Thursday, November 30, 2023

लेख

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सारथीने दिले बळ   

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ची स्थापना करण्यात आली.

 

मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व परीक्षा पूर्व प्रशिक्षण, संशोधनासाठी फेलोशिप, रोजगार व स्वयं-रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीवर अवलंबून असलेल्यासाठी कृषि व कृषिपूरक कौशल्य विकास प्रशिक्षण व मार्गदर्शन, सारथीमार्फत सुरु असलेले इतर कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे.


'
शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या सारथीचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोल्हापूर येथे उपकेंद्र आहे. तर (खारघर नवी मुंबई) पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर येथे विभागीय कार्यालये सुरु आहेत. राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली या संस्थेचे कामकाज चालते. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या तसेच इतर समकक्ष स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने सारथीमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक मदत केली जाते. सारथी संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करणे सहज शक्य झाले आहे.


संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

सारथीमार्फत नवी दिल्ली व पुणे येथे नामांकित प्रशिक्षण संस्था सुरु आहेत. या प्रशिक्षण संस्थामार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 22 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली. यापैकी 6 आयएएस, 8 आयपीएस, 3 आयआरएस व 5 जणांची इतर सेवेला निवड झाली आहे. युपीएससी नागरी सेवा 2021 मध्ये 12 विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादीत निवड झाली. यापैकी 4 जणांची आयएएस साठी तर 4 जणांची आयपीएस साठी, एकाची आयआरएस व 3 जणांची इतर सेवेला निवड झाली.  युपीएससी नागरी सेवा 2022 मध्ये 17 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली. यामध्ये 2 जणांची आयएएस, 6 जणांची आयपीएस तर 1 जणाची आयएफएस 2 जणांची आयआरएससाठी निवड झाली आहे. युपीएससी (सीएपीएफ) 2021 मध्ये 5 विद्यार्थ्याची अंतिम यादीत निवड झाली आहे. युपीएससी वनसेवा 2021 मध्ये 2 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली. सारथी संस्थेमार्फत नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत 500 विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण, प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षणा शुल्क सारथी मार्फत देण्यात येते. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकस्मिक खर्च व मासिक विद्यावेतन देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा समकक्ष गट अ मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. झूम मिंटीग तसेच अभिरुप मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी खास तज्ञ मार्गदर्शन करतात.  

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मार्गदर्शन   

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2021 मध्ये 70 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड . यापैकी पहिल्या पाचमध्ये सारथी संस्थेत चार विद्यार्थी आहेत व पहिल्या दहामध्ये सारथी संस्थेत सात विद्यार्थी . तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 मध्ये 103 विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादीत निवड झाली आहे. पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत 750 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचे प्रशिक्षण . संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन सारथी मार्फत अदा करण्यात येते. मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते.

 

इतर महत्वाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न्यायिक सेवा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क, आकस्मिक शुल्क, आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. दुय्यम सेवागट   (अराजपत्रित) परीक्षा साठी निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. कर्मचारी चयन आयोग (स्टाफ सिलेक्शन) मार्फत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क, आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन अदा. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नीट/एमएच-एसइटी परीक्षेचे पूर्व प्रक्षिणासाठी प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. बँकिंग पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तांत्रिक सेवा, न्यायिक सेवा मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते. 


एम.फील. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)

मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये एम.फिल. किंवा पीएच.डी. करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना सारथीमार्फत अधिछात्रवृत्ती दिली जाते. यामध्ये (जेआरएफ)ज्युनिअर रिसर्च फेलोशिप दरमहा 31 हजार रुपये असून (एसआरएफ)सिनीअर रिसर्च फेलोशिप दरमहा 35 हजार रुपये आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार एचआरए, आकस्मिक निधी देण्यात येतो. या अधिछात्रवृत्ती योजनेचा 2 हजार 109 विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून दरवर्षी संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीसाठी निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येतात.

 

सारथी कौशल्य विकास कार्यक्रम

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण (CSMS-DEEP) 2 हजार 770 प्रशिक्षण केंद्राअंतर्गत कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व तालुकास्तरावर 40 हजार उमेदवारांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच इंडो जर्मन टुल रूम (IGTR), औरंगाबाद अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामार्फत 950 विद्यार्थ्यांचे छत्रपती संभाजी नगर, नागपूर, पुणे व कोल्हापूर येथे प्रशिक्षण सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत 20 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील 2 हजार 400 केंद्रांतर्गत सर्व कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुणे शासकीय तंत्रनिकेतन अंतर्गत मर्सिडीज-बेंझ व यामाहा या कौशल्य विकास प्रशिक्षण प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

 

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना

इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लक्षित गटातील पालकाचे आर्थिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे. राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र सरकारची शिष्यवृत्ती रक्कम मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 9 हजार 600 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. सन 2022-23 मध्ये लक्षित गटातील 22 हजार 125 विद्यार्थ्यांना या  योजनेचा लाभ मिळाला आहे.

 

सन 2023-24 मध्ये सारथीमार्फत

सुरु असलेले इतर काही उपक्रम

 डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सुरु आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. नाशिक येथे मुलींचे वसतीगृह योजना सुरु आहे. अग्नीवीर भरती पूर्व-अनिवासी प्रशिक्षण उपलब्ध आहे. प्रगत संगणक विकास केंद्र (सीडॅक) द्वारे विद्यार्थ्यांना प्री कॅट प्रशिक्षण योजना आहे. विभागीय मुख्यालय (नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर व लातूर) येथे 500 मुले व 500 मुलींसाठी वसतीगृह, अभ्यासिका-ग्रंथालय, विभागीय कार्यालय इत्यादी बांधकामास लवकरच सुरुवात होणार आहे. परदेशी भाषा अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

 
कृषिमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील आयएफएटी, डब्ल्यूबीएटी शैक्षणिक उपक्रमासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान (एनआयपीएचटी) संस्थेमध्ये शेतकऱ्यांसाठी 9 प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.पुणे येथील महाराष्ट्र सेंटर फोर डेव्हलपमेंट (एमसीडीसी) मार्फत शेतकरी उत्पादन संस्था, कंपनी यांचे संचालक व सीएफओ यांचा क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला आहे.

या सर्व योजना तपशीलवार पाहण्यासाठी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या https://sarathi-maharashtragov.in , युटयुबवर SARTHI PUNE, फेसबुकवर SARTHI PUNE सारथी अप्लीकेशन SARTHI PUNE प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

 
अलका पाटील

उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000

 

 मोटार सायकल वाहनांच्या नोंदणीसाठी वीन मालिका सुरू  

नांदेड (जिमाका) दि30 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26- सीएल ही नवीन मालिका 6 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह)  अर्ज 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार आहे. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेज द्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक  परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

0000

 रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडीचे काम सुरु असल्याने वाहतुकीस प्रतिबंध

पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :-  रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडी चे काम सुरु असल्यामुळे बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडर ब्रिज 357 A मधून जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंधीत करण्यात आला आहे. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  

रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडी 357 A चे काम सुरु असल्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.  बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडरब्रीज 357 A मधून जाणारा रस्त्याऐवजी कामठा रोड ते नमस्कार चौक दरम्यानच्या रोड वरील विद्यमान मालटेकडी ओव्हर ब्रीज व देगलूर नाका-बाफना टी पॉईट या रस्त्यावरील विद्यमान बाफना रोड ओव्हर ब्रिज या पर्यायी मार्गाने ये-जा करतील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 9 डिसेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

 लक्झरी बसेस/ट्रॅव्हल्सना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत प्रवेशास बंदी

नांदेड (जिमाका) दि. 30 :- लक्झरी बसेस/ट्रॅव्हल्स सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत हिंगोली गेट फ्लाय ओव्हरकडून रेल्वे हॉस्पिटल कंपाऊड वॉल सुरु होत असलेल्या ठिकाणच्या पुढे प्रवेशास बंदी करण्यात येत आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केली आहे.

मोटार वाहन कायदा 1988 ते कलम 115 अन्वये सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने लक्झरी बसेस/ट्रॅव्हल्स सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत हिंगोली गेट फ्लाय ओव्हरकडून रेल्वे हॉस्पिटल कंपाऊड वॉल सुरु होत असलेल्या ठिकाणच्या पुढे प्रवेशास बंदी करण्यात आली आहे.

00000

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून

परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

नांदेड, (जिमाका) दि. 30 :-  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in  https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे उपसचिव दे. वि. तावडे यांनी कळविले आहे.

शासन सेवेतील विविध पदांवरील भरती करिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोगविविध विद्यापीठेपरीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी सर्व संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीतयाची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केली आहे.

इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आयोगाकडून वेळोवेळी जाहिर करण्यात येणाऱ्या सुचनांसाठी आयोगाच्या वरील संकेतस्थळास उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यावीअसे आवाहन आयोगाद्वारे करण्यात आले आहे.

00000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. सदर लोकशाही दिन सोमवार 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 


लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कळविले आहे.

0000

 वृत्त


डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयातील

स्वच्छता व सुरक्षिततेबाबत तडजोड नाही

-          जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 ·   कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित कामे मार्च पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश 

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाने आजवर अलीकडच्या काही घटना वगळून आरोग्याच्या क्षेत्रात एक मोठी मजल गाठलेली आहे. दररोज हजारो रुग्णांवर उपचार करून देणारी व्यवस्था अचानक कोलमडून पडणार नाही. गत महिन्यात ज्या काही घटना घडल्या त्या नजरेआड करता येणाऱ्या नाहीत. शासकीय आरोग्य यंत्रणा ही सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याला बळ देणारी असते, हे लक्षात घेऊन शासनातील सर्व संबंधित विभागांनी आपल्या संदर्भात जी काही प्रलंबित कामे असतील ती कोणत्याही परिस्थितीत येत्या मार्च पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.  

 

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षा, स्वच्छता आणि प्रलंबित कामे या विषयांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, मनपा उपायुक्त कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, जिल्हा कारागृह अधिक्षक सोनावणे, ग्रामीण पाणी पुरवठा, महावितरण व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

महाविद्यालय परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीचे फर्निचर, सुरक्षा भिंत, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, पथदिवे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आदी विविध कामे शासनाने यापूर्वीच विचारात घेऊन त्याबाबत वेळोवेळी आदेशही दिलेले आहेत. कित्येक कामांचे निविदा होऊन ते काम संबंधित यंत्रणांना बहालही केलेले आहेत. त्यांना दिलेली कालमर्यादा कोणत्याही परिस्थितीत काटेकोरपणे पाळलीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विभाग प्रमुखांना दिले. याचबरोबर जी कामे दिलेली आहेत त्या कामांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत अधिक दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.

 

सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या काळजी समवेत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयावर अनेक बाबी या कायद्यानेही बंधनकारक केलेल्या आहेत. न्यायालयाने जे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी जर आवश्यक ती यंत्रणा उभारावी लागत असेल अथवा नव्याने करावी लागत असेल तर त्यात विलंब होता कामा नये. नांदेड जिल्ह्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांच्या आरोग्याच्यादृष्टिने शासकीय रुग्णालयात सुरक्षीत वार्डाची नितांत आवश्यकता आहे. सदर वार्ड तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांना दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयातील सुरू असलेल्या विविध बांधकामांची माहिती दिली.

00000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...