वृत्त क्र. 671
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी
वृत्त क्र. 671
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी
वृत्त क्र. 670
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे
राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ; 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
· अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट
नांदेड, दि. 5 ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024' चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024आहे. संपूर्ण भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या
सदर स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.
7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे 4 जिल्हे प्रत्येकी 3 आणि हे 4 जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील.
राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईचे संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.
00000
वृत्त
क्र. 669
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा
नांदेड दि. 5 :- राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
मंगळवार 6 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 2 वाजता हैद्राबाद येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. बुधवार 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून शासकीय वाहनाने हदगावकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत रुई येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यत हदगाव येथे महिला मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता हदगाव येथून वाहनाने भोकर कडे प्रयाण. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यत भोकर येथे युवक-युवती व महिला मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता भोकर येथून वाहनाने नांदेड शहराकडे प्रयाण. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यत नांदेड येथे शुक्ला कॉम्प्लेक्स, नवीन मोंढा नांदेड येथे आगमन व जनसंपर्क विभागीय कार्यालयाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 2 ते 2.30 पर्यत नांदेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी राखीव. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड . दुपारी 3 वाजता नांदेड येथून वाहनाने हैदराबाद कडे प्रयाण.
00000
वृत्त
क्र. 668
नवीन फौजदारी कायदे-2023 विषयी जिल्हा व सत्र न्यायालयात
7 आणि 8 ऑगस्ट रोजी मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन
दिनांक 5 ऑगस्ट :- केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवे फौजदारी कायदे- 2023(New Criminal Law-2023) या विषयावर जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेडच्या परिसरात 7 व 8 ऑगस्ट 2024 रोजी दोन दिवशीय मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व साक्ष्य अधिनियम 2023 या कायद्याविषयी माहिती मल्टिमिडीया व एलईडी वॉलच्या माध्यमातून संक्षिप्त स्वरुपात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हे नवीन कायदे देशात 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेत, हे कायदे पुर्वीच्या भारतीय दंड संहिता(आयपीसी) व फौजदारी प्रक्रीया संहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेणार आहेत.या नवीन कायद्यामध्ये काही कलम हटविण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. या कायद्यामुळे पोलीस,वकील, न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपध्दतीत मोठा बदल होणार आहे.
या नवीन भारतीय फौजदारी कायद्याची माहिती सर्व सामान्य जनता, युवक- विद्यार्थी, वकील- पक्षकार आणि पोलीस प्रशासनास व्हावी या दृष्टीकोनातून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एम. कौसमकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी. एम जज, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खूले असणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
०००००
वृत्त क्र 667 दिनांक 3 ऑगस्ट 2024
अवयवदान जनजागृतीसाठी प्रत्येकांने पुढाकार घ्यावा: जिल्हाधिकारी
• अवयवदानामुळे अनेक रुग्णांना मिळते जीवनदान
• अवयवदान जनजागृती रॅलीस मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी
नांदेड दि. 3 ऑगस्ट :- अवयवदान किंवा अंगदान हा विषय फार महत्वाचा असून, अवयवदात्याच्या या सर्वश्रेष्ठ दानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळते, त्यामुळे या कार्यात सर्वानी पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
आज आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
देशात जगात आज अनेक रुग्ण अवयव प्रत्यापरोपणासाठी प्रतिक्षेत आहेत. त्यांना जीवनदान देण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे आवश्यक आहे. आपल्या मुत्यूपश्चातही आपण अवयवदान करुन समाजाच्या, इतराच्या कामी लागू शकतो ही भावना बाळगून समाजातील प्रत्येकांने अवयवदानासाठी व अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, न्यायाधीश शिवाजी इंदलकर, ए.पी.कराड, एम.आर. सोवनी, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे निबंधक शशिकांत ढवळे, संचालक मल्लिकार्जून करजगी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, अनेक सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींची तसेच जिल्ह्यातील 30 शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ दान कोणते असेल तर ते अवयवदान असून यांची समाजात जनजागृती होणे खूप आवश्यक आहे. अवयवदानाचे महत्व आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने या पुण्यकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करुन अवयवदानाची गरज अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केली.
आपले आरोग्य सुदृढ असेल तरच आपण अवयवदाते होवू शकतो यावर भर देतानांच एक अवयवदाता 8 ते 9 गरजू रुग्णांना अवयवदान करुन जीवनदान देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
समाजात जनजागृती करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जनजागृती मोहिम आयोजित केली होती. या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयातर्फे विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्यानमाला आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मोहिमेचा उद्देश समाजात अवयवदानाचे महत्व पटवून देणे आणि अधिकाधिक लोकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे हा होता. या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. सचिन तोटावार, प्रशासकीय अधिकारी डॉ. बालाजी डोळे सहयोगी प्राध्यापक , समाज सेवा अधिक्षक, आणि विभागातील निवासी डॉक्टरांनी विशेष योगदान दिले.
00000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...