Wednesday, April 10, 2024

 वृत्त क्र. 329

 वृत्त क्र. 328 

इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आयोजन

नांदेड दि. 10 :- 16 नांदेड लोकसभातंर्गत आज नियोजन भवन येथे नांदेड दक्षिणचे 220 व नांदेड उत्तरचे 142 असे एकूण 362 इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाची सुरुवात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने तयार केलेल्या पिपिटीद्वारे करण्यात आले. या पिपिटीमध्ये संपूर्ण मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष विविध दाखले व उदाहरणे देवून समजून देण्यात आले. त्यामुळे  प्रशिक्षणार्थांना प्रक्रिया योग्यप्रकारे समजण्यास मदत झाली. हे प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने व ललितकुमार वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

यावेळी प्रशिक्षण मंचावर तहसीलदार उमाजी बोथीकर, रामदास कोलगणे, श्रीमती प्रगती चौडेकर, कारभारी दीवेकर, उपायुक्त मनपा, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू, बालाजी सोनटक्के, प्रशिक्षण विभाग सदस्य संघरत्न सोनसळे, संजय भालके, नागेश स्वामी तथा राजेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. पिपिटी नंतर संघरत्न सोनसळे, कार्यकारी अभियंता मनपा यांनी अत्यंत सविस्तरपणे विविध क्लिपद्वारे मतदान साहित्य हस्तगत करण्यापासून मतदान घेवून परत येईपर्यंतचे मार्गदर्शन केले. इव्हिएम यंत्र, कंट्रोल युनिट, व्हिव्हिपँटची जोडणी, सिलींग प्रक्रिया, आदर्श मतदान केंद्र रचना, विविध फॉर्म , माँकपोल, प्रदत्त मत, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील केंद्र कोणती, अशा केंद्राची वेब कास्टिंग करणे, मतदार सहाय्यता कक्षाद्वारे मतदारास कशी मदत केली जाईल, किमान सुविधा कोणत्या, प्रत्यक्ष मतदान सुरु करण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहेत, मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी डायरी, मतदान अधिकारी एक, दोन, तीनची कार्ये, विविध नमुने अशा अनेक बाबींवर भरीव मार्गदर्शन करण्यात आले. 

या प्रशिक्षणामध्ये अनेक प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे अचूक निरसन केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षिण देण्यात आले. हँन्ड्स आँन ट्रेनिंगच्या टप्प्यात मतदान यंत्र हाताळू देण्यात आल्यामुळे अनेक अडचणीवर मात करण्यात आली. मास्टर ट्रेनर म्हणून मनीष परदेशी, मोहन कलंबरकर, विवेकानंद मुधोळकर, गणेश भारती यांनी कार्य केले. या प्रशिक्षणास 362 पैकी 291 कर्मचारी उपस्थित होते. हे प्रशिक्षणास यशस्वी करण्यासाठी विजयकुमार चोथवे, साधना देशपांडे, हनुमंत जाधव, मनिषा मुटकुळे, सुशीला ठाकरे, प्रतिभा मारतळेकर, निकीता म्याड व सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0000



 वृत्त क्र. 327 

11 एप्रिल रोजी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- नांदेड जिल्ह्यात व शहरात गुरुवार  11 एप्रिल 2024 रोजी रमजान ईद (ईद उल फित्र) मोठया प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी नांदेड शहरात भरण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे. मार्केट अँड फेअर अँक्ट, 1962 चे कलम 5 अन्वये 11 एप्रिल 2024 गुरुवार रोजी नांदेड शहरात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

गुरुवारी 11 एप्रिल रोजी भरणारे आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावेत असे आदेशात  नमूद केले आहे.  

0000

 वृत्त क्र. 326 

सीईओ मीनल करनवाल यांनी

मतदार जागृतीसाठी बारड येथील कन्या शाळेस दिली भेट 

नांदेड दि. 10 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा बारड येथे भेट दिली. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनीना व शिक्षकांना मतदार जनजागृती विषयी माहिती विचारली. कु. वैष्णवी कदम व शिक्षिका हंबर्डे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच सीईओ मीनल करनवाल यांनी मुलींना मतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन केले. मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे त्यांनी अभिनंदन केले. शाळेचे काम पाहून समाधान व्यक्त केले.

0000




 वृत्त क्र. 325 

धर्म व समुदायाच्या नावावर गैरसमज पसरवणाऱ्या

5 नेटकऱ्यावर नांदेडमध्ये गुन्हे दाखल

 

फेसबुक, इन्स्टाग्रामवरील समाजकंटकांची झाडाझडती

 

नांदेड दि. 10 एप्रिल : ऐन निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्या पाच असामाजिक तत्त्वांवर नांदेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. धार्मिक व जातीय विषयांवरून लोकांची माथी भडकवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्ह्याच्या पाच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहे.

    

निवडणुकीमध्ये जात, धर्म, पंथ ,याचा वापर करू नये, अशी आदर्श आचारसंहिता आहे. मात्र ऐन निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने काही पोस्ट तयार करणाऱ्या पाच जणांना सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने हुडकून काढले आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत ही समिती कार्यरत कार्यरत आहे.

 

धर्माच्या नावावर भावना भडकविणाऱ्यावर हिमायतनगर अंतर्गत 295 (अ) अंतर्गत, मुखेड मध्ये 505 ( 2), अर्धापूर मध्ये 505 (2) व 506 ( दोन आरोपी ) माहूर 505 (2) असे दाखल केलेल्या कलमांचा तपशील आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांचे नाव जाहीर केलेले नाहीत. निवडणुका लागल्यापासून पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

 

 तथापि, तरुणांनी निवडणूक काळामध्ये जाती धर्माच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही पोस्ट एकमेकांना फॉरवर्ड करू नये. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमांवर आल्यानंतर एकमेकांची डोकी गरम करण्यापेक्षा व अफवा पसरविण्यापेक्षा थेट माहिती नांदेड पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

 

शहरात सण,उत्सवाचा व निवडणुकीचा काळ असताना काही समाजकंटक हेतूपुरस्सर अशा पोस्ट टाकतात. काही पोस्ट या जुन्या असतात, तर काही कुठल्या अन्य राज्यातील असतात. त्यामुळे अशा कुठल्याही पोस्टमुळे तणाव निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी जागृत असावे. आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवावे. कोणत्याही पोस्टवर मत बनवू नये. तसेच विचलित होऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

 

थेट संपर्क साधा....

आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा नंबर दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 324 

नांदेड लोकसभा उमेदवारांची 12 एप्रिलला प्रथम खर्च तपासणी

उमेदवारांना उपस्थिती अनिवार्य

 

नांदेड, दि. 10 एप्रिल : नांदेड लोकसभा निवडणुकीतील पात्र 23 उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा खर्च खर्च समितीकडे सादर करण्यासाठी 12 एप्रिल तारीख निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 11 ते 6 या कालावधीत उमेदवारांना निरीक्षकांसमक्ष खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे.

 

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी यासंदर्भातील आज पत्रक जारी करून 12 एप्रिलच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार काही नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असते. त्यामुळे या बैठकांना उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अनिवार्य असते.

 

लोकसभा निवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी प्रथम तपासणी तारीख निश्चित करण्यात आली आहे.कै.डॉ शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह पहिल्या मजल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही प्रथम तपासणी होणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीद्वारे नामनिर्देशित करण्यात आले,अशांकडून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केलेल्या तारखांना स्वतंत्र व अचूक हिशोब सादर करणे आवश्यक आहे.

 

अनुपस्थितीत राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांच्या अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी कसूर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये ३ वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह (अपात्र) ठरविण्यास पात्र असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...