Thursday, November 30, 2023

लेख

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सारथीने दिले बळ   

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ची स्थापना करण्यात आली.

 

मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व परीक्षा पूर्व प्रशिक्षण, संशोधनासाठी फेलोशिप, रोजगार व स्वयं-रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीवर अवलंबून असलेल्यासाठी कृषि व कृषिपूरक कौशल्य विकास प्रशिक्षण व मार्गदर्शन, सारथीमार्फत सुरु असलेले इतर कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे.


'
शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या सारथीचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोल्हापूर येथे उपकेंद्र आहे. तर (खारघर नवी मुंबई) पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर येथे विभागीय कार्यालये सुरु आहेत. राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली या संस्थेचे कामकाज चालते. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या तसेच इतर समकक्ष स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने सारथीमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक मदत केली जाते. सारथी संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करणे सहज शक्य झाले आहे.


संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

सारथीमार्फत नवी दिल्ली व पुणे येथे नामांकित प्रशिक्षण संस्था सुरु आहेत. या प्रशिक्षण संस्थामार्फत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 22 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली. यापैकी 6 आयएएस, 8 आयपीएस, 3 आयआरएस व 5 जणांची इतर सेवेला निवड झाली आहे. युपीएससी नागरी सेवा 2021 मध्ये 12 विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादीत निवड झाली. यापैकी 4 जणांची आयएएस साठी तर 4 जणांची आयपीएस साठी, एकाची आयआरएस व 3 जणांची इतर सेवेला निवड झाली.  युपीएससी नागरी सेवा 2022 मध्ये 17 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली. यामध्ये 2 जणांची आयएएस, 6 जणांची आयपीएस तर 1 जणाची आयएफएस 2 जणांची आयआरएससाठी निवड झाली आहे. युपीएससी (सीएपीएफ) 2021 मध्ये 5 विद्यार्थ्याची अंतिम यादीत निवड झाली आहे. युपीएससी वनसेवा 2021 मध्ये 2 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली. सारथी संस्थेमार्फत नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत 500 विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण, प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षणा शुल्क सारथी मार्फत देण्यात येते. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकस्मिक खर्च व मासिक विद्यावेतन देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा समकक्ष गट अ मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. झूम मिंटीग तसेच अभिरुप मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी खास तज्ञ मार्गदर्शन करतात.  

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मार्गदर्शन   

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2021 मध्ये 70 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड . यापैकी पहिल्या पाचमध्ये सारथी संस्थेत चार विद्यार्थी आहेत व पहिल्या दहामध्ये सारथी संस्थेत सात विद्यार्थी . तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 मध्ये 103 विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादीत निवड झाली आहे. पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत 750 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचे प्रशिक्षण . संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन सारथी मार्फत अदा करण्यात येते. मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येते.

 

इतर महत्वाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न्यायिक सेवा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क, आकस्मिक शुल्क, आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. दुय्यम सेवागट   (अराजपत्रित) परीक्षा साठी निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. कर्मचारी चयन आयोग (स्टाफ सिलेक्शन) मार्फत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क, आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन अदा. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नीट/एमएच-एसइटी परीक्षेचे पूर्व प्रक्षिणासाठी प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. बँकिंग पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तांत्रिक सेवा, न्यायिक सेवा मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते. 


एम.फील. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)

मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये एम.फिल. किंवा पीएच.डी. करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना सारथीमार्फत अधिछात्रवृत्ती दिली जाते. यामध्ये (जेआरएफ)ज्युनिअर रिसर्च फेलोशिप दरमहा 31 हजार रुपये असून (एसआरएफ)सिनीअर रिसर्च फेलोशिप दरमहा 35 हजार रुपये आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार एचआरए, आकस्मिक निधी देण्यात येतो. या अधिछात्रवृत्ती योजनेचा 2 हजार 109 विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून दरवर्षी संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीसाठी निवड करण्यासाठी अर्ज मागविण्यात येतात.

 

सारथी कौशल्य विकास कार्यक्रम

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण (CSMS-DEEP) 2 हजार 770 प्रशिक्षण केंद्राअंतर्गत कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व तालुकास्तरावर 40 हजार उमेदवारांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच इंडो जर्मन टुल रूम (IGTR), औरंगाबाद अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामार्फत 950 विद्यार्थ्यांचे छत्रपती संभाजी नगर, नागपूर, पुणे व कोल्हापूर येथे प्रशिक्षण सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत 20 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील 2 हजार 400 केंद्रांतर्गत सर्व कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुणे शासकीय तंत्रनिकेतन अंतर्गत मर्सिडीज-बेंझ व यामाहा या कौशल्य विकास प्रशिक्षण प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

 

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना

इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लक्षित गटातील पालकाचे आर्थिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे. राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र सरकारची शिष्यवृत्ती रक्कम मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 9 हजार 600 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. सन 2022-23 मध्ये लक्षित गटातील 22 हजार 125 विद्यार्थ्यांना या  योजनेचा लाभ मिळाला आहे.

 

सन 2023-24 मध्ये सारथीमार्फत

सुरु असलेले इतर काही उपक्रम

 डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सुरु आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. नाशिक येथे मुलींचे वसतीगृह योजना सुरु आहे. अग्नीवीर भरती पूर्व-अनिवासी प्रशिक्षण उपलब्ध आहे. प्रगत संगणक विकास केंद्र (सीडॅक) द्वारे विद्यार्थ्यांना प्री कॅट प्रशिक्षण योजना आहे. विभागीय मुख्यालय (नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर व लातूर) येथे 500 मुले व 500 मुलींसाठी वसतीगृह, अभ्यासिका-ग्रंथालय, विभागीय कार्यालय इत्यादी बांधकामास लवकरच सुरुवात होणार आहे. परदेशी भाषा अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

 
कृषिमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील आयएफएटी, डब्ल्यूबीएटी शैक्षणिक उपक्रमासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान (एनआयपीएचटी) संस्थेमध्ये शेतकऱ्यांसाठी 9 प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.पुणे येथील महाराष्ट्र सेंटर फोर डेव्हलपमेंट (एमसीडीसी) मार्फत शेतकरी उत्पादन संस्था, कंपनी यांचे संचालक व सीएफओ यांचा क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला आहे.

या सर्व योजना तपशीलवार पाहण्यासाठी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या https://sarathi-maharashtragov.in , युटयुबवर SARTHI PUNE, फेसबुकवर SARTHI PUNE सारथी अप्लीकेशन SARTHI PUNE प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

 
अलका पाटील

उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...