Monday, September 11, 2023

वृत्त

 

नांदेड जिल्ह्यातील त्या 22 बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी

आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धाकडे केले रवाना

 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार


जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे संपूर्ण जिल्हाभर मुलांची तपासणी करून केली निवड

 

नांदेड, (जिमाका) दि. 11 :- राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील शुन्य ते 18 वयोगटातील मुलांची विशेष मोहिम राबवून तपासणी करण्यात आली. यासाठी 45 वैद्यकिय आरोग्य तपासणी पथके कार्यारत ठेवून संपूर्ण जिल्ह्यातून शहरी व ग्रामीण भागातील 22 मुलांची निवड करण्यात आली. ही निवड करतांना ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या मुलांची टुडी ईको चाचणी करण्यासाठी विशेष शिबीर घेण्यात आले. यातून त्वरीत उपचार व शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या 22 मुलांची निवड करून त्यांना पुढील उपचारासाठी आज आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धा येथे विशेष वाहनाने रवाना केले.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या समवेत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हणुमंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत शून्य ते 18 या वयोगटातील बालकांची 4डी म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात.

या मुलांची तपासणी ही आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धा येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. शंतनू गोमासे आणि रुग्णालयाचे डॉ. प्रतिक गडकरी ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडली. नांदेड जिल्ह्यातील एकूण 82 बालकांची तपासणी करण्यात आली. जन्मजात ह्रदयरोग असलेल्या बालकांसाठी या शस्त्रक्रियेचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊन भविष्यात ही मुले सर्वसामान्य मुलांप्रमाणे आत्मविश्वासाने आयुष्य जगू लागतात. जिल्हा कार्यक्रम समन्वयक अनिल कांबळे, व्यवस्थापक विठ्ठल तावडे, श्रीमती अनिता चव्हाण, गुनानंद सावंत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000



  वृत्त 

अपघात भरपाईपोटी सुमीत शिवाजी पवार यांना

लोकअदालतीत 25 लाख 50 हजार रुपयाची भरपाई

 

·​ न्यायालयीन आवारात व्हीलचेअरवर असलेल्या सुमितला न्यायाधीशांनी जागेवर जाऊन निवड्यासह दिला धीर

·​ नांदेड येथील लोकअदालतीच्या माध्यमातून तब्बल 7 हजार 174 प्रकरणे सामोपचाराने निकाली

                                                                                                            

नांदेड, (जिमाका) दि. 11 :- सामोपचाराने मिटणारी प्रकरणे दोन्ही पक्षाकडून पुढाकार घेतल्यास लोक अदालतीच्या माध्यमातून तात्काळ निकाली निघतात. यात दोन्ही पक्षांना न्यायाच्या समाधानासह वर्षोनिवर्षे न्यायालयासाठी होणाऱ्या वेळेची व पैशाची बचत करता येऊ शकते, असा संदेश नांदेड जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीने सर्वदूर पोहोचविला. नुकत्याच झालेल्या लोक अदालतीत तब्बल 7 हजार 174 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. यातील आर्थीक व्यवहाराशी निगडीत असलेल्या प्रकरणात 35 कोटी 10 लाख 42 हजार 22 रुपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली हे विशेष.

                                                                                     

न्यायालयीन प्रकरणात सामोपचाराने आपआपसातील वाद, तंटे मिटावेत या उद्देशाने जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे तडजोड झालेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार व सहकार न्यायालयाच्या प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा यात समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत 1 हजार 197 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत.

 

पती-पत्नीच्या कौटुंबिक वादाची

52 प्रकरणे तडजोडीने मिटली 

सहजीवनाला परस्पर आदर भावातून समजून घेणे यात वाद उद्भवत नाहीत. तथापि काही कुटूंबात, पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला जातात. ही प्रकरणे न्यायालयात जातात. यात विनाकारण दोन्ही कुटुंब होरपळून निघतात. कौटुंबिक न्यायालयात अशा प्रकारची सुरू असलेली प्रकरणे दोन्ही  पक्षांच्या सामोपचाराने निकाली निघावित यासाठी लोकअदालतीमध्ये भर देण्यात आला. यात पती-पत्नीचे व कौटुंबिक वादाची एकूण 52 प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली. 5 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरुवात करुन लोकअदालतीचा लाभ संपादन केला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी दाम्पत्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.   

 

अपघातग्रस्त सुमितला लोक अदालतीत न्याय देण्यासाठी

प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्हावकर पोहचले न्यायालयीन आवारात 

सुमित शिवाजी पवार यांचा 9 डिसेंबर 2020 रोजी अपघात झाला होता. त्यांनी मोटर अपघात दावा दाखल केला होता. त्यांचा एकुण दावा 50 लाख रुपयांचा होता. तथापि यात दोन्ही पक्षांनी आपआपसात तडजोड करून या लोक अदालतीचा मार्ग स्विकारावा असे त्यांना सूचविले होते.  

 

जिल्हा न्यायाधीश चंद्रशेखर मराठे पॅनल अध्यक्ष यांनी व्हिलचेअरवर असलेल्या सुमितला न्यायालयीन आवारात जाऊन सामोपचाराने तडजोड घडवून आणली. सुमित पवार यांच्या अपघात भरपाईपोटी 25 लाख 50 हजार रुपये या किंमतीवर तडजोड घडवून आणली. या लोक अदालतीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एकुण प्रलंबित 55 दिवाणी प्रकरणात सामोपचाराने तडजोड करण्यात आली. या प्रकरणाचे मुल्य 18 कोटी 49 लाख 14 हजार 486 रुपये इतके होते.

 

या लोक अदालतीच्या निमित्ताने स्टेट बॅंक ऑफ इंडिया, नांदेड विभागीय अधिकारी कालीदास व जगताप यांनी त्यांचे विभागातर्फे नांदेड जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी भव्य पेंडालची व्यवस्था करुन लोकअदालतीसाठी जमलेल्या सर्व पक्षकारांसाठी खिचडी वाटपाची सेवा देवून सहकार्य केले. जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व सन्माननिय विधिज्ञ आणि भूसंपादन अधिकारी, आयुक्त नांदेड वा.म.न.पा., महसुल विभाग अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड व प्रबंधक, जिल्हा न्यायालय व सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.

 

या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज, नांदेड मुख्यालयातील व तालुका स्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी लोक अदालत उद्घाटन समारंभासाठी उपस्थित पक्षकारांना लोक अदालतीचे महत्व समजावून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावेत असे आवाहन करुन कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप केला. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले तसेच ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानुन यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

00000





  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...