Monday, December 30, 2024

वृत्त क्र. 1243

देशी गायींचे पालन पोषण अनुदानासाठी

ऑनलाईन अर्ज करण्यास 5 जानेवारीपर्यत मुदतवाढ


नांदेड दि. 30 डिसेंबर :  राज्यातील गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधील देशी गायीच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति पशु 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी 5 जानेवारी 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थानी www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagoseeraayog.org या संकेतस्थळावर 5 जानेवारी 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.


या योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagoseeraayog.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सुधारित नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. या योजनेचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यासाठी 16 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 कालावधी दिला आहे. गोसेवा आयोगामार्फत प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. जिल्हा गोशाळा पडताळणी समितीद्वारा प्राथमिक तपासणी अंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी 11 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. जिल्हा गोशाळा पडताळणी समिती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनाची संख्या आयोग कार्यालयास 21 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत कळविण्यात येणार आहे.

00000

 वृत्त क्र. 1242 

शस्त्र परवाना नुतनीकरण करून घेण्याचे आवाहन   

नांदेड दि. 30 डिसेंबर :- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत निर्गमीत, अभिलेखात नोंद असलेले शस्त्र परवाने ज्याची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

परवानाधारकाने पुढील कालावधीत आपला शस्त्रपरवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी नियमानुसार असलेले नुतनीकरण शुल्क (चलनाने) शासनास जमा करावे लागेल. आपले शस्त्रपरवान्यात नमुद असलेल्या अग्निशस्त्राची पडताळणी जिल्हादंडाधिकारी कार्यालयात करुन, विहित नमुन्यातील अर्ज, जन्म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्त्र परवाना जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करावा. याची सर्व संबंधिजिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 1241

6 जानेवारीला लोकशाही दिन 

नांदेड दि. 30 डिसेंबर :  जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोमवार 6 जानेवारी 2025 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये आपल्या तक्रारीसह उपस्थित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


यादिवशी महसूल, गृह, जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाकडे लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर येथे उपस्थित राहतील.

 निवेदन नोंदणीची सुरूवात दुपारी 12 वा. होणार आहे. त्यानंतर लगेच प्राप्त झालेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी दुपारी ते या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात उपस्थित रहावेअसे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 1240

लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांचा दौरा

नांदेड दि. 30 डिसेंबर :  छत्रपती संभाजी नगर महसूली विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आायुक्त दिलीप शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


गुरुवार 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता देवगिरी एक्सप्रेसने नांदेड येथे आगमन. सकाळी 11.30 ते 12.30 या कालावधीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांच्या समवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 या कालावधीत राखीव. दुपारी 2 वाजता वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्र. 1239

बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी

बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न

नांदेड, दिनांक 30 डिसेंबर :- जिल्ह्यात बालविवाह होवू नये यासाठी महिला बाल विकास विभाग,  युनिसेफ एसबीसी 3 च्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लग्न लावू नयेत ते केल्यास काय शिक्षा होवू शकते हे सर्वांना माहिती पाहिजे. यासाठी कायदयाची जनजागृती व प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) प्रशांत थोरात,  मनपाचे उपायुक्त अजितपाल सिंघ संधु, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक संतोष शेटकार, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र पांचगे, डॉ. विद्या झिने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस.डी. पवार, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे डॉ. अमोल प्रभाकर काळे, युनिसेफ, एसबीसी 3 चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, जिल्हा समन्वयक मोनाली धुर्वे आदींची उपस्थिती होती.

जिल्हृयात बालविवाह होवू नये यासाठी नागरिकांपर्यंत कायदेशीर कार्यवाहीबाबतची माहिती पोहचविणे अत्यंत आवश्यक असून या विषयावर जनजागृती व प्रबोधन करावे. तसेच यावर्षी कन्या दिवसाच्या निमित्ताने शपथ व मुलींचे बालविवाह न करणेबाबत पालकांना पत्र लिहून कळविण्याचे उपक्रम राबवावेत असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच 18 वर्षाखालील मुला-मुलींचे बाल विवाह होणार नाहीत याबाबत शिक्षकांनी जागृती करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा महिला बाल विकास विभाग नांदेड युनिसेफ आणि एसबीसी 3 मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्याच्या दृष्टीने मागील 4 महिन्यात केलेल्या कार्यवाहीबाबत व पुढील महिन्यात करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. तसेच शाळेतील मुलांसाठी विद्यार्थी सत्र, पालक जागरुकता सत्र कार्यक्रम असे विविध कार्यक्रम मागील कालवधीत घेण्यात आले याबाबत सादरीकरण करण्यात आले.

00000







  वृत्त क्रमांक 9   माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत   सकाळी पशु प्रदर्शन व स्पर्धा ,  दुपारी कृषी प्रदर्शन ,  कृ...