Sunday, March 21, 2021

 

 नांदेड जिल्ह्यात आज 927 व्यक्ती कोरोना बाधित

नऊ बाधितांचा मृत्यू

अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 673 अहवालापैकी 927 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 401 तर अँटिजेन तपासणीद्वारे 526 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 31 हजार 716 एवढी झाली आहे. 

शुक्रवार 19 मार्च 2021 भक्तपूर देगलूर येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  येथे तर शनिवार 20 मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा, सरपंचनगर नांदेड येथील 61 वर्षाच्या एका पुरुषाचा, नसीर रोड नांदेड येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा, भूविकास कॉलनी नांदेड येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा, रामनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे तर लोहा तालुक्यातील कलंबर येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात व रविवार 21 मार्च रोजी होळी सराफा नांदेड येथील 73 वर्षाच्या एका महिलेचा, दीपनगर नांदेड येथील 62 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 648 एवढी झाली आहे. 

आजच्या 4 हजार 673 अहवालापैकी 3 हजार 616 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 31 हजार 716 एवढी झाली असून यातील 25 हजार 463 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 5 हजार 377 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 220, किनवट कोविड रुग्णालय 7, बिलोली तालुक्यांतर्गत 3, धर्माबाद तालुक्यांतर्गत 4, जिल्हा रुग्णालय नांदेड 22, देगलूर कोविड रुग्णालय 3, भोकर तालुक्यांतर्गत 2, मुदखेड तालुक्यांतर्गत 3, खासगी रुग्णालय 40 असे एकूण 309 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.28 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 222, माहूर तालुक्यात 18, नायगाव 8, मुखेड 30, कंधार 23, धर्माबाद 1, मुदखेड 2, नांदेड ग्रामीण 11, अर्धापूर 14, देगलूर 29, किनवट 2, लोहा 37, हदगाव 2, परभणी 2 असे एकूण 401 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 223, अर्धापूर तालुक्यात 27, बिलोली 7, धर्माबाद 18, कंधार 24, लोहा 60, मुदखेड 6, नायगाव 13, परभणी 1, नांदेड ग्रामीण 27, भोकर 14, देगलूर 4, हदगाव 11, किनवट 38, माहूर 22, मुखेड 27, उमरी 3, नागपूर 1 असे एकूण 526 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 5 हजार 377 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 190, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 79, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 111, किनवट कोविड रुग्णालयात 63, मुखेड कोविड रुग्णालय 106, देगलूर कोविड रुग्णालय 19, हदगाव कोविड रुग्णालय 32, लोहा कोविड रुग्णालय 119, कंधार कोविड केअर सेंटर 23, महसूल कोविड केअर सेंटर 102, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 158, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 13, खाजगी रुग्णालय 362 आहेत. 

रविवार 21 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 72 हजार 19

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 35 हजार 40

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 31 हजार 716

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 25 हजार 463

एकुण मृत्यू संख्या-648

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.28 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-109

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-334

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-5 हजार 377

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-59.

00000

 

 कोरोना नियंत्रणासाठी नांदेड जिल्ह्यात अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी*

- जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश

 ▪️पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा    

नांदेड (जिमाका) दि. 21  :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमीत केले. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून, सर्वंकष विचार करता कोरोनाग्रस्तांची संख्या व त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू न देणे व्यापक हिताचे आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या कठोर उपाययोजनांचा गांभिर्याने विचार करून तातडीने निर्णय घेण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सकाळी सर्व विभाग प्रमुखांसोबत ऑनलाईन बैठकीत निर्देश दिले होते. 

या बैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी ऑनलाईन तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपा आरोग्य विभागाचे डॉ. बिसेन, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त तेजस माळवदकर आदी प्रमुख प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित होते. यानंतर तातडीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वांच्या सूचना विचारात घेऊन व्यापक हितापोटी संचारबंदीचा निर्णय घेतला.    

सदर बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी ऑनलाईन सहभाग घेत सूचना केल्या. जिल्ह्यातील वजिराबाद व इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्व दुकानमालकांच्या कोरोना चाचण्या, महानगरपालिकेच्या जंगमवाडी, सांगवी, तरोडा, देगलूर नाका या भागातील दवाखान्यांमध्ये लसीकरण व कोरोना चाचणी सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली. आमदार हंबर्डे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना केल्या. 

संचारबंदीमध्ये जिल्हादंडाधिकाऱ्यांचे हे आहेत आदेश 

कोरोना विषाणूचा (कोवीड-19) प्रादुर्भाव व प्रसार टाळण्‍याच्‍या द्दष्‍टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये नांदेड जिल्‍हयात 5 किंवा 5 पेक्षा जास्‍त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास आदेशाद्वारे मनाई केली आहे. महानगरपालिका / नगरपरिषद/ नगरपंचायत / ग्रामीण क्षेत्राकरिता परिशिष्‍ट अ,   प्रमाणे सूचना निर्गमीत करण्‍यात आल्या आहेत. 

सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व  इव्हिनिंग वॉक प्रतिबंधीत राहील.  

उपहारगृह (कोविड-19 करीता वापरात असलेले वगळून) लॉज, हॉटेल्‍स, बार, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील. त‍थापि घरपोच पुरवठा करता येईल. (डिलेव्‍हरी बॉय यांनी स्‍वतः जवळ ओळखपत्र बाळगणे आवश्‍यक राहील.)  

सर्व केश कर्तनालय/सलुन/ब्‍युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील. मटन, चिकन, अंडी, मासे इत्‍यादीची विक्री संपूर्णतः बंद राहतील, तथापि घरपोच सेवा देता येईल.  

शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्‍था, प्रशिक्षण संस्‍था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतःबंद राहतील.  

सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील तथापी, अत्‍यावश्‍यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्‍त वाहने व वैदयकीय कारणास्‍तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील. 

अत्‍यावश्‍यक /वैद्यकिय कारणास्‍तव अॅटोमध्‍ये 2 व्‍यक्‍तींना परवानगी असेल. सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्‍पो, ट्रेलर, ट्रॅक्‍टर इत्‍यादीसाठी संपूर्णतः बंद राहतील. तथापि, कोरोणा विषाणू प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे काम करणारे नांदेड महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्‍य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्‍ट कर्मचारी व वाहने तसेच अत्‍यावश्‍यक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्‍या आदेशानुसार वगळण्‍यात येत आहेत. तसेच अत्‍यावश्‍यक सेवा व वस्‍तु यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्‍या आदेशातून वगळण्‍यात येत आहे. 

सर्व प्रकारचे बांधकाम / कंस्‍ट्रक्‍शनची कामे संपूर्णतः बंद राहतील तथापी ज्‍या बांधकामाच्‍या जागेवर कामगारांची निवास व्‍यवस्‍था असेल तरच त्‍यांना काम सुरु ठेवता येईल.  

सर्व चित्रपटगृह, व्‍यायामशाळा, जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, लग्‍न समारंभ, स्‍वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील. या आदेशानुसार लागु करण्‍यात येत असलेल्‍या संचारबंदीच्‍या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह अनुज्ञेय असेल. 

सामाजीक / राजकीय / क्रिडा /मनोरंजन /सांस्‍कृतीक / धार्मीक  कार्यक्रम व सभा संपूर्णतःबंद राहतील.   

धार्मीक स्‍थळे/ सार्वजनिक प्रार्थनास्‍थळे संपूर्णतः बंद राहतील. नांदेड शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. (तथापि 31 मार्च क्लीअरींगचे कामे दर्शनी दरवाजा बंद ठेवून करता येतील.)  

सर्व शासकीय कार्यालयासमोर मोर्चे,धरणे आंदोलन उपोषण इ. वर निर्बंध राहतील.  

31 मार्च अखेरीस ताळमेळ, बॅकेत चलन भरण्‍याची कामे (दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजींगचे कामे करण्‍यास दोन-तीन व्‍यक्‍तीस परवानगी असेल.) ग्राहकांना प्रवेशास परवानगी राहणार नाही.

 *या अत्‍यावश्‍यक बाबी / सेवा मर्यादीत स्‍वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील.* 

सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते दुपारी 12  वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्‍यांना दुपारी 12 पर्यंत दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल.  

दुध विक्री व वितरण सकाळी 10 वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील.तथापी दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल.   

भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी 7 ते 10 यावेळेत किरकोळ विक्रेत्‍यांना विक्री करतील. किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता गल्‍लोगल्‍लीत फिरून सकाळी 7 ते 1 यावेळेतच विक्री  करतील.  

सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, पशुचिकित्‍सा सेवा त्‍यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील. 

सर्व रुग्‍णालये व रुग्‍णालयाशी निगडीत सेवा आस्‍थापना त्‍यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्‍णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्‍णांना आवश्‍यक सेवा नाकरणार नाही. अन्‍यथा संबंधित संस्‍था कारवाईस पात्र राहील. 

ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्‍याबाबत असलेली सर्व औषध विक्री दुकाने दिनांक 4 एप्रिल 2021 पर्यंत 24 तास सुरु ठेवता येतील. 

 ई-कॉमर्स सेवा उदा. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व तत्‍सम सेवा ( अत्‍यावश्‍यक व इतर ) घरपोच सुरु राहतील. 

सर्व मा. न्‍यायालये व राज्‍य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्‍थानिक संस्‍थेची कार्यालये शासन निर्देशानुसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील. शक्‍य  असल्‍यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्‍यात यावा.  

शासकीय कर्मचा-यांसाठी आवश्‍यक पासची आवश्‍यकता राहणार नाही, तथापि स्‍वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्‍यक राहील. 

पेट्रोलपंप व गॅसपंप सुरु राहतील. परंतु सदर ठिकाणी अत्‍यावश्‍यक सेवेतील (पोलीस, आरोग्‍य विभाग इतर शासकीय विभाग) वाहने, अत्‍यावश्‍यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने, अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारे खाजगी आस्‍थापनाचे  ( घरगुती गॅस वितरक, पिण्‍याचे पाणी पुरविणारे, इत्‍यादी ) वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्‍यात येईल. स्‍वतःचे ओळखपत्र, गणवेश असणे आवश्‍यक राहील.  

एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे.  

सॉ-मील (लाकडाचे दुकान) केवळ स्‍मशानभुमीच्‍या बाजुला असेल तरच सुरु ठेवता येईल. इतर ठिकाणी बंद राहतील. 

औद्योगीक व इतर वस्‍तुची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्‍यासाठी आवश्‍यक अशी स्‍थानिक, आंतरजिल्‍हा, आंतरराज्‍य वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहील.  

दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्‍यवस्‍था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 6 ते 9 यावेळेमध्‍येच अनुज्ञेय राहील. 

पाणीपुरवठा करणारे टॅंकरला नियमानुसार परवानगी राहील. 

संस्‍थात्‍मक अलगीकरण / विलगीकरण व कोव्हिड केअर सेंटर करता शासनाने ताब्‍यात घेतलेल्‍या व मान्‍यता दिलेल्‍या कार्यालयाच्‍या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.  

सर्व राष्‍ट्रीयकृत व आरबीआयने मान्‍यता दिलेल्‍या बॅंका नियमानुसार किमान मनुष्‍यबळासह सुरु राहतील. बॅंकेच्‍या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील. 

नांदेड जिल्‍ह्यातील मा. न्‍यायालयाचे कर्मचारी, अधिकरी, मा. न्‍यायाधीश, वकील, शासकीय राज्‍य / केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्‍टर नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्‍यावश्‍यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे,खते, गॅस  वितरक,  पाणी पुरवठा, आरोग्‍य व स्‍वच्‍छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळया दरम्‍यान करावयाची अत्‍यावश्‍यक कामे करणारे व विज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसुल विभागाचे कर्मचारी तसेच कंन्‍टेमेंट झोन करीता नियुक्‍त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्‍वतः करीता फक्‍त) वाहन वापरण्‍यास परवानगी राहील. या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्‍वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्‍वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. वाहन फक्‍त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्‍थेने दिलेल्‍या वेळेतच वापरता येईल.  

औषध व अन्‍न उत्‍पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्‍याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील. 

बी-बियाणे, शेतीसाठी लागणारे औषधे, रस्‍सी, ताडपत्रीची दुकाने सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.  

अन्‍न प्रक्रिया व शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उद्योग, कारखाने सुरु ठेवता येतील, मात्र कर्मचा-यांनी त्‍यांची ओळखपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील.  

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्‍थापनांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरावा. 

अत्‍यावश्‍यक वाहनांना साहित्‍य पुरविणारे अॅटोमोबाईल्‍स, शेतीसाठीचे फवारणी यंत्र दुरुस्‍ती दुकाने यांना सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आस्‍थापना सुरु ठेवता येतील.  

सर्ववेद्यकीय, व्‍यवसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅम्‍बुलन्‍स यांना जिल्‍ह्यातर्गत वाहतुकीसाठी  परवानगी  राहील.  वाहनांचे अधिकृत सर्विंस सेंटर फक्‍त अत्‍यावश्‍यक सेवेतील वाहनांना (वैद्यकीय सेवेतील, पोलीस व इतर शासकीय यंत्रणेची वाहने) यांना सुविधा पुरवितील. त्‍यांच्‍या कर्मचा-यांना गणवेश व ओळखपत्र बंधनकारक राहील. 

वृध्‍द व आजारी व्‍यक्‍तीकरीता नियुक्‍त केलेले मदतनीस यांच्‍या सेवा सुरु राहतील.  

अंत्‍यविधीसाठी 20 व्‍यक्‍तींच्‍या उपस्थितीस परवानगी असेल. शेतीच्‍या मशागतीस मुभा असेल. मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. कामाच्‍या ठिकाणी शारीरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.  

स्‍वस्‍त धान्‍य दुकाने सुरु राहतील.  ज्‍याठिकाणी ग्राहकांना आत प्रवेश देवून खरेदी केली जाते अशी सुपर मार्केटस् (डी मार्ट, सुपर मार्केट,नांदेड स्‍क्‍वेअर बाझार इत्‍यादी) बंद राहतील. परंतु ऑनलाईन/दूरध्‍वनी वरुन प्राप्‍त ऑर्डरनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत घरपोच साहित्‍य वितरीत करता येईल. 

घरपोच सेवा पुरविणा-या व्‍यक्‍तीस गणवेश व ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे.  

बाहेरगावी/परराज्‍य/देशात जाण्‍यासाठी रेल्‍वे/ विमानाचे ‍‍तिकीट बुकींग केले असेल, त्‍यांना प्रवासास परवानगी असेल, सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्‍यक आहे. 

अत्‍यावश्‍यक सेवेशी निगडीत नसलेले कारखाने/उद्योग कामाच्‍या ठिकाणी मजुरांच्‍या राहण्‍याची व जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील. 

पाणी पुरवठा (जार, टॅंकर) दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. 

इंटरनेटसारख्‍या संपर्क साधनांसंबंधी सेवा पुरविणा-या संस्‍थांना त्‍यांच्‍या आस्‍थापना आवश्‍यकते नुसार सुरु ठेवता येईल.   

सर्व ऑनलाईन सेवा पुरवणिारे CSC नियमानुसार अनुज्ञेय असलेल्‍या वेळेप्रमाणे सुरु राहतील. अत्‍यावश्‍यक सेवेतील संस्‍था ( CSC घरगुती गॅस वितरक, पेट्रोलपंप धारक इत्‍यादी ) यांना दैनिक व्‍यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्‍यवहारासाठी बॅकेत ये-जा करणेसाठी व व्‍यवहार करणेसाठी परवानगी असेल.  

बॅकेतील व्‍यवहारासाठी ये-जा करणा-या व्‍यक्‍तीस संस्‍थेचा गणवेश अथवा ओळखपत्र किंवा आवश्‍यकतेनुसार दोन्‍ही बाबी बंधनकारक राहतील. 

या आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्‍यक कायदेशिर व दंडात्‍मक  कारवाई करण्‍यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे. यात महानगरपालिका हद्दीत  महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. नगरपालिका/नगरपंचायत हद्दीत   नगरपालिका/नगरपंचायत व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.  

गावपातळीवर  ग्रामपंचायत  व पोलीस विभागाचे संयुक्‍त पथक गठीत करावे. याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांचेकडे सादर करावीत.संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल. 

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न  करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज 21 मार्च 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...