Monday, December 19, 2022

सकाळी 9 पासून ग्रामपंचायत

सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून पुढे सुरू केली जाईल. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. नांदेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सभागृह, प्रशासकिय इमारत येथे सकाळी 9 वा. मतमोजणी सुरू होईल. अर्धापूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा., भोकर येथे तहसिल कार्यालय तळमजला येथे सकाळी 10 वा. हदगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.

 

हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वा., किनवट येथे तहसिल कार्यालय येथे सकाळी 10 वा., माहूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., धर्माबाद येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणी सुरू होईल. उमरी येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा., बिलोली येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., नायगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., मुखेड येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., कंधार येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., लोहा येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. तर देगलूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.

 

भोकर तालुक्यात सर्वाधिक 89.34 टक्के मतदान

दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 89.34 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नांदेड तालुक्यात 71.19 टक्के, अर्धापूर तालुक्यात 88.01 टक्के, हदगाव तालुक्यात 84.12 टक्के, हिमायतनगर तालुक्यात 88.06 टक्के, किनवट तालुक्यात 82.25 टक्के, माहूर तालुक्यात 81.96 टक्के, धर्माबाद तालुक्यात 83.63 टक्के, उमरी तालुक्यात 88.84 टक्के, बिलोली तालुक्यात 85.84 टक्के, नायगाव तालुक्यात 86.82 टक्के, देगलूर तालुक्यात 86.68 टक्के, मुखेड तालुक्यात 73.39 टक्के, कंधार तालुक्यात 81.69 टक्के, लोहा तालुक्यात 86.57 टक्के एवढे मतदान झाले आहे.

 

सार्वत्रिक निवडणूक 160 ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आली. यामध्ये नांदेड तालुक्यात 6 ग्रामपंचायती, अर्धापूरमध्ये 2, भोकर 3, हदगाव 4, हिमायतनगर 1, किनवट 50, माहूर 26, धर्माबाद 2, उमरी 1, बिलोली 8, नायगाव 8, देगलूर 1, मुखेड 14, कंधार 12, लोहा 22 अशा एकुण 160 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राबविला गेला. यातील 160 ग्रामपंचायतीसाठी एकुण 489 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान झाले. यात एकुण 77 हजार 467 स्त्री मतदार तर 84 हजार 563 पुरूष मतदार व इतर दोन मतदार अशी एकुण 1 लाख 62 हजार 32 मतदार संख्या होती. यापैकी 62 हजार 999 स्त्री मतदार, 70 हजार 179 पुरूष मतदार असे एकुण 1 लाख 33 हजार 178 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची सरासरी टक्केवारी 82.19 एवढी होते.

0000

 जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात

26 डिसेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन   

नांदेड (जिमाका) दि. 19 :- नांदेड जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

भूमि अभिलेख विभागातून दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती योजनेशी संबंधीत लाभाच्या काही समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी ही पेन्शन अदालत आयोजित केली आहे. या पेन्शन अदालतमध्ये येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या बद्दल लेखी म्हणणे आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी केले आहे.

00000

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144 लागू   

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 डिसेंबर 2022 ते 19 जानेवारी 2023 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...