Monday, April 28, 2025

 वृत्त क्रमांक 451 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 28 एप्रिल :  महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. 

या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय ते महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 29 एप्रिल 2025 रोजीचे 00.00 वाजेपासून (28 एप्रिल 2025 चे मध्यरात्री 24.00 वाजेपासून) ते 3 मे 2025 च्या मध्यरात्री पर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. 

संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 450 

लेंडी प्रकल्प धरण परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 28 एप्रिल :  लेंडी प्रधान प्रकल्प मुखेड तालुक्यातील मौ. गोणेगाव अंतर्गत लेंडी प्रकल्प धरण परीसर व धरण लगत असलेली मौ. गोणेगाव, रावणगाव, मारजवाडी, हसनाळ, भाटापुर व इटग्याळ (प.दे) या गावांच्या हद्दीभारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. 

या गावांच्या हद्दीत लेंडी प्रधान प्रकल्पाची होत असलेली कामे, ये-जा करणारी यंत्रणा, साहित्य व अधिकारी-कर्मचारी यांना विरोध करणारी सर्व गतीविधीस, मोर्चे, धरणे, उपोषणे, आत्मदहन व त्याअनुषंगाने इतर जमाव करणे यांना 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 26 जून 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे. संबंधीतास नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकुण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने, आणिबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी 28 एप्रिल 2025 रोजी निर्गमीत केले आहेत.

000000

 वृत्त क्रमांक 449 

गाडेगाव येथे रेल्‍वे ओव्‍हर ब्रिज कामांमुळे

वाहनांसाठी पर्यायी मार्ग 

नांदेड दि. 28 एप्रिल : गाडेगाव येथील रेल्‍वे ओव्‍हर ब्रिजचे काम करण्‍यासाठी 20 एप्रिल ते  18 मे 2025 कालावधी पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाने  वाहने  वळविण्‍यास जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मान्‍यता दिली आहे. 

निळा जं.शंकरराव चव्‍हाण चौक-गाडेगाव-ब्राम्‍हणवाडा-मुगट हा मार्ग वाहनांसाठी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. या मार्गासाठी पर्यायी मार्ग (जाणे-येण्याकरिता) जड वाहनांसाठी शंकरराव चव्‍हाण चौक-बोंढार तर्फे हवेली-वाजेगाव-शिकारघाट-मुगट हा राहील. तर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी गाडेगाव-बोंढार तर्फे हवेली ते देगलूरनाका ग्रामीण मार्ग 37 हा राहील. वाहतुक वळविणे व पर्यायी मार्गाने सोडण्याबाबत अटी व शर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाची समक्रमांकित अधिसुचना 17 फेब्रुवारी 2025 मध्‍ये नमुद प्रमाणे कायम असतील, असेही आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 

वृत्त क्रमांक  448 

नांदेड जिल्ह्यासाठी 4 दिवस येलो अलर्ट 

वादळी वारा विजेच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता 

नांदेड दि. 28 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 29, 30 एप्रिल व 1, 2 मे 2025 हे चार दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. 2930 एप्रिल या दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर 1 मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची व दुपारनंतर संध्याकाळी विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 2 मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेचा कडकडाट  ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. 

या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी. यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नांदेड जिल्हा प्रशासनाने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. 

उष्ण व दमट हवामान असताना काय करावे

तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृतविषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे. ओआरएस म्हणजेच तोंडान घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाच पाणी घ्या. हलक्या रंगाचे, वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा. घराबाहेर असाल तर डोके झाका. एखादे कापड वापरा, टोपी घाला किंवा छत्री वापरा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरा. 

काय टाळावे:

अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्या. उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी 12 ते 3 मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. दारं खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघा. अल्कोहोल म्हणजे दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळा त्यातून शरीरातले पाणी कमी होते. उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका. शिळंपाकं खाऊ नका. चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नका. चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते. 

आकाशात विजा चमकत असल्यास या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक  447 

आगीसारख्या आपत्ती प्रसंगी  

नागरिकांनी घ्यावयाची काळजी   

नांदेड दि. 28 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात मागील काही महिन्यात आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी तसेच काही ठिकाणी जीवित हानी होण्याच्या घटना घडलेल्या असून यापुढे कोणताही आपत्तीजनक प्रसंग उद्भवू नये याकरीता नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. 

तयारी

स्टॉप ड्रॉप अॅण्ड रोल म्हणजे थांबा, खाली पडा आणि लोळा या आगीपासून बचावाच्या सरावाचा नियमित अभ्यास करा. इमारतीत धुराच्या धोक्याच्या सूचना यंत्रणा बसवल्यात का आणि त्या कार्यरत आहेत ना, याची खात्री करा. बहिर्गमन मार्ग, जिने अडथळेमुक्त ठेवा, असे पलायनमार्ग अडथळेमुक्त आहेत ना, हे नियमित तपासा. स्वयंपाक झाल्यावर सिलेंडर व्हाल्व आणि बटण बंद करा. स्वयंपाक करताना सैल, हवेत उडू शकणारे किंवा सिंथेटिक कपडे घालू नका. शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी टाळण्यासाठी विजेची उपकरणं, बटण, फ्यूज प्रमाणित वापरा. शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स पुरेसे आहेत ना, याची खातरजमा करा. विजेचे जोड सैल, कमकुवत झालेले नाहीत ना हे नियमित तपासा. सतरंजीखाली वा मॅटच्या खालून तसेच गर्दीच्या क्षेत्रात विजेच्या तारा घालू नका. वापरानंतर विद्युत उपकरणे बंद करा, प्लगदेखील भिंतीतल्या बोर्डवरच्या सॉकेटमधून काढून टाका. घरातून दीर्घ काळासाठी बाहेर जाताना विजेचा मेन स्विच आणि गॅस बंद करा. 

आग लागल्यास त्यावेळी

धोक्याची घंटा वाजवा (02462) 252555, (02462) 253101, 101 (टोल फ्री) यापैकी कोणत्याही एका नंबरवर अग्निशामक दलाला कळवा. विजेची उपकरणे बंद करा. भिंतीतून प्लग काढून टाका. दारं आणि खुल्या जागा बंद करा. दारांखाली ओले कापड टाका जेणेकरून धूर पसरणार नाही. तुम्ही तोंडावर ओले फडके गुंडाळा म्हणजे घेतला जाणारा श्वास गाळून घेतला जाईल. आग नियंत्रणाबाहेर असल्यास आगीपासून दूर जा. आगीमुळं भाजल्यास वेदना शमेपर्यंत त्यावर पाणी टाका. 

तुम्ही आगीच्या धोक्याची घंटा ऐकलीत तर

सर्वात जवळच्या बहिर्गमन मार्गाने तो परिसर सोडा. सर्व दार-खिडक्या जाण्यापूर्वी बंद करा. लिफ्टचा वापर करू नका. जिन्यानं जा. अग्निशमन यंत्रणा आल्यावर त्यांना मदतकार्यासाठी मदत करा. अग्निशमन दलाला घटनास्थळी त्वरित पोहोचण्यासाठी रस्ता द्या.अग्निशमन द्रवपदार्थ किंवा जमिनीखालच्या जलटाक्यांजवळ वाहने लावू नका. अग्निशमन जवानांना नळ, पाण्याचा तलाव, डबके, स्थिर टाकी अशा जलस्रोतांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  446 

बालकांच्या अनधिकृत संस्थाविरोधात कठोर कार्यवाही 

जिल्ह्यात अनधिकृत संस्था आढल्यास नागरिकांनी संपर्क करावा   

नांदेड दि. 28 एप्रिल :- जिल्ह्यात बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृह, अनाथाश्रम, अनधिकृत संस्था आढळुन आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड तसेच नांदेड चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा. बालकांवरील शारिरिक तसेच लैगिंक अपराध प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती रुपाली रंगारी-कोल्हे यांनी केले आहे. 

पुणे जिल्हातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृह, अनाथाश्रम, चालविले जात असल्याबाबत माध्यमाद्वारे वृत्त प्रकाशित झाले होत. या संस्थेत बालकांना अनाधिकृत डांबुन ठेवून त्यांचे शारिरिक, मानसिक, लैगिंक शोषणाच्या घटना घडत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याबाबत निर्देशनास येत आहे. ही बाब गंभीर असून बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) 2021 मधील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. 

बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षे कारावास व 1 लाखापेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल, अशी तरतुद अधिनियमात करण्यात आलेली आहे.

00000

वृत्त क्रमांक  445 

ऊसतोड कामगारांच्या समस्येवर

चर्चा करण्यासाठी बुधवारी आढावा बैठक 

नांदेड दि. 28 एप्रिल :- ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित विविध समस्येवर विशेष चर्चा करण्यासाठी बुधवार 30 एप्रिल 2025 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे सकाळी 9.30 वा. नांदेड येथील न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश दलजीतजी कौर जज यांनी आढावा बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार, मुकादम, ऊस वाहतूकदार, अपघाती मयत ऊसतोड कामगारांचे जे वारस असतील त्यांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

या बैठकीला तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेस सामाजिक न्याय विभाग नांदेड यांच्यावतीने निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नमस्कार चौकाजवळ ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे करण्यात आले आहे. संबंधित सर्वांनी या बैठकीस 30 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वा. जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000

 वृत्त क्रमांक  444

 28 एप्रिल सेवा हक्क दिन

जिल्ह्यात उत्साहात साजरा 

नांदेड दि. 28 एप्रिल :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियानाला दशकपूर्ती झाल्यानिमित्त राज्य शासनामार्फत 28 एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामपातळीवर विशेष उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यात सेवा हक्क दिवस तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या दशकपूर्ती निमित्त ग्रामसभेमार्फत जनसहभागासह विविध उपक्रम राबविण्यात आले. नागरिकांमध्ये अधिनियम, राज्यसेवा हक्क आयोगाबाबत तसेच आपले सरकार पोर्टल मार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवाबाबत जनजागृती करण्यात आली. 

जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रामार्फत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी व मुदखेड तालुक्यातील बारड येथील आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अजय शिंदे,  जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीमती मंजुषा जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) अमित राठोड, विस्तार अधिकारी (पं) आर.एन. दमकोंडवार, व्ही. बी. कांबळे, आर. पी. केंद्रे, सरपंच श्रीमती संध्याताई विलास देशमुख, उपसरपंच श्रीमती अर्चना विश्वंभर हंबर्डे, विष्णुपूरी ग्रामपंचायत अधिकारी संजय कानोडे, संगणक परिचालक उग्रसेन हंबर्डे, वसुली कारकून संतोष हंबर्डे, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवा देणारे ग्रा.पं.विष्णुपुरी ग्रामपंचायत अधिकारी संजय कानोडे, ग्रा.पं.बारड अनुप श्रीवास्तव, ग्रा.पं.माळकौठा संजय देशमुख, ग्रा.पं.उस्माननगर श्रीमती देवूबाई देशमुख, ग्रा.पं.लहानचे रवी क्षीरसागर यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

00000

वृत्त क्रमांक 443

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

नांदेड दि. 28 एप्रिल :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे आताचे जिल्हाधिकारी तथा तत्कालिन वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान करुन त्यांना विशेष कामगिरीबाबत गौरव करण्यात आला.  

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जिल्हाधिकारी वर्धा या पदावर कार्यरत असताना, महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम, 2025 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी ‘सेवा दूत’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभतेने सेवा पुरविण्यासाठी विशेष कामगिरी केली. या विशेष कामगिरीबाबत केलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श प्रस्थापित झाला आहे. या कामगिरीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

0000









 

 मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचे भव्य आयोजन;

‘वेव्हज परिषद-2025’निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

 वृत्त क्रमांक 442

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भुमिपूजन

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती 

नांदेड दि. 28 एप्रिल :- राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भुमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी आमदार भीमराव केराम, आमदार बाबुराव कोहळीकर, श्रीमती बेबीताई प्रदीप नाईक, प्रफुल राठोड, डॉ. बेलखोडे, तहसीलदार श्रीमती शारदा चोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी परोटी तांडा व परिसरातील समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले. परोटीतांडा येथील शाळेच्या मैदानावर राज्यमंत्री नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आमदार केराम, आमदार कोहळीकर, श्रीमती नाईक यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडण्याबाबत विचार मांडले. प्रास्ताविक नारायण आडे यांनी केले. शेवटी आभार डॉ. मेरसिंग चव्हाण यांनी मानले. 

सर्वप्रथम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सहस्त्रकुंड येथील महादेव मंदिराचे दर्शन घेऊन ट्रस्ट व ग्रामपंचायत वाळकीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील सरपंच, उपसरपंच, नाईक, कार्यकर्ते यासह समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.

00000




  वृत्त क्रमांक 528 उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह  इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध नांदेड दि. 23 मे :-   अतिमहत्वाचे ...