Wednesday, April 17, 2024

वृत्‍त क्र. 357

टपाली मतदान करताना उमेदवारांनी प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन

गृह मतदानाच्या प्रक्रियेला लक्षात घेण्याचे आवाहन

नांदेड,दि. 17 : लोकसभा निवडणूक काळातील जे कर्मचारी टपाली मतदान करणार आहे. त्यांच्यासाठी ही सुविधा दुसऱ्या व तिसऱ्या प्रशिक्षण स्थळी उपलब्ध होणार आहे. नमुना क्रमांक बारा भरून टपाली मतदान करण्याच्या या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी उमेदवारांनी आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

लोकसभा निवडणूक काळात मोठ्या संख्येने कर्मचारी कर्तव्यावर असताना मतदानाच्या दिवशी मतदान करू शकत नाही. त्यांच्यासाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. फॉर्म क्रमांक 12 भरून टपाली मतदान करता येते. ही सुविधा दुसऱ्या व तिसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी ज्या विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्या प्रशिक्षण स्थळाच्या ठिकाणी दोन मतदार सुलभता केंद्र उपलब्ध करण्यात येत आहे.

ही सुविधा 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदारांसाठी व 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासोबत मतदान होणाऱ्या बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी या लोकसभा मतदारसंघातील मतदार कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर मतदान केंद्राच्या ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला आपला एक प्रतिनिधी नियुक्त करता येणार आहे. याबाबतची नेमणूक उमेदवारांनी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

तसेच नांदेड लोकसभा अंतर्गत जे मतदार 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. दीव्यांग आहेत.ज्यांनी नमुना नंबर 12डी मध्ये अर्ज भरून दिलेले आहेत. अशा मतदारांना गृह मतदानाची सुविधा 18 ते 21 एप्रिल या काळात निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मतदान पथक अशा मतदारांकडून पुढील चार दिवसात (18 ते 21 एप्रिल) मतदान करून घेणार आहे. यावेळी देखील एक प्रतिनिधी नियुक्त करता येईल. या संदर्भातील कल्पना मतदान करणाऱ्या मतदारांना तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना देण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

०००००

 वृत्‍त क्र. 356 

नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध

 

नांदेड दि. 17 - नांदेड जिल्ह्यात 17 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार ड्रोन कॅमेराड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.

 

याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एकतर्फी आदेश 16 एप्रिल 2024 रोजी निर्गमीत केले आहे.

00000

 वृत्‍त क्र. 355  

नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट ;

वादळी वारे व पावसाची शक्यता

नांदेडदि. 17 : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रमुंबई यांनी दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 17 ते 21 एप्रिल 2024 या पाच दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. 


या दरम्यान जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीविजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

000

  वृत्‍त क्र. 354  

खर्च निरीक्षकांसमोर आज द्वितीय खर्च तपासणी


उमेदवार किंवा प्रतिनिधीची उपस्थिती अनिवार्य

 

नांदेड दि. 17 :- भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्‍या परिपत्रकानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्‍या अनुषंगाने 16-नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चाची व्दितीय तपासणी 18 एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे.

 

द्वितीय तपासणी गुरूवार 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते सायं 6 वाजेपर्यंत कै. डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन कॅबिनेट बैठक कक्ष तळमजला जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे होणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्‍यांच्‍या प्रतिनिधींनी निवडणुकीच्‍या अनुषंगाने केलेल्‍या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्‍यासमोर सादर करणे आवश्‍यक आहे. सर्व निवडणूक निरीक्षक यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 

लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 च्‍या कलम 77 नुसार निवडणुकीच्‍या वेळेस प्रत्‍येक उमेदवार एकतर स्वतः किंवा प्रतिनिधीद्वारे सर्व खर्चाचा स्‍वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्‍यक आहे.

 

अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळावेळी निर्गमीत केलेल्‍या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणा-या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्‍याच्‍या कायद्याच्‍या आवश्‍यकतांचे अनुपालन करण्‍यात निवडणूक लढविणा-या उमेदवाराने कसूर केल्‍यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्‍या कलम 10 क अन्‍वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्‍या कालावधीसाठी निरर्ह ( अपात्र ) ठरविण्‍यास पात्र असेल याची नोंद घ्‍यावीअसे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यांनी केले आहे.

००००

 वृत्‍त क्र. 353 

खर्च निरीक्षक डॉ. जांगिड़ यांच्याकडून रात्री उशिरा नाक्यांची तपासणी

 

नांदेड दि. 17 : नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत नियुक्त खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी रात्री उशिरा आकस्मिक भेटी देऊन अनेक नाक्‍यांची तपासणी केली आहे. त्यांच्या या भेटीमुळे यंत्रणा सतर्क झाली असून मोठ्या प्रमाणात नाकेबंदी केली जात आहे.

 

लोकसभा आचारसंहिता लागल्यानंतर सर्वात प्रथम आलेले खर्चनिरीक्षक डॉ.जांगिड यांनी आपल्या अचानक दौऱ्यातून नांदेड शहरभोकरमालेगावकासारखेडा आदी ठिकाणच्या विविध स्थानिक निगराणी दलांच्या कामकाजाचा आढावा घेतला. याशिवाय भरारी पथक नेमके काय काम करत आहेत याबाबतही त्यांनी चौकशी केली.

 

नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नगदी रोकडसोनेचांदीमद्य व मादक पदार्थ व अन्य काही भेटवस्तू जप्त करण्यात आले आहे. डॉ.जांगिड यांच्याकडून वेळोवेळी अशा प्रकारे अचानक पाहणी केली जात असल्यामुळे निवडणूक काळातील तपासणी पथके जागृत झाली आहेत.

 

जिल्ह्यात सध्या 25 निगराणी केंद्र आहेत. ज्या ठिकाणी 24 तास वेगवेगळ्या वाहनांची तपासणी केली जाते. या काळात नगदी रक्कममादक पदार्थमद्य याची तस्करी प्रतिबंधित केली जाते. अशाच प्रकारच्या 60 फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. फिरत्या पथकाकडून देखील अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकारावर नियंत्रण ठेवले जात आहे.

00000











वृत्‍त क्र. 352 

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास

जिल्‍हाधिकारी व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा 

नांदेड, 17 एप्रिल- लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आल्या आहेत. एलएईडी रथाचे आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एलईडी रथ रवाना करण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी विकास माने, महापालिकेचे उपायुक्त अजिपालसिंह संधू, तहसीलदार निलेशकुमार बोलेलू, शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप बनसोडे आदीची उपस्थिती होती. 

या एलईडी रथाव्दारे मतदान जनजागृतीच्या चित्रफिती, नागरिकांनी मतदान करावे यासंदर्भातील जिल्हाधिकारी, सीईओ, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांनी दिलेले निवेदन व आवाहन दाखविले जाणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात नांदेड लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

बसस्‍टॅडवरुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद्घोषणा, पथनाट्य, निवडणूक प्रतिज्ञा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाचे महत्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. आज रवाना करण्यात आलेल्या एलईडी रथाव्दारे नांदेड लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. यावेळी स्वीपचे प्रलोभ कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, सुनील मुत्तेपवार, रवी ढगे आदींची उपस्थिती होती. जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती विषयक विविध उपक्रम राबवित आहेत.

00000






वृत्‍त क्र. 351 

नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू

18 ते 21 एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान


नोंदणी केलेले 699 मतदार करणार मतदान


जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मतदारांना घरी जाऊन निमंत्रण

नांदेड दि. 17 :  निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात पोल चीट (Voter Information Slip) वाटप करण्यात येते. या मतदार चिठ्ठीमध्ये मतदाराचे नाव, परिसर, केंद्र कोणते, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रुम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती आहे. नांदेड मतदार संघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अशा काही मतदारांच्या घरी पोल चीट पोहचवून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

16-नांदेड लोकसभातंर्गत 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी चिखलवाडी,वजिराबाद व गुजराती हायस्कूल परिसरात मतदारांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना व नवमतदारांना पोलचिटचे (मतदान माहिती चिठ्ठी) वाटप केले. 85 वर्षे वयाच्या वरती असलेल्या नागरिकांना पूर्व कल्पना दिली.

यापैकी काही मतदार हे होम व्होटिंग करणार आहेत. 12 D form भरून 699 मतदारांनी घरी पोस्टल मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. नांदेड दक्षिण बूथ नंबर 60 मध्ये होम वोटिंग लाभ घेत असलेल्या कस्तुरबाबाई शर्मा यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते मतदार चिठ्ठी देण्यात आली. त्यांना आश्वस्त केले, की तुमच्या घरी तुमचे मतदान नोंदवण्यासाठी टिम येणार. जेष्ठ वयोवृद्ध मतदार श्रीमती शर्मा यांनी यावेळी मतदान नोंदवणारच, असा निर्धार व्यक्त केला. 

जिल्हाधिकारी यांच्याहस्ते यावेळी काही नवमतदारांनी मतदार माहिती चिठ्ठी (पोलचिट ) स्विकारली. मी मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी जेष्ठांमध्ये असणारा उत्साह तरुणांनी देखील दाखवावा, असे आवाहन केले आहे. यावर्षी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून नागरिकांनी सुदृढ लोकशाहीच्या जपवणुकीसाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू, गुजराती हायस्कूल नांदेड बुथ क्रमांक 60 चे बि.एल.ओ. पी.डी. कोळपेवाड व महानगरपालिका प्रा शा वजीराबाद बुथ क 57 चे बि.एल.ओ. सुधाकर, नांदेड दक्षिणचे बि.एल.ओ. समन्वयक गुलाम नबी हे उपस्थित होते.

0000







महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...