Monday, August 5, 2024

 वृत्त क्र 667 दिनांक 3 ऑगस्ट 2024 

अवयवदान जनजागृतीसाठी प्रत्येकांने पुढाकार घ्यावा: जिल्हाधिकारी

अवयवदानामुळे अनेक रुग्णांना मिळते जीवनदान

अवयवदान जनजागृती रॅलीस मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी 

नांदेड दि. 3 ऑगस्ट :- अवयवदान किंवा अंगदान हा विषय फार महत्वाचा असून, अवयवदात्याच्या या सर्वश्रेष्ठ दानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळते, त्यामुळे या कार्यात सर्वानी पुढाकार घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

आज आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

      देशात जगात आज अनेक रुग्ण अवयव प्रत्यापरोपणासाठी प्रतिक्षेत आहेत. त्यांना जीवनदान देण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे आवश्यक आहे. आपल्या मुत्यूपश्चातही आपण अवयवदान करुन समाजाच्या, इतराच्या कामी लागू शकतो ही भावना बाळगून समाजातील प्रत्येकांने अवयवदानासाठी व अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले


 अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख,  न्यायाधीश शिवाजी इंदलकर, ए.पी.कराड, एम.आर. सोवनी, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे निबंधक शशिकांत ढवळे, संचालक मल्लिकार्जून करजगी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, अनेक सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींची तसेच जिल्ह्यातील 30 शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ दान कोणते असेल तर ते अवयवदान असून यांची समाजात जनजागृती होणे खूप आवश्यक आहे. अवयवदानाचे महत्व आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने या पुण्यकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करुन अवयवदानाची गरज अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केली.

 आपले आरोग्य सुदृढ असेल तरच आपण अवयवदाते होवू शकतो यावर भर देतानांच एक अवयवदाता 8 ते 9 गरजू रुग्णांना अवयवदान करुन जीवनदान देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. 

समाजात जनजागृती करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जनजागृती मोहिम आयोजित केली होती. या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयातर्फे विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्यानमाला आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मोहिमेचा उद्देश समाजात अवयवदानाचे महत्व पटवून देणे आणि अधिकाधिक लोकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे हा होता. या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. सचिन तोटावार, प्रशासकीय अधिकारी डॉ. बालाजी डोळे सहयोगी प्राध्यापक , समाज सेवा अधिक्षक, आणि विभागातील निवासी डॉक्टरांनी विशेष योगदान दिले. 

00000


















No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...