Monday, September 3, 2018


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 3 :- "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने  बुधवार 5 सप्टेंबर 2018 रोजी डॉ. करराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायं 3 यावेळात पुणे येथील अमोल दशपूते हे  स्पर्धा परीक्षेतील एन.सी.ई.आर.टी (NCERT) अभ्यासक्रम संदर्भात तर नाशिक येथील सचिन वारुळकर हे केंद्र, राज्य शासनाच्या संरक्षण / गृह विभागामार्फत होणाऱ्या विविध परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
00000


युद्वामध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या
सैनिकांसाठी अर्थसाहय्य योजना
         नांदेड, दि. 3 :- युद्वात सक्रिय सहभाग घेतलेल्या व माजी सैनिक व्याखेत येणारे सैनिक ज्यांना निवृत्ती वेतन किंवा अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही अशा माजी सैनिक / विधवा / अवंलंबित यांचे उदर निर्वाहासाठी अर्थसहाय्य योजना सुरु करण्याबाबत शासन विचाराधीन आहे.
जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी / विधवांनी ज्यांना निवृत्ती वेतन मिळत नाही व ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत तसेच इतर आर्थीक लाभ व  इतर लाभ जसे पेट्रोलपंप वितरण, गॅस एजन्सी, नौकरी, जमीन राहण्यासाठी घर किंवा इतर आर्थीक उत्पन्नाचे साधन आहेत अशा माजी सैनिकांना हा लाभ मिळणार नाही.  जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी व  अर्ज दिनांक 5 सप्टेंबर 2018 पर्यंत करावे, असे मेजर सुभाष सासने  जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


धर्माबाद तालुक्यातील  मतदारांची
प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
            नांदेड, दि. 3 :- धर्माबाद तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांची आढावा बैठक 1 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. त्यामध्ये भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम 1 सप्टेबर रोजी तालुक्यातील मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यासंदर्भात मतदारांनी दावे व हारकती 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करावे, असे आवाहन सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धर्माबाद ज्योती चौहाण यांनी केले आहे.
दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पुर्ण होत असलेल्या पात्र मतदारांनी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO)  यांच्याकडे फॉर्म नमुना नं 6 मध्ये भरुन द्यावेत. तसेच मतदार यादीतील नावे वगळण्यासाठी नमुना नं 7, दुरुस्तीसाठी नमुना नंबर 8 व विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्थलांतरणासाठी नमुना नं 8 अ भरुन संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे द्यावा. तसेच सर्व मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत याबाबतची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार धर्माबाद ज्योती चौहाण यांनी केले आहे.
बिएलओ यांना फॉर्म नंबर 6, 7, 8, 8 अ देण्यात आले. बैठकीत नायब तहसिलदार निवडणूक सुनिल माचेवाड यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत बिएलओ तसेच पर्यवेक्षक तथा तलाठी, लिपीक मिलींद टोणपे, निवडणूक ऑपरेटर मोहन भंडरवाड आदि उपस्थित होते.
00000


लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक
प्रारुप प्रभाग रचना, आरक्षण निश्चितीबाबत
आक्षेप, हरकती, सूचना असल्यास नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड दि. 3 :- नगरपरिषद लोहाच्या प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत कोणत्या व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपरिषद लोहा यांचेकडे मंगळवार 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी सादर करावे. मुदतीनंतर 11 सप्टेंबर नंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नगरपरिषद लोहाच्या 2018 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी ठरवून दिलेल्या आरक्षणाचे प्रमाणानुसार लोहा नगरपरिषद क्षेत्रातील एकुण प्रभागापैकी अनुसूचित जाती (स्त्री), अनुसूचित जमाती (स्त्री), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), आणि सर्वसाधारण स्त्रीयांसाठी 31 ऑगस्ट 2018 रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी लोहा नगरपरिषद कार्यालय लोहा येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपरिषद क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
0000000


लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ
स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन
सकारात्मक असावा - अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड, दि. 3 :-  स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थी, युवक-युवतीनी या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवावा, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नरहर कुरुंदकर सभागृहात लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी नांदेड एज्यूकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष श्यामला पत्की यांची तर प्रमुख वक्ते म्हणून नांदेड येथील परीवीक्षाधीन पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल यांची उपस्थिती होती. यावेळी पिपल्सचे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. यु. गवई यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. 
स्पर्धा परीक्षेसाठी करावयाच्या तयारी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्नांची गरज आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर विद्यार्थ्यांची जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगली तर स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळू शकते. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची पद्धती समजावून घेऊन नियोजन करुन अभ्यास केल्यास आणि अभ्यासात कायम सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक साहित्याचे वाचन महत्वाचे असून संदर्भग्रंथ आणि वृत्तपत्र वाचनाची सवय लावली पाहिजे. राज्य आणि देशात घडणाऱ्या घटनांचा वेध आपल्या वाचनात घेतला पाहिजे, असे सांगतांना त्यांनी जिल्हा प्रशासनातर्फे सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या "उज्ज्वल नांदेड" या उपक्रमाची माहिती देवून दर महिन्यांच्या 5 तारखेला शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणाऱ्या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
लोकराज्य मासिकाच्या वैविध्यपूर्ण अंकाविषयी बोलतांना पाटील म्हणाले की, देशातील सर्वाधिक खपाच्या शासकीय नियतकालिकाचा विक्रम करणाऱ्या लोकराज्य वाचकवर्ग वाढत असून स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शक ठरत आहे. लोकराज्यचा मोठ्या संख्येने वर्गणीदार होवून युवकांनी स्पर्धा परीक्षेतील यशाचा मार्ग खुला करुन घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नांदेड येथील पोलीस दलात परीवीक्षाधीन पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झालेले आयपीएस अधिकारी संदीपसिंग गिल यांनी यावेळी विशेषत: युपीएससी परीक्षेतील यश मिळविण्यासाठी आपल्या स्वानुभावावर आधारित मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी, बँक प्रोबेशनरी ऑफिसर यासारख्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याकरीता युवक-युवतींनी अभ्यासाचे काटेकोर नियोजन करणे महत्वाचे आहे. वेळेचे नियोजन, वृत्तपत्र मासिकांचे वाचन, सातत्य, चालू घडामोडीची माहिती, अंकगणित व बुद्धीमत्ता चाचण्यांची तयारी करण्याबरोबरच परीक्षा पद्धतीचाही बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. आयुष्यात प्रथम आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक असून ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी मनापासून सर्वतोपरी तयारी करणे गरजेचे आहे. नवनवीन ज्ञानाची भर घालत स्पर्धा परीक्षेचा सातत्याने सराव करण्याची आवश्यकता आहे, असेही संदीपसिंग गिल यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी युवक-युवतींशी दुहेरी संवाद साधला.
नांदेड एज्यूकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती श्यामला पत्की यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मनापासून तयारी करण्याची गरज अधोरेखित केली. अपयशाला न खचून जाता सातत्याने परीश्रमपूर्वक प्रयत्न केले तर यश हमखास आहे. इच्छा तेथे मार्ग या संकल्पनेचा आपल्या आयुष्यात अवलंब केला तर यशस्वी होण्याची खात्री आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी पाहूण्यांचे पुष्पगुच्छ व  लोकराज्यचा अंक देवून स्वागत केले आणि प्रास्ताविकात लोकराज्य वाचक अभियानाविषयी माहिती दिली. लोकराज्य मासिकाचा प्रचार, प्रसार करण्याच्या हेतूने व लोकराज्यचे महत्व जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान असल्याचे सांगत त्यांनी लोकराज्यच्या संदर्भमुल्य असलेल्या  विविध विशेषांक आणि इतिहासाची माहिती यावेळी दिली. यावेळी प्राचार्य जाधव यांनीही पाहुण्यांचे महाविद्यालयाच्यावतीने स्वागत केले. यावेळी लोकराज्यचे नियमित वाचक असलेल्या मुंजाजी चव्हाण या विद्यार्थ्यांने लोकराज्यची माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कल्पना जाधव यांनी केले तर शेवटी विजय होकर्णे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, श्रीमती अलका पाटील, म. युसूफ, बालनरसय्या अंगली  तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
लोकराज्य प्रदर्शन
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाच्या गेल्या चार वर्षातील अंकांचे यानिमित्ताने प्रदर्शन मांडण्यात आले. यामध्ये अनेक संग्राह्य अशा दुर्मिळ अंकाचा समावेश होता. या प्रदर्शनाला अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपाध्यक्षा श्यामल पत्की यांच्यासह मान्यवरांनी तसेच युवक-युवतींना भेट देवून लोकराज्य ऐतिहासिक दस्तावेजाचे अवलोकन केले. या ठिकाणी लोकराज्य अंकांच्या प्रतीची विक्री आणि वार्षिक वर्गणीदार म्हणून नोंदणी करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
*****







पथदर्शी प्रकल्पासाठी निवडलेल्या
पात्र राशनकार्ड धारकांनी
आयएम-पीडीएस योजनेचा लाभ घ्यावा
नांदेड, दि. 3 :- राज्यातील पथदर्शी प्रकल्पासाठी निवडलेल्या जिल्ह्यातील पात्र राशनकार्ड धारकांनी आयएम-पीडीएस योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातून घेण्यासाठी जवळ असलेल्या रास्तभाव दुकानदार यांचेशी संपर्क साधून तहसिल कार्यालयात माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
आयएम पीडीएस योजनेबाबत केंद्र शासनाने देशांतर्गत अन्न वितरण प्रणालीमध्ये पीडीएस Portability करण्याचा निर्णय घेतला असून Pilot स्वरुपात सुरुवात म्हणून देशभरात पुढीलप्रमाणे चार राज्य व 22 जिल्ह्यांची प्रायोगिक तत्वावर निवड केलेली आहे.
यात महाराष्ट्र राज्यात नांदेड, मुंबई सिटी, मुंबई ग्रामीण, यवतमाळ आणि चंद्रपुर, आंध्रप्रदेश राज्यात- कृष्णा, गुनटूर, पश्चिम गोदावरी, करनुल आणि प्रकाशम. तेलंगाना राज्यात - हैद्राबाद, नालंगोंदा, खाम्म, नागारकारनुल, अदिलाबाद, निझामबाद, तर हरयाणा राज्यात- फरीदाबाद, गुरुग्राम, झांजर, रेवारी आणि सोनिपथ या जिल्ह्यांचा समावेश आहे.  
आयएम-पीडीएस योजनेंतर्गत दुसऱ्या राज्यातील राशनकार्डधारक काही कारणास्तव आपल्या राज्यात राहत असल्यास अशा राशनकार्ड धारकांना धान्यापासून वंचित राहू नये म्हणून आपल्या राज्यातून AePDS प्रणालीद्वारे धान्याचा लाभ दयावयाचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशनकार्ड धारक यांच्याकडे पुढील बाबी असणे आवश्यक आहे. उपरोक्त राज्याच्या जिल्ह्यातील राशनकार्ड धारक असावा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थी असावा. AePDS प्रणालीवर नोंद झालेला असावा. राशनकार्ड धारकाकडे आधार कार्ड किंवा राशनकार्ड असावे. इतर राज्यातील राशनकार्ड धारकास एम-पीडीएस योजनेमध्ये महराष्ट्र राज्यातील धान्य वाटपाचे ठरलेल्या प्रमाण व दरानुसारच धान्य वितरीत केले जाईल.
वरील राज्यातील पथदर्शी प्रकल्पासाठी निवडलेल्या जिल्ह्यातील पात्र राशनकार्ड धारकांनी एएम-पीडीएस योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातून घेण्यासाठी जवळ असलेल्या रास्तभाव दुकानदार यांचेशी संपर्क साधून तहसिल कार्यालयात माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...