Monday, July 3, 2017

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 3 :- समाजातील वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणानी अधिक प्रयत्नशील रहावे , असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात "वंचित घटकांना दिलासा" या संदर्भात आयोजित बैठकीत श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. पी. पी. घुले, के. बी. दिक्षीत, जी. बी. सुपेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय उशीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, पंचायत  समितीचे विस्तार अधिकारी डी. एच. देशपांडे, नायब तहसिलदार विजय चव्हाण आदि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अशा घटकांना शोधून त्यांना त्यांचे हक्क प्रदान करणे ही बाब महत्वपुर्ण आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. जिल्ह्यात ज्या भागात वंचित घटकांची संख्या अधीक आहे असे भाग निश्चित करुन त्याठिकाणी प्राधान्य दयावे.
जिल्ह्यात कुठलाही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वंचित कुटुंबाचा शोध घेवून त्यांच्या पुनर्वसनाबरोबर आरोग्य, शिक्षण, निवारा, अन्न-धान्य, शिधापत्रिका, व्यवसायासाठी अर्थसहाय्य या सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना विविध योजनाचा एकत्रित लाभ देण्यासाठी नियोजन करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.
यावेळी श्री. अऊलवार यांनी समाज कल्याण विभागाची यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातूनही वंचित घटकांना लाभ देता येईल, असे सांगितले.
प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी जिल्ह्यातील वंचित घटकांचा शोध घेतला असता 668 कुटुंब संख्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याची तालुकानिहाय यादी तयार करुन संबंधीत अधिकारी यांनी दिलेली आहे. या घटकांना लाभ देण्याच्या दृष्टिने नियोजनही करण्यात येत आहे, असे सांगितले.  

000000
नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवर
तात्काळ निकाली काढाव्यात -  जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 3 :-  नागरिकांच्या तक्रारीचे स्थानीक पातळीवर दखल घेवून तात्काळ निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समिती बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले, पोलीस उपअधिक्षक व्ही. पी. नांदेडकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, कृषि, आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की, नागरिकांना आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनामध्ये सातत्याने यावे लागू नये, यासाठी त्यांचे तक्रारीचे स्थानिक पातळीवर निराकरण झाले पाहिजे. आपले सरकार वेबपोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे. त्यावर दाखल तक्रारीचे अधिकाऱ्यांनी त्वरीत निराकरण करावे, दाखल तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती वेब पोर्टलवर अद्यावत करावी. त्यामुळे या तक्रारी प्रलंबीत दिसणार नाहीत. सेवा हमी कायदामुळे सामान्य नागरिकांना विहित कालावधीत सेवा मिळण्याचा हक्क मिळाला आहे. हा कायदा लागू झाल्याने नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाईन देण्यावर अधिकाऱ्यांनी भर दयावा, असा सूचनाही श्री. डोंगरे यांनी दिल्या.  
या लोकशाही दिनी 55 तक्रारी दाखल झाल्या. नागरिकांचे अर्ज, निवेदनावर प्रत्यक्ष चर्चा करुन संबंधीत यंत्रणांना अनुषंगीक कार्यवाहीबाबत निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.

0000000
जिल्हा दक्षता, नियंत्रण समितीची बैठक संपन्न
नांदेड , दि. 3 :- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात संपन्न झाली. 
यावेळी पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार,  सहाय्यक पोलीस निरीक्षक (नाहसं) श्रीमती एम. एम. कदम आदी उपस्थित होते.
मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या गुन्ह्यांचा तपास करुन ही प्रकरणे त्वरने निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले. अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 नागरी हक्क संरक्षण व भादवि कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा आढावा घेवून श्री. डोंगरे यांनी या गुन्ह्याचा तपास त्वरीत करुन ही प्रकरणे त्वरेने निकाल काढण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील रहावे, अशा सचना दिल्या.
यावेळी श्री. आऊलवार यांनी जिल्ह्यात दाखल गुन्ह्यासंबंधी माहिती देताना जुन 2017 मध्ये 8 गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे पोलीस तपासावर आहेत, असे सांगितले.

00000
आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांसाठी
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड, दि. 3 :-  आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात मंगळवार 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु होणाऱ्या 94 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धापरीक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन गुरुवार 27 जुलै 2017  तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रवेशाच्या अटी- उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवाराचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परिक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परिक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदविधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 31 जुलै 2017 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँकेमध्ये चालू खाते आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा या प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनाची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर गुरुवार 27 जुलै 2017 पर्यंत शैक्षणिक पात्रतेच्या व जातीच्या प्रमाणापत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट जि. नांदेड यांनी कळविले आहे. अधिक माहिती व तपशीलासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवाराकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पेटकुलेनगर, गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड दूरध्वनी 02469-221801 येथे संपर्क साधावा. 
000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...