जिल्हा वासियांसाठी लवकरच आणखी
एका अद्ययावत रुग्णालयाची सुविधा
-
पालकमंत्री अशोक चव्हाण
व्हिडीओ
कॉन्फरन्सिगद्वारे पालकमंत्र्यांनी घेतला उपाययोजनांचा आढावा
नांदेड, (जिमाका) दि. 17 :- आजच्या
घडीला जिल्ह्यातील कोवीड -19 संदर्भातील परिस्थिती आटोक्यात
जरी असली तरी शासन पातळीवर भविष्यातील स्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार
नाही यादृष्टिने जिल्हा पातळीवर शक्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्ह्याचे
पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला
दिले. जिल्ह्यातील सर्व विभागांच्या नियोजन व पुढील कामांच्या दिशासंदर्भात आज
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक
विजयकुमार मगर,
नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा
परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा
उपनिबंधक सुधीर फडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर
चलवदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत
मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर
व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोविड -19 बाधितांवर उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयांचा
शासनाने विचार करुन काही निर्देश दिले होते. जिल्हा व तालुका पातळीवर असलेले हे
खाजगी रुग्णालय आकाराने लहान असल्यामुळे अशा ठिकाणी कोविड- 19 बाधित व्यक्तींना उपचारासाठी ठेवणे अधिक आव्हानात्मक होईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. लहान रुग्णालयांना यात
समाविष्ठ करण्याऐवजी एखाद्या मोठ्या जागेवर मोठ्या स्वरुपाचे उपचार केंद्र
निर्माण केले आणि त्याठिकाणी खाजगी वैद्यकीय तज्ज्ञांना गरजेनुरुप जर उपचार देण्यासाठी
निमंत्रित केले तर हे सर्वार्थाने योग्य ठरेल, असे निर्देश
त्यांनी देवून याबाबत जिल्हा पातळीवर नियोजन करण्याचे सांगितले.
नांदेड जिल्ह्यात डॉ. शंकरराव चव्हाण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 150 रुग्णांच्या उपचाराची सुविधा तर जिल्हा
रुग्णालयात 50 रुग्णांची सुविधा उपलब्ध आहे. यात आणखी 100 बाधितांची सोय होवू शकेल अशी अतिरिक्त तयारी करण्यात आली आहे. एनआरआय कोविड सेंटर येथे 300 बाधितांच्या उपचाराची तर पंजाब भवन येथे 100
बाधितांच्या उपचाराची सर्व ती तयारी जिल्हा प्रशासनातर्फे केली असल्याची माहिती
त्यांना देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एक चांगले
रुग्णालय जिल्हा वासियांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशिल होतो.
कोविड-19 च्या लॉकडाऊन काळात मागील तीन महिन्यात हे काम युध्द पातळीवर केल्याने
लवकरच या नव्या रुग्णालयाची जिल्ह्यात भर पडत असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी
समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात दाखल झालेला मान्सून, पेरणीच्या प्रक्रिया,
ग्रामीण भागातील दरवर्षी निर्माण होणारे साथीचे आजार, अतिवृष्टी झाली तर धोकादायक स्थितीत अडकणारी गावे, अपघात
प्रवण रस्त्यावरील लहान, मोठे पूल, शेतकऱ्यांकडे
उपलब्ध असलेल्या शेतमालासाठी हमीभाव खरेदी केंद्रे, ग्रामीण
भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती, शालेय शिक्षण
आदीबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्या-त्या विभागाच्या प्रमुखांकडून
आढावा घेत जिल्ह्यातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत निर्देश
दिले.
जिल्ह्यात शेतकरी बांधव अतिशय चांगल्या
दर्जाच्या कापसाचे उत्पादन घेतात. तथापि जिल्ह्याच्या विस्तीर्ण भौगोलिक
रचनेनुसार व कापसाच्या उत्पादनानुसार जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात जिनिंग
प्रेसिंग मिल्स उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची कापूस वाहतुकीसाठी ओढाताण होते. ही
ओढाताण रोखण्यासाठी व जिल्ह्यातील उद्योजकतेला चालना दिली जाईल, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण
यांनी सुतोवाच केले. शहरातील दाटीवाटीत असलेल्या बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी
ज्या-ज्या ठिकाणी शहराच्या जवळ एमआयडीसीच्या खुल्या जागा आहेत, त्या खुल्या जागेवर नवीन बाजारपेठा आकारात याव्यात यासाठी प्रयत्नशील
असल्याचेही त्यांनी सांगितले.
कापूस वाहतुकीच्या प्रश्नाला सोडविण्यासाठी
जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचा उपयोग आपल्याला करुन घेता येण्या सारखा
आहे. किनवट आणि भोकर या ठिकाणी रॅकची सुविधा निर्माण केली तर या दोन तालुक्यासह
आजूबाजू इतर गावातीलही शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटेल. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांना स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर ही सुविधा कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यास
सांगितले. वरिष्ठ पातळीवर यापुर्वी मी पाठपुरावा केला असून हे काम प्राधान्याने
सोडविले जाईल, असेही पालकमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
गोदावरी नदीवरील प्रदुषणाबाबत त्यांनी चिंता
व्यक्त करुन प्रदुषणाला रोखण्यासाठी ज्या काही मोठ्या योजना लागतील त्यावर
तात्काळ काम सुरु करण्याचे निर्देश त्यांनी नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनिल
लहाने यांना यावेळी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला
पावसाळा ग्रामीण भागात काही आव्हाने निर्माण करू शकतो. शेतकरी बांधवांना वेळेवर
बी-बियाणे,
निविष्ठा याची कमतरता पडणार नाही याची वेळोवेळी खातरजमा
अधिकाऱ्यांनी करून घेतली पाहिजे. शहरासह योग्य त्या खबरदारी घेत सर्व विभाग प्रमुख
अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आदेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व
अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री जेंव्हा हळवा कोपरा जागा करतात !
कुरेशी यांना काय झाले ...
जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा सुरु
असतांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी एक शासकीय अधिकाऱ्यांप्रती असलेल्या
संवेदनेचा हळवा कोपरा जागा केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक
नईम कुरेशी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या बैठकीत त्यांनी कुरेशी यांची
आठवणींना उजाळा देत एका चांगल्या अधिकाऱ्याला आपण गमावलो आहोत या शब्दात आपल्या
भावना व्यक्त केल्या. क्षणभर बैठकीस सहभागी असलेले सर्व अधिकारी ही संवेदनशिल
झाले.
000000
No comments:
Post a Comment