Sunday, February 11, 2018


विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी
योगदान देण्यासाठी सज्ज रहावे
- राज्यपाल चे. विद्यासागर राव  
नांदेड, दि. 11 :- विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी देता येईल, ते योगदान देण्यासाठी सदैव सज्ज रहावे. सत्यनिष्ठा आणि देशाप्रती जाणिव जागृत ठेवून काम केल्यास स्वतः बरोबरच राष्ट्राची प्रगती साधता येईल. तसेच कोणत्याही प्रकारचा जाती, धर्म, पंथ व भेदभावाचा विचार न करता समता, बंधुता आणि एकता या तत्त्वाप्रती तसेच माता-पित्यांप्रती आदर ठेवावा, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन केले.  

विद्यापीठाच्या  प्रांगणात दिक्षांत प्रदानाचा शानदार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून साईंटिफिक ॲडव्हायजरी ग्रुप, सोशल बिहेविअरल रीसर्च डिव्हीजन, आयसीएमआरचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध मानवविज्ञान शास्त्रज्ञ प्रा. रामचंद्र मुटाटकर, कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, परीक्षा मुल्यमापन व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभा तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीक्षांत भाषणात बोलताना डॉ. मुटाटकर म्हणाले की, भारतीय विद्यापीठाने स्वतंत्र आणि एकमेकांच्या सहाय्याने सर्व मानवी समस्यांचे निराकरण करण्याची भुमिका घेतली पाहिजे. महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकांनी युजीसीच्या निर्देशाप्रमाणे शिक्षण आणि संशोधन केले पाहिजे. विज्ञान शाखेने उद्योगाशी निगडीत संशोधन तर मानव्य विद्याशाखा आणि सामाजिक शास्त्रे यांनी समाज उपयोगी उपक्रमात सहभाग देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपण समाजाचे देणे लागतो ही धारणा प्रबळ होणे गरजेचे आहे. अशा परस्पर उपक्रमातून मानवी जीवन समृद्ध होऊ शकते व ते आंतर विद्याशाखीय पद्धतीतून शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.   
समकालीन प्रश्नांचा विचार आणि सोडवणूक ही बहुविद्याशाखा आणि आंतर विद्याशाखा संशोधनातून साधता येईल. शेतकरी आत्महत्या या केवळ आर्थिक विवंचनेतून होत नसून त्यास राजकीय संदर्भ सुद्धा आहे. तसेच या आत्महत्याची पार्श्वभूमी सांस्कृतीक देखील आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच किल्लारी येथील भुकंपग्रस्त लोकांनी सर्व समस्यांना खंबीरपणे तोंड दिले परंतू आत्महत्या केली नाही. तर तात्कालीन दारिद्रयामुळे शेतकरी आत्महत्या करतो. या मागील मानसीकता समजून घेतली तरच या समस्यांचे निराकरण करता येईल, असे डॉ. मुटाटकर यांनी स्पष्ट केले.
 कुलगुरू डॅा. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठापुढे गुणवत्ता वाढ, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण, नवीन अध्ययन आणि अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे अशी अनेक आव्हाने उभी असल्याचे सांगुन 20 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय मुल्यांकन तथा अधिस्विकृती परिषद (नॅक) चा अ दर्जा मिळविणाऱ्या या विद्यापीठाने गेल्या एक वर्षांच्या कालावधीत अनेक आव्हानात्मक निर्णय घेऊन ते यशस्वीपणे राबविले आहेत. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर निवडीवर आधारीत श्रेयांक पद्धत राबविणारे महाराष्ट्रातील हे पहिले विद्यापीठ असल्याचे सांगितले. तसेच केंद्र शासनाने गुरु गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व संविधान केंद्रास नुकतेच 22 कोटी रुपये अध्यासनासाठी मंजूर केले आहेत. तर रुसा अंतर्गत पायाभुत सुविधांसाठी 20 कोटी रुपये प्राप्त झाले असून पुढील तीन वर्षांच्या कालावधीत शंभर कोटीचे अनुदान ग्राह्य धरण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षण, संशोधन, विद्यार्थी आणि मुलभुत सुविधांचा विकास याबाबत विद्यापीठाने केलेल्या भरीव कामगीरीची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी विद्यापीठाच्या प्रांगणातून दिक्षांत मिरवणुकीतून मान्यवरांचे दिक्षांत समारंभाच्या व्यासपीठावर आगमन झाले. एमजीएम महाविद्यालयाच्या चमूने विद्यापीठ गीत सादर केले. कुलपती तथा राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध विद्याशाखांतील विषयनिहाय सुवर्ण पदकांचे मानकरी ठरलेल्या 46 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तर 236 विद्यार्थांना पीएचडी व पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी कुलपती महोदयांना स्नातकांना पदवी प्रदान करण्यासाठी सादर केले. या समारंभाचे सुत्रसंचालन डॉ. माधुरी देशपांडे व डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर दिक्षांत समारंभाचा प्रारंभ व समारोप राष्ट्रगिताने झाला.
इनडोअर स्पोर्ट स्टेडीअमचे उद्घाटन
प्रारंभी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणातील इनडोअर स्पोर्ट स्टेडिअमचे उद्घाटन करण्यात आले.
00000

जवरला गावाला दिली भेट
गाव समृद्धीसाठी सिंचन सुविधा
निर्माण करण्यावर भर
- राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड, दि. 11 :-  दत्तक घेतलेल्या जवरला ता. किनवट या गावाला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सदिच्छा भेट देवून विविध विकास कामांचे उद्घाटन केले व गावकऱ्यांशी संवाद साधतांना जवरला गावाच्या समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील गावांच्या विकासाकडे सर्वांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. जवरला हे गाव दत्तक घेतल्यानंतर विकासाभिमूख होत असून येथील ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचे आपले प्रयत्न राहणार आहेत. या परिसरातील जवळपास 2 हजार एकर पर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती फारशी फायदेशीर ठरत नाही. ही गरज ओळखून प्रशासनाने या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी दोन-तीन पर्याय असलेले सविस्तर प्रस्ताव तयार करावेत. त्याला मंजूरी देवून सिंचनासाठी फायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला.
अंबाडीला जाणाऱ्या जुन्या दळणवळणाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वन विभागाकडून संमती मिळविण्यात येईल, असे सांगून राज्यपालांनी सध्या गावात होत असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले. अधिसुचना काढून पाच टक्के निधी विकासकामांसाठी थेट ग्रामपंचायतींना देण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगून राज्यपालांनी भूमिपूजन केलेल्या क्रीडा संकुलातील विविध क्रीडा सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे सांगत या सुविधांचा उपयोग करुन गावातील मुलांमुलींनी आपले क्रीडानैपून्य विकसित करावे, असे आवाहन केले. मुलांमुलींनी शिक्षणाबरोबरच माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातही कौशल्य आत्मसात करुन स्वावलंबी होण्याचा मार्ग अवलंबावा असे सांगत त्यांनी वनोपज संपत्तीवर त्या क्षेत्रातील आदिवासींना पूर्ण अधिकार राहिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
गाव परिसरातील शेती समृद्धीच्या दृष्टीने कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ पाठविले जातील असे सांगून राज्यपालांनी युवक-युवतींना पुढाकार घेऊन गाव विकासाच्या नवनवीन संकल्पना समोर आणण्याचे आवाहन केले.
प्रारंभी सरपंच भुपेंद्र आडे यांनी स्वागत केले. तर शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करुन राज्यपालांची मने जिंकली. ग्रामस्थांच्यावतीने श्री मरसकोल्हे यांनी प्रास्ताविकात गावातील झालेल्या विकासाच्या कामांबद्दल आभार व्यक्त करुन पदवी शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि सिंचनाच्या सुविधांची मागणी केली.
या कार्यक्रमापूर्वी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून 2 लाख रुपये अनुदानातून जंगुबाई आदिवासी महिला शेतकरी गटाने सुरु केलेल्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून 7 लाख 50 हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच 2 कोटी 95 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. भूमिपूत्र शेतकरी गटाच्या दालमिलचे तसेच लक्ष्मण भिमा आतराम या लाभार्थ्याने बांधलेल्या आदिम कोलाम आवास योजनेतील घरकुलाचे उद्घाटन करण्यात आले. 99 लाख 62 हजार रुपयांच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे तसेच मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही राज्यपाल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्यापालांचे सचिव बी. वेनुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजित कुमार, आमदार प्रदीप नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, आदि मान्यवर उपस्थित होते. शेवटी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी आभार मानले.
00000


ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात अंशत: बदल
नांदेड, दि. 11 :- राज्‍य निवडणूक आयोगाने मार्च ते मे 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्‍याने स्‍थापित ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासह सर्व सदस्‍य पदांसाठी तसेच रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणुकीच्या कार्यक्रमात अंशतः बदल केला आहे.
त्यानुसार ज्‍या ग्रामपंचायतीची मुदत 7 मार्च ते  31 मे 2018 या कालावधीत संपत आहे व रिक्‍त पदांच्‍या सर्व पोटनिवडणुकासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी ऐवजी 12 फेब्रुवारी 2018 ही राहील. या दिवशी सकाळी 10.30 ते सायं 6.30 यावेळेत संगणीकृत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशपत्रासह निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे.  
नामनिर्देशनपत्राची छाननी बुधवार 14 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजल्‍यापासून छाननी संपेपर्यंत होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक शुक्रवार 16 फेब्रुवारी 2018 रोजी दु. 3 वाजेपर्यंत आहे. निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक व वेळ 16 फेब्रुवारी रोजी दु. 3 वाजेनंतर आहे. आवश्‍यक असल्‍यास मतदानाचा दिनांक 27 फेब्रुवारी 2018 (मंगळवार) असून मतदानाची वेळ स. 7.30 वा. पासुन ते सायं. 5.30 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी 28 फेब्रुवारी 2018 रोजी असून निवडणुकांचा निकाल प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 28 फेब्रुवारी 2018 ते दि. 3 मार्च 2018 पर्यंत आहे.
या निवडणूक कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हयातील सार्वत्रिक  निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे. ग्रामपंचायत - गोगला गोविंद तांडा ( ता. देगलूर), हसनाळी ( ता. धर्माबाद ), चोरड (जुनापाणी) ( ता. माहूर ) तर रिक्‍त पदांचा पोट निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
तालुका 
पोट निवडणूक असलेल्‍या गा.पं. संख्‍या
रिक्‍त पदांची संख्‍या
शेरा
माहूर
19
40
हिंगणी थेट सरपंच  निवड  पोटनिवडणूक
किनवट
50
83
मलकजाम व मारेगाव वरचे ग्रा.पं. थेट सरपंच निवड  पोटनिवडणूक
हिमायतनगर
1
2

हदगाव
10
21
 बेलमंडळ थेट सरपंच निवड पोटनिवडणूक
अर्धापूर
5
8

नांदेड
11
15

मुदखेड
3
3

भोकर
4
5

उमरी
8
14

धर्माबाद
15
22

बिलोली
8
13

नायगाव खै.
2
2

लोहा
15
24
खरबी  थेट सरपंच निवड  पोटनिवडणूक
कंधार
6
6

मुखेड
9
17

देगलूर
20
23

एकुण
186
298
4

सार्वत्रिक व पोट निवडणुका असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये आचारसंहिता 22 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजल्‍यापासुन लागू झाली आहे. निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा  आचारसंहिता कालावधीत कुणालाही  करता येणार नाही.
तसेच शासन अधिसूचना दि. 9 फेब्रुवारी 2018 (सन 2018 चा महाराष्‍ट्र अध्‍यादेश क्रं. 5) अन्‍व्‍ये केलेल्‍या सुधारणेनुसार आरक्षित पदांवर निवडणूक लढविणा-या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसल्‍यास अशा व्यक्तीने नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्‍यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेल्‍या अर्जाची सत्‍यप्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केल्‍याबाबतचा अन्‍य कोणताही पुरावा आणि निवडून आल्‍याचे घोषित केल्‍याच्‍या दिनाकापासून 6 महिन्यांच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करील याबाबतचे हमीपत्र घेण्यासंदर्भात 30 जून 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीच्या बाबतीत सरपंच थेट पद्धतीने निवडून द्यावयाचे असल्याने निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
000000ल्‍याच्‍या डून आल्‍याचे घोशित


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...