Sunday, February 11, 2018

जवरला गावाला दिली भेट
गाव समृद्धीसाठी सिंचन सुविधा
निर्माण करण्यावर भर
- राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड, दि. 11 :-  दत्तक घेतलेल्या जवरला ता. किनवट या गावाला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सदिच्छा भेट देवून विविध विकास कामांचे उद्घाटन केले व गावकऱ्यांशी संवाद साधतांना जवरला गावाच्या समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील गावांच्या विकासाकडे सर्वांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. जवरला हे गाव दत्तक घेतल्यानंतर विकासाभिमूख होत असून येथील ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचे आपले प्रयत्न राहणार आहेत. या परिसरातील जवळपास 2 हजार एकर पर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती फारशी फायदेशीर ठरत नाही. ही गरज ओळखून प्रशासनाने या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी दोन-तीन पर्याय असलेले सविस्तर प्रस्ताव तयार करावेत. त्याला मंजूरी देवून सिंचनासाठी फायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असे सांगत त्यांनी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला.
अंबाडीला जाणाऱ्या जुन्या दळणवळणाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वन विभागाकडून संमती मिळविण्यात येईल, असे सांगून राज्यपालांनी सध्या गावात होत असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले. अधिसुचना काढून पाच टक्के निधी विकासकामांसाठी थेट ग्रामपंचायतींना देण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगून राज्यपालांनी भूमिपूजन केलेल्या क्रीडा संकुलातील विविध क्रीडा सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे सांगत या सुविधांचा उपयोग करुन गावातील मुलांमुलींनी आपले क्रीडानैपून्य विकसित करावे, असे आवाहन केले. मुलांमुलींनी शिक्षणाबरोबरच माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातही कौशल्य आत्मसात करुन स्वावलंबी होण्याचा मार्ग अवलंबावा असे सांगत त्यांनी वनोपज संपत्तीवर त्या क्षेत्रातील आदिवासींना पूर्ण अधिकार राहिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
गाव परिसरातील शेती समृद्धीच्या दृष्टीने कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ पाठविले जातील असे सांगून राज्यपालांनी युवक-युवतींना पुढाकार घेऊन गाव विकासाच्या नवनवीन संकल्पना समोर आणण्याचे आवाहन केले.
प्रारंभी सरपंच भुपेंद्र आडे यांनी स्वागत केले. तर शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करुन राज्यपालांची मने जिंकली. ग्रामस्थांच्यावतीने श्री मरसकोल्हे यांनी प्रास्ताविकात गावातील झालेल्या विकासाच्या कामांबद्दल आभार व्यक्त करुन पदवी शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि सिंचनाच्या सुविधांची मागणी केली.
या कार्यक्रमापूर्वी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून 2 लाख रुपये अनुदानातून जंगुबाई आदिवासी महिला शेतकरी गटाने सुरु केलेल्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून 7 लाख 50 हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच 2 कोटी 95 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. भूमिपूत्र शेतकरी गटाच्या दालमिलचे तसेच लक्ष्मण भिमा आतराम या लाभार्थ्याने बांधलेल्या आदिम कोलाम आवास योजनेतील घरकुलाचे उद्घाटन करण्यात आले. 99 लाख 62 हजार रुपयांच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे तसेच मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही राज्यपाल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास राज्यापालांचे सचिव बी. वेनुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजित कुमार, आमदार प्रदीप नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, आदि मान्यवर उपस्थित होते. शेवटी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी आभार मानले.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1161   राज्यस्तरीय शालेय सेपकटाकरॉ क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन नांदेड दि. 4 डिसेंबर:- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, ...