्डनिहाय मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर आणि स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना वास्तावाची जाणिव करुन दिली. यात महसूलच्या सर्व यंत्रणेसह महानगरपालिका आणि नगरपालिका, पोलिस विभाग, महावितरण विभाग, आरोग्य विभाग यांच्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन एक टिम तयार केली. या टिमच्या माध्यमातून जागरुक लोकसहभागासाठी नियोजन केल्या गेले. 

गणेशोत्सव, मोहरम-ताजिया यात पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेत त्यांच्या नेतृत्वाला चालना देत सुरक्षित लोकोत्सवाची संकल्पना पुढे केली. विशेष म्हणजे लोकांनीही काळाची गरज ओळखत आपल्या भक्ती आणि श्रद्धेला मुरड घालत अंतरिच्या विवेकाला प्राधान्य दिले. हाच दृष्टिकोन सर्व तालुक्यांना मिळावा यासाठी त्या-त्या तालुक्याचे महसूल, पोलीस, आरोग्य आणि इतर सर्व संबंधित विभागांच्या प्रमुखांना पुढे करीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुका पातळीवर शांतता समितीच्या सदस्यांशी आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भावनात्मक साद घातली. आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी, जिल्हा पोलीस अधिक्षक विजकुमार मगर यांच्यासह स्वत: प्रत्यक्ष गावोगावी फिरुन लोकांच्या भेटी घेऊन आवाहन केले. या आवाहनाला लोकांनी भरभरुन प्रतिसाद देत खऱ्या अर्थाने जागरुक नागरिकत्वाची भुमिका निभावली. 

याचा परिपाक जिल्ह्यातील सर्व उत्सवासह गणेशोत्सव कुठलेही गालबोट न लागता अत्यंत सुरक्षितरित्या पार पाडला. नांदेड महानगरपालिका वगळता संपूर्ण जिल्हाभरात 3 हजार 868 गणेशमुर्तींचे प्रशासनाने सुरक्षितरित्या विसर्जन केले. यात अवघ्या 237 गणेशमुर्ती या सार्वजनिक गणेश मंडळाच्या होत्या. धर्माबाद आणि हिमायतनगर येथील परिस्थिती लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करुन गणेशमुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले हे विशेष. जिल्ह्यात एकुण 237 सार्वजनिक गणेशोत्सवापैकी कंधार येथे 22, कुंडलवाडी येथे 14, किनवट येथे 17, देगलूर, धर्माबाद, नायगाव येथे केवळ 1, बिलोली येथे निरंक तर लोहा-23, उमरी 22, हदगाव 25, भोकर 23, मुखेड 14, मुदखेड 21, अर्धापूर 9, माहूर 12, हिमायतनगर येथे 32 सार्वजनिक गणेश मंडळानी गणेश मुर्तीची स्थापना केली होती.  

नांदेड शहराच्या सर्व भागात यावर्षी 192 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मुर्तींची स्थापना केली होती. दरवर्षी ही संख्या साधारणता 430 ते 450 पर्यंत असते. गणेशमुर्तींचे विसर्जन निसर्गपूरकदृष्टिने व्हावे यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. नांदेड शहरासाठी 15 ठिकाणी मुर्ती संकलन केंद्रही निर्माण केले होते. आसना, पासदगाव, नांदकसर, नावघाट, नगिनाघाट, शनिघाट, शनिघाट वसरणी, वसरणी घाट येथे एकुण सुमारे 17 हजार 765 घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण जिल्हाभरात सायंकाळी 11 वाजेपर्यंत काही अपवाद वगळता विसर्जन पूर्ण झाले होते.     

दरवर्षी ज्या संख्येत आणि ज्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव, गणेश मंडळ गलोगल्ली गणेशाची स्थापना करायचे याला यावर्षी नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संस्थगिती दिली. नागरिकांच्या या जागरुक वर्तणातून कोरोनाच्या प्रसाराला मोठ्या प्रमाणात आळा घालता येणे शक्य झाले. जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक उत्सव साजरा करतांना जो संयम आणि जागरुकता दाखविली त्याबद्दल सर्वांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आभार मानले.

 

-         विनोद रापतवार

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड






*******

 

१०७ वर्षांच्या आज्जीबाईनेही केली कोरोनावर मात

मनाची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती चांगली ठेवा
-  आरोग्यमंत्री राजेश टोपे 

            मुंबई, दि.३: कोरोनाबाधीत रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली आहे, असा दिलासा देतानाच मनाची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी असा सल्ला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

          दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर कोरोनाशी दोन हातया कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत सुरू असलेल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी यावेळी संवाद साधला. 

          आरोग्यमंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, कोविड केअर सेंटर्स आहेत. त्यामध्ये आवश्यक ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये १०७ वर्षांची महिला, त्यांचा ८० वर्षांचा मुलगा आहे, त्यांचा मुलगा जो साधारण ६०-६५ वर्षांचा आहे आणि त्यांची मुलगी असे सर्वजण कोरोनामधून बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्यामुळे कोरोना बरा होतो मात्र योग्यवेळी उपचारासाठी दवाखान्यात जाणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

          कोरोनाचे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकता
ज्यांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार आहेत त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सामान्य माणसापेक्षा जास्त असते. अशा कोमॉर्बीड अवस्थेतील रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तो रुग्ण दगावला तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद होते. राज्य शासनाने या संदर्भात पारदर्शकता व प्रामाणिकता याला फार महत्त्व दिले आहे.
                                                                                                                  
दुखणे अंगावर काढू नका विश्लेषण केले तर २४ तासांतले मृत्यू, ४८ तासांतले मृत्यू यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचे एक कारण आहे की लोक दुखणे अंगावर काढतात. लवकर निदान झाले तर त्याचा उपचार तत्काळ करता येतो.
ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करा


प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने तपासणी केली पाहिजे. आपले एसपीओटू (SPO2) (म्हणजेच रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण) पर्सेंटज ९५ च्या खाली गेले तर निश्चितपणे दवाखान्यात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. नागरिकांनी या सगळ्या बाबींना प्रतिसाद देणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.


दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोकं राहत असतील किंवा एका घरात १०-१५ लोकं राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही. त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक अलगीकरण) म्हणतो. ज्यांच्याकडे मोठा फ्लॅट आहे, बंगला आहे, त्यामध्ये बऱ्याच खोल्या आहेत, घरात सगळे सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात आणि स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवत असतील तर त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो.


३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स
होम आयसोलेशनमध्ये बाधीत रुग्णाने एका स्वतंत्र खोलीत राहावे. दुसऱ्यांना संसर्ग होणार नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी सगळ्या व्यवस्था स्वतंत्र असायलाच हव्यात. जेणेकरून त्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. पॉझिटिव्ह रुग्णाला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीसीएचमध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वतःची १०० टक्के काळजी घेऊ शकतात ते लोक, पीपीई किट घालून, फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हज या सगळ्या गोष्टी वापरून घरी काळजी घेऊ शकतात. एकमेकाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तर होम आयसोलेशनने राहणे सुरक्षित आहे. ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोवीड केअर सेंटर्स ठेवण्याची व्यवस्था आहे. महाराष्ट्रात ३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स आहेत. दोन-अडीच लाखांच्यावर खाटा आहेत., असे श्री. टोपे यांनी सांगितले.
००००


    मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारीत होत आहे.
    शक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी कोरोना: अवास्तव भीती व गैरसमज
    शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी कोरोनासह जगण्याची तयारी
    रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व
    सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी कोरोना: प्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयांवर चर्चा होणार आहे.

अजय जाधव..विसंअ...३.९.२०२०

 दुखणं अंगावर काढू नका..

 

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत सुरू असलेल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादाचा हा संपादीत अंश.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : हृदयविकार, मेंदूविकारक्षयरोग हे गंभीर आजार दीर्घकालीन असतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त १५ दिवसांचाच आहे. या काळात व्यवस्थित काळजी घेतली त्यातून रुग्ण पूर्णपणे बाहेर पडू शकतो. काही लोकं चाचणी न करता आजार अंगावर काढतात. या संदर्भात आपण नागरिकांना काय सांगाल ?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : ज्यांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार आहेत त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सामान्य माणसापेक्षा जास्त असते. अशा कोमॉर्बीड अवस्थेतील रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तो रुग्ण दगावला तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद होते. राज्य शासनाने या संदर्भात पारदर्शकता व प्रामाणिकता याला फार महत्त्व दिले आहे. आपण ॲॅनॅलिसीस केले तर २४ तासांतले मृत्यू४८ तासांतले मृत्यू यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचे एक कारण आहे की लोक दुखणे अंगावर काढतात. लवकर निदान झाले तर त्याचा उपचार तत्काळ करता येतो. बऱ्याचदा हॅपी हायपोक्सिया किंवा सायलेंट हायपोक्सिया  आपण म्हणतो. बऱ्याचदा एखादी व्यक्ती नॉर्मल असते परंतु त्याच्या रक्तातीलं ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले असते ते लक्षात येत नाही. त्यासाठी प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने तपासणी केली पाहिजे. आपले एसपीओटू (SPO2) (म्हणजेच रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण) पर्सेंटज ९५ च्या खाली गेले तर निश्चितपणे दवाखान्यात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. नागरिकांनी या सगळ्या बाबींना प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : एखादी व्यक्ति कोरोनामुळे दाखल झाल्यानंतर १-२ दिवसात त्या व्यक्तीला सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी घरी जाऊन स्वतःला विलग करण्याच्या सूचना डॉक्टर देतात. मात्र १४ दिवससुद्धा पूर्ण झालेले नसताना हॉस्पिटलने सोडले म्हणजे आपण मोकळे झालो असे समजून समाजामध्ये सर्रासपणे वावरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. साधारणतः त्या रुग्णाने किती दिवस बाहेर पडू नये यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना काय आहेत ?

 

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : साधारणपणे कोरोना विषाणूचा इनक्युबेशन पिरिअड  १४ दिवसांचा आहे. एखाद्याला संसर्ग झाल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवसापर्यंत लक्षणे दिसतात. असिम्प्टोमॅटीक असेल तर दहाव्या दिवसापर्यंत व्हायरल लोड कमी होऊ शकतो. परंतु दहाव्या दिवसानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर चार दिवस आपण होम क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे. शेवटी याचा प्रसार टाळायचा असेल तर आपण दो गज की दूरी ठेवणे आवश्यक आहे.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : क्वारंटाईनहोम क्वारंटाईनइन्स्टिटयूशनल क्वारंटाईन याबाबत आपण मार्गदर्शन करावं.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : एखादी व्यक्ती बाहेर फिरून आला कुठून तरी इन्फेक्शन घेऊन आला व पॉझिटिव्ह झाला तर आपण "थ्री टी" प्रिन्सिपलप्रमाणे पहिल्यांदा त्या व्यक्तींचे ट्रेसिंग करतो. या व्यक्तीमुळे जे कुटुंबातील सदस्य असतात ते हाय रिस्क मध्ये येतात. हि व्यक्ती जिथे जिथे संपर्क करून आलेली असेल तिथल्या व्यक्तींना आपण लो रिस्क म्हणतो म्हणजे जिथे कमी काळ  संपर्क झाला. हाय रिस्क आणि लो रिस्क मिळून किमान दहा-पंधरा लोकांचे तरी आपण ट्रेसिंग केले पाहिजे व त्यांच्यावर ट्रॅकिंग ठेवले पाहिजे.

दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोकं  राहत असतील किंवा एका घरात १०-१५ लोकं राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही. त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक अलगीकरण) म्हणतो. ज्यांच्याकडे  मोठा फ्लॅट आहेबंगला आहेत्यामध्ये बऱ्याच खोल्या आहेतघरात सगळे सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात आणि स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवत असतील तर त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो. यासाठी आपण त्रिस्तरीय हॉस्पिटल्स केलेत.

एक म्हणजे कोवीड केअर सेंटर (सीसीसी)डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल सेंटर (डीसीएचसी) आणि तिसरं डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल (डीसीएच). रुग्ण पॉझिटिव्ह आहे परंतु लक्षणे नाहीत त्यांना आपण सीसीसीमध्ये ठेवतो. बरेच लोक  म्हणतातमाझा बंगला आहेमाझा मोठा फ्लॅट आहेमला काही लक्षणे नाहीत. अशा वेळेस मी माझ्या घरीच थांबेल. मुख्यत: संसर्ग टाळण्यासाठी या गोष्टी आहेतएवढाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. 

 

श्री. शांतिलाल मुथ्था : होम आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर किंवा राहत असताना प्रत्यक्षात कुठल्या प्रकारची खबरदारी किंवा काळजी घेतली पाहिजे?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : बाधीत रुग्णाने एका स्वतंत्र खोलीत राहायचे. दुसऱ्यांना संसर्ग होणार नये याची काळजी घ्यायची. त्यासाठी सगळ्या व्यवस्था स्वतंत्र असायलाच हव्यात. जेणेकरून त्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. पॉझिटिव्ह रुग्णाला सीसीसीडीसीएचसी किंवा डीसीएचमध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वतःची १०० टक्के काळजी घेऊ शकतात ते लोक, पीपीई किट घालूनफेस शिल्डमास्कग्लोव्हज या सगळ्या गोष्टी वापरून घरी काळजी घेऊ शकतात. एकमेकाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तर होम आयसोलेशनने  राहणे सुरक्षित आहे.

 

श्री. शांतिलाल मुथ्था : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा कोवीड केअर सेंटरची संख्या किती व त्याच्यामध्ये किती लोकांना ठेवता येऊ शकते ?

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे : ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोवीड केअर सेंटर्स ठेवण्याची व्यवस्था आहे. राज्यात साधारण २००० असे सेंटर्स आहेत. महाराष्ट्रात ३५६ तालुक्यांमध्ये कितीतरी कोव्हिड सेंटर्स आहेत. दोन-अडीच लाखांच्यावर खाटा आहेत. आजच्या घडीला आपल्याकडे दीड लाख रुग्ण आहेत. परंतु अडीच लाखांच्यावर आपल्याकडे सीसीसीचे बेड्स आहेत. यामध्ये  ऑक्सिजनची सोय नसलेले बेड्स, ऑक्सिजनची सोय असलेले बेड्स, आयसीयू  बेड्स आणि व्हेंटीलेटर्स असलेले आयसीयू बेड्स अशा बऱ्याच कॅटेगरी केल्या आहेत.

आता जम्बो फॅसिलिटीज म्हणजे एका जागेवर १०००-२००० बेड्स असतात. त्या प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय असते. ठराविक वॉर्डमध्ये डॉक्टर्स असतात. जेवणाची उत्तम व्यवस्था असते. स्वच्छ स्वच्छतागृह असतात. सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. काढा, हळदीचे गरम दूध पौष्टिक जेवण दिले जाते. प्रतिकारशक्ती वाढावी या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये.

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सगळ्या तालुक्यांमध्येसगळ्या सीसीसीच्या सेंटरमध्ये, उत्तम पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाधीत रुग्णाने मन खंबीर ठेवून कोरोनावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतलीच पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांची महिला, तिचा मुलगा जो ८० वर्षांचा आहे, त्यांचा मुलगा जो साधारण ६०-६५ वर्षांचा आहे आणि त्यांची मुलगी असे सर्वजण कोरोनामधून बरे होऊन घरी परतलेले आहेत. म्हणजे १०७ वर्षाची महिला सुद्धा कोरोनावर मात करू शकते. गरज आहे आपल्या मनाची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याची.

००००

·        मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारीत होत आहे.

·        शक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी  कोरोनाअवास्तव भीती व गैरसमज

·        शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी  कोरोनासह जगण्याची तयारी

·        रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी  कोरोनाप्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व

·        सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी  कोरोनाप्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयांवर चर्चा होणार आहे.

 

अजय जाधव..विसंअ...३.९.२०२०

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...