Thursday, November 30, 2023

 वृत्त


डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयातील

स्वच्छता व सुरक्षिततेबाबत तडजोड नाही

-          जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 ·   कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित कामे मार्च पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश 

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाने आजवर अलीकडच्या काही घटना वगळून आरोग्याच्या क्षेत्रात एक मोठी मजल गाठलेली आहे. दररोज हजारो रुग्णांवर उपचार करून देणारी व्यवस्था अचानक कोलमडून पडणार नाही. गत महिन्यात ज्या काही घटना घडल्या त्या नजरेआड करता येणाऱ्या नाहीत. शासकीय आरोग्य यंत्रणा ही सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याला बळ देणारी असते, हे लक्षात घेऊन शासनातील सर्व संबंधित विभागांनी आपल्या संदर्भात जी काही प्रलंबित कामे असतील ती कोणत्याही परिस्थितीत येत्या मार्च पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.  

 

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षा, स्वच्छता आणि प्रलंबित कामे या विषयांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, मनपा उपायुक्त कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, जिल्हा कारागृह अधिक्षक सोनावणे, ग्रामीण पाणी पुरवठा, महावितरण व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

महाविद्यालय परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीचे फर्निचर, सुरक्षा भिंत, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, पथदिवे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आदी विविध कामे शासनाने यापूर्वीच विचारात घेऊन त्याबाबत वेळोवेळी आदेशही दिलेले आहेत. कित्येक कामांचे निविदा होऊन ते काम संबंधित यंत्रणांना बहालही केलेले आहेत. त्यांना दिलेली कालमर्यादा कोणत्याही परिस्थितीत काटेकोरपणे पाळलीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विभाग प्रमुखांना दिले. याचबरोबर जी कामे दिलेली आहेत त्या कामांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत अधिक दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.

 

सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या काळजी समवेत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयावर अनेक बाबी या कायद्यानेही बंधनकारक केलेल्या आहेत. न्यायालयाने जे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी जर आवश्यक ती यंत्रणा उभारावी लागत असेल अथवा नव्याने करावी लागत असेल तर त्यात विलंब होता कामा नये. नांदेड जिल्ह्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांच्या आरोग्याच्यादृष्टिने शासकीय रुग्णालयात सुरक्षीत वार्डाची नितांत आवश्यकता आहे. सदर वार्ड तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांना दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयातील सुरू असलेल्या विविध बांधकामांची माहिती दिली.

00000



No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...