Wednesday, June 17, 2020


वृत्त क्र. 556   
शेतकऱ्यांनी निंबोळी युक्त जैविक
निविष्ठांचा वापर करावा - आमदार मोहन हंबर्डे
नांदेड, दि. 17 :-   शेतकऱ्यांना शेतीवरील रासायनिक खते, कीटकनाशके, इत्यादी निविष्ठावरील खर्च कमी करणे, त्यावरील अवलंबित्व कमी करुन पर्यावरणपूरक जैविक निविष्ठा निंबोळी अर्क, निंबोळी पेंड, गांडूळ खत, तसेच सेंद्रिय खते, हिरवळीच्या खते वापरावीत असे आवाहन आमदार मोहन हंबर्डे यांनी केले.
नांदेड तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने विष्णुपुरी येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आमदार श्री. हंबर्डे बोलत होते.  
या प्रशिक्षण सत्रात शेतकऱ्यांना बी बी एफ पद्धतीने सोयाबीन लागवडीचे महत्व सांगितले. शेतकऱ्यांनी गटांमार्फत औजर बँक तयार करावी. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव रविकुमार यांनी केले.
शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी घेणे, फळबाग लागवड करणे, सामूहिक शेततळे घेऊन वॉटर बँक तयार करून पिकांची घनता वाढवून उत्पादनात भर घालावी असे तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले. मंडळ कृषि अधिकारी नांदेड यांनी पीक विमा योजना व शेतकरी अपघात योजनेविषयी शेतकऱ्यांना त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी हंबर्डे यांनी केले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक वसंत जारीकोटे, आत्माचे बीटी एम. शेखर कदम, कृषी सहायक श्रीमती शिंदे सोनाली, गवळी प्रीती, नंदू हंबर्डे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार शामराव हंबर्डे, विठ्ठल हंबर्डे, रामचंद्र हंबर्डे, अमृतराव हंबर्डे, अंबादास हंबर्डे आदींसह विष्णुपुरी येथील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेवटी आभार विष्णुपुरीचे कृषी सहायक शिंदे सोनाली यांनी केले.
00000



वृत्त क्र. 555   
अर्जदारांनी अटींची मर्यादा    
प्रादेशिक परिवहन कार्यालयात
अनुज्ञप्तीचे कामकाज सुरु
नांदेड, दि. 17 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुज्ञप्तीचे कामकाज सुरु करण्यात आले असून अर्जदारांनी अटींचे पालन करावे. दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असावे. मास्क हँडग्लोज घालून कार्यालयात प्रवेश करावा. आगाऊ वेळ निर्धारण (अपॉईन्टमेंट) असणाऱ्या अर्जदारांन कार्यालयात प्रवेश दिला जाईल, असे नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी कळविले आहे.
राज्यातील सर्व परिवहन कार्यालयातर्गत असणाऱ्या शिबीर कार्यालयातील कामे वगळता उर्वरीत सर्व कामे जसे अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती विषयक सर्व कामे इ. कामकाज सुरु करावीत, असे निर्देश राज्याचे परिवहन आयुक्त यांनी नुकतेच दिले आहे. त्यानुसार या कामांसाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली (अपॉईन्टमेंट) सुरु करण्यात येऊन कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामांसाठी कोटा निश्चित करुन देण्यात येणार आहे.
ज्या अर्जदारांनी लॉकडाऊन कालावधीत शिकाऊ, पक्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी वेळ घेतली आहे  त्यांनी आपली अपॉईन्टमेंट रीशेड्यूल करुन घ्यावी. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यालया गर्दी कमी ठेवण्याबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील असे, असेही आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलश कामत यांनी केले आहे.
0000


जिल्‍हा वासियांसाठी लवकरच आणखी
एका अद्ययावत रुग्‍णालयाची सुविधा
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
   व्हिडीओ कॉन्‍फरन्सिगद्वारे पालकमंत्र्यांनी घेतला उपाययोजनांचा आढावा

नांदेड, (जिमाका) दि. 17 :- आजच्‍या घडीला जिल्‍ह्यातील कोवीड -19 संदर्भातील परिस्थिती आटोक्‍यात जरी असली तरी शासन पातळीवर भविष्‍यातील स्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टिने जिल्‍हा पातळीवर शक्‍य त्‍या उपाययोजना करण्‍याचे निर्देश जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्‍हाण यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले. जिल्‍ह्यातील सर्व विभागांच्‍या नियोजन व पुढील कामांच्‍या दिशासंदर्भात आज व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे बैठक आयोजित करण्‍यात आली होती.
जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या या बैठकीस जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेड महापालिकेचे आयुक्‍त डॉ. सुनिल लहाने, जिल्‍हा परिषदेचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा उपनिबंधक सुधीर फडणीस, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. चंद्रकांत मस्‍के,  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर व इतर विभागांचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
कोविड -19 बाधितांवर उपचार होण्‍यासाठी खाजगी रुग्‍णालयांचा शासनाने विचार करुन काही निर्देश दिले होते. जिल्‍हा व तालुका पातळीवर असलेले हे खाजगी रुग्‍णालय आकाराने लहान असल्‍यामुळे अशा ठिकाणी कोविड- 19 बाधित व्‍यक्‍तींना उपचारासाठी ठेवणे अधिक आव्‍हानात्‍मक होईल, असे पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी स्‍पष्‍ट केले. लहान रुग्‍णालयांना यात समाविष्‍ठ करण्‍याऐवजी एखाद्या मोठ्या जागेवर मोठ्या स्‍वरुपाचे उपचार केंद्र निर्माण केले आणि त्‍याठिकाणी खाजगी वैद्यकीय तज्‍ज्ञांना गरजेनुरुप जर उपचार देण्‍यासाठी निमंत्रित केले तर हे सर्वार्थाने योग्‍य ठरेल, असे निर्देश त्‍यांनी देवून याबाबत जिल्‍हा पातळीवर नियोजन करण्‍याचे सांगितले.
नांदेड जिल्‍ह्यात डॉ. शंकरराव चव्‍हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 150 रुग्‍णांच्‍या उपचाराची सुविधा तर जिल्‍हा रुग्‍णालयात 50 रुग्‍णांची सुविधा उपलब्ध आहे. यात आणखी 100 बाधितांची सोय होवू शकेल अशी अतिरिक्‍त  तयारी करण्‍यात आली आहे. एनआरआय कोविड सेंटर येथे 300 बाधितांच्‍या उपचाराची तर पंजाब भवन येथे 100 बाधितांच्‍या उपचाराची सर्व ती तयारी जिल्‍हा प्रशासनातर्फे केली असल्‍याची माहिती त्‍यांना देण्‍यात आली.
जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या परिसरात एक चांगले रुग्‍णालय जिल्‍हा वासियांसाठी उपलब्‍ध व्‍हावे यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशिल होतो. कोविड-19 च्‍या लॉकडाऊन काळात मागील तीन महिन्‍यात हे काम युध्‍द पातळीवर केल्‍याने लवकरच या नव्‍या रुग्‍णालयाची जिल्‍ह्यात भर पडत असल्‍याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्‍यक्‍त केले.
जिल्‍ह्यात दाखल झालेला मान्‍सून, पेरणीच्‍या प्रक्रिया, ग्रामीण भागातील दरवर्षी निर्माण होणारे साथीचे आजार, अतिवृष्‍टी झाली तर धोकादायक स्थितीत अडकणारी गावे, अपघात प्रवण रस्‍त्‍यावरील लहान, मोठे पूल, शेतकऱ्यांकडे उपलब्‍ध असलेल्‍या शेतमालासाठी हमीभाव खरेदी केंद्रे, ग्रामीण भागातील प्रा‍थमिक आरोग्‍य केंद्राची स्थिती, शालेय शिक्षण आदीबाबत पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी त्‍या-त्‍या विभागाच्‍या प्रमुखांकडून आढावा घेत जिल्‍ह्यातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत निर्देश दिले.
जिल्‍ह्यात शेतकरी बांधव अति‍शय चांगल्‍या दर्जाच्‍या कापसाचे उत्‍पादन घेतात. तथापि जिल्‍ह्याच्‍या विस्‍तीर्ण भौगोलिक रचनेनुसार व कापसाच्‍या उत्‍पादनानुसार जिल्‍ह्यात पाहिजे त्‍या प्रमाणात जिनिंग प्रेसिंग मिल्‍स उपलब्‍ध नसल्‍याने शेतकऱ्यांची कापूस वाहतुकीसाठी ओढाताण होते. ही ओढाताण रोखण्‍यासाठी व जिल्‍ह्यातील उद्योजकतेला चालना दिली जाईल, असेही पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी सुतोवाच केले. शहरातील दाटीवाटीत असलेल्‍या बाजारपेठेतील गर्दी टाळण्‍यासाठी ज्‍या-ज्‍या ठिकाणी शहराच्‍या जवळ एमआयडीसीच्‍या खुल्‍या जागा आहेत, त्‍या खुल्‍या जागेवर नवीन बाजारपेठा आकारात याव्‍यात यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
कापूस वाहतुकीच्‍या प्रश्‍नाला सोडविण्‍यासाठी जिल्‍ह्यातून जाणाऱ्या रेल्‍वे मार्गाचा उपयोग आपल्‍याला करुन घेता येण्‍या सारखा आहे. किनवट आणि भोकर या ठिकाणी रॅकची सुविधा निर्माण केली तर या दोन तालुक्‍यासह आजूबाजू इतर गावातीलही शेतकऱ्यांचा मोठा प्रश्‍न सुटेल. यासाठी त्‍यांनी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना स्‍वतः लक्ष घालून लवकरात लवकर ही सुविधा कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्‍यास सांगितले. वरिष्‍ठ पातळीवर यापुर्वी मी पाठपुरावा केला असून हे काम प्राधान्‍याने सोडविले जाईल, असेही पालकमंत्री अशोक चव्‍हाण यावेळी म्‍हणाले.
गोदावरी नदीवरील प्रदुषणाबाबत त्‍यांनी चिंता व्‍यक्‍त करुन प्रदुषणाला रोखण्‍यासाठी ज्‍या काही मोठ्या योजना लागतील त्‍यावर तात्‍काळ काम सुरु करण्‍याचे निर्देश त्‍यांनी नांदेड मनपा आयुक्‍त डॉ. सुनिल लहाने यांना यावेळी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला पावसाळा ग्रामीण भागात काही आव्हाने निर्माण करू शकतो. शेतकरी बांधवांना वेळेवर बी-बियाणे, निविष्ठा याची कमतरता पडणार नाही याची वेळोवेळी खातरजमा अधिकाऱ्यांनी करून घेतली पाहिजे. शहरासह योग्य त्या खबरदारी घेत सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आदेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. 
पालकमंत्री जेंव्‍हा हळवा कोपरा जागा करतात !
कुरेशी यांना काय झाले ...
जिल्‍ह्यातील विकास कामांचा आढावा सुरु असतांना पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी एक शासकीय अधिकाऱ्यांप्रती असलेल्‍या संवेदनेचा हळवा कोपरा जागा केली. जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक नईम कुरेशी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या बैठकीत त्‍यांनी कुरेशी यांची आठवणींना उजाळा देत एका चांगल्‍या अधिकाऱ्याला आपण गमावलो आहोत या शब्‍दात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. क्षणभर बैठकीस सहभागी असलेले सर्व अधिकारी ही संवेदनशिल झाले.
000000

वृत्त क्र. 553


कोरोनाचा एकही नवीन बाधित नाही
नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 13 अहवालांपैकी 13 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. एकही बाधित न आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 286वर स्थिरावली. 286 पैकी आतापर्यंत 180 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 93 बाधित व्यक्तींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली औषधोपचार चालू आहेत.
औषधोपचार चालू असलेल्या 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात 93 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 59, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. बुधवार 17 जून रोजी 236 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 568,
घेतलेले स्वॅब 5 हजार 457,
निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 643,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 286,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 220,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-86,
मृत्यू संख्या- 13,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 180,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 93,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 236 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...