Thursday, May 24, 2018


अनुज्ञाप्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
विद्युत कंत्राटदारांसाठी
अभियंत्यांचा मेळावा संपन्न
नांदेड दि. 24 :- पुरेसे विद्युत कंत्राटदार उपलब्ध व्हावेत यासाठी अनुज्ञाप्ती मिळण्याच्यादृष्टिने अभियंता मेळाव्याचे आयोजन उप-प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र महावितरण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी आवश्यक कागदपत्रे व अर्जाची माहिती देण्यात आली. पात्र अभियंत्यांनी अनुज्ञाप्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन विद्युत निरीक्षक प्र. द. दहाट यांनी केले आहे.   
महावितरण कंपनी व इतर विद्युत विषयांशी निगडीत औद्योगीक क्षेत्रातील कामांसाठी  महावितरण व विद्युत निरीक्षक कार्यालयाच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्युत निरीक्षक पी. डी. दहाट, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. रसाळ, एस. के. धडके यांची प्रमुख उपस्थिती होती.     
यावेळी रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासनाची विद्युत कंत्राटदारांच्या अनुज्ञाप्तीसाठी आवश्यक असणारी माहिती, कामांची माहिती स्त्रोत त्यासाठी अनुज्ञाप्तीचे महत्व व निविदा त्यामधील अटीबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच तारतंत्री, पर्यवेक्षक व ठेकेदार अनुज्ञाप्ती परवाना यांची वेगवेगळ्या कक्षाद्वारे माहिती दिली. या मेळाव्यात अनेक उमेदवारांनी भेटी देऊन माहितीचा लाभ घेतला. विद्युत पर्यावेक्षक, तारतंत्री व विद्युत कंत्राटदार परवाना मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जाचे विनामुल्य वितरण करण्यात आले. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे माहिती पत्रक देण्यात आली, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 24 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून रविवार 27 मे 2018 पासून घोषित करण्यात येत आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा रविवार 27 मे 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मंगळवार 26 जून 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 
00000



मुलांची काळजी व संरक्षणासाठी  
बालकल्याण समिती गठीत
नांदेड दि. 24 :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत महिला व बालविकास विभागाच्या अधिसुचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी बालकल्याण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष प्रा. निरंजनकौर स्वरुपसिंग सरदार हे असून सदस्य ॲड गणेशलाल जोशी, श्रीमती सावित्री जोशी, डॉ. सुरेखा कलंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचा कालावधी तीन वर्षांसाठी आहे.
जिल्ह्यात शुन्य ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी बाल कल्याण समिती कार्यरत आहे. तशी बालके आढळल्यास त्यांना बाल कल्याण समितीकडे उपस्थित करावे, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी केले आहे.  
000000


खरीप पीक कर्ज वाटपासाठी
"सुलक्ष कर्जवाटप अभियान"
नांदेड दि. 24 :- शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटपात अडचण येऊ नये, कर्ज वाटप प्रक्रिया सोपी होण्यासाठी बँक व प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात "सुलभ पीक कर्ज वाटप अभियान" राबविण्यात येत आहे. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय बँक कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्देशही दिले आहेत.  
तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी संबंधीत तालुक्यात मंडळनिहाय कर्ज वाटपाबाबत बँकांच्या मदतीने मेळावे आयोजीत करुन पात्र शेतकरी व कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्हा अग्रणी बँकेमार्फत सर्व बँकांना खरीप पीक कर्ज वाटप प्राधान्याने करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध होण्यामध्ये अडचणी किंवा मागणी नंतर कर्ज उपलब्ध होत नसल्यास संबंधीत तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...