Monday, April 28, 2025

वृत्त क्रमांक  447 

आगीसारख्या आपत्ती प्रसंगी  

नागरिकांनी घ्यावयाची काळजी   

नांदेड दि. 28 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात मागील काही महिन्यात आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी तसेच काही ठिकाणी जीवित हानी होण्याच्या घटना घडलेल्या असून यापुढे कोणताही आपत्तीजनक प्रसंग उद्भवू नये याकरीता नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. 

तयारी

स्टॉप ड्रॉप अॅण्ड रोल म्हणजे थांबा, खाली पडा आणि लोळा या आगीपासून बचावाच्या सरावाचा नियमित अभ्यास करा. इमारतीत धुराच्या धोक्याच्या सूचना यंत्रणा बसवल्यात का आणि त्या कार्यरत आहेत ना, याची खात्री करा. बहिर्गमन मार्ग, जिने अडथळेमुक्त ठेवा, असे पलायनमार्ग अडथळेमुक्त आहेत ना, हे नियमित तपासा. स्वयंपाक झाल्यावर सिलेंडर व्हाल्व आणि बटण बंद करा. स्वयंपाक करताना सैल, हवेत उडू शकणारे किंवा सिंथेटिक कपडे घालू नका. शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी टाळण्यासाठी विजेची उपकरणं, बटण, फ्यूज प्रमाणित वापरा. शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स पुरेसे आहेत ना, याची खातरजमा करा. विजेचे जोड सैल, कमकुवत झालेले नाहीत ना हे नियमित तपासा. सतरंजीखाली वा मॅटच्या खालून तसेच गर्दीच्या क्षेत्रात विजेच्या तारा घालू नका. वापरानंतर विद्युत उपकरणे बंद करा, प्लगदेखील भिंतीतल्या बोर्डवरच्या सॉकेटमधून काढून टाका. घरातून दीर्घ काळासाठी बाहेर जाताना विजेचा मेन स्विच आणि गॅस बंद करा. 

आग लागल्यास त्यावेळी

धोक्याची घंटा वाजवा (02462) 252555, (02462) 253101, 101 (टोल फ्री) यापैकी कोणत्याही एका नंबरवर अग्निशामक दलाला कळवा. विजेची उपकरणे बंद करा. भिंतीतून प्लग काढून टाका. दारं आणि खुल्या जागा बंद करा. दारांखाली ओले कापड टाका जेणेकरून धूर पसरणार नाही. तुम्ही तोंडावर ओले फडके गुंडाळा म्हणजे घेतला जाणारा श्वास गाळून घेतला जाईल. आग नियंत्रणाबाहेर असल्यास आगीपासून दूर जा. आगीमुळं भाजल्यास वेदना शमेपर्यंत त्यावर पाणी टाका. 

तुम्ही आगीच्या धोक्याची घंटा ऐकलीत तर

सर्वात जवळच्या बहिर्गमन मार्गाने तो परिसर सोडा. सर्व दार-खिडक्या जाण्यापूर्वी बंद करा. लिफ्टचा वापर करू नका. जिन्यानं जा. अग्निशमन यंत्रणा आल्यावर त्यांना मदतकार्यासाठी मदत करा. अग्निशमन दलाला घटनास्थळी त्वरित पोहोचण्यासाठी रस्ता द्या.अग्निशमन द्रवपदार्थ किंवा जमिनीखालच्या जलटाक्यांजवळ वाहने लावू नका. अग्निशमन जवानांना नळ, पाण्याचा तलाव, डबके, स्थिर टाकी अशा जलस्रोतांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  816   उत्तराखंड येथे गेलेले नांदेड जिल्ह्यातील सर्व यात्रेकरू सुखरुप   नांदेड दि.  5  ऑगस्ट :- उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामु...