Wednesday, January 3, 2024

कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी नांदेड येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

 वृत्त क्र. 11

कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी

नांदेड येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

·         जिल्ह्यातील स्थानिक कलावंतासाठी स्वतंत्र वेळ

·         नंदगिरी किल्ल्यावर एक दिवस विशेष कार्यक्रम

·         क्रीडा स्पर्धातून खेळाडूंचा होणार गौरव

नांदेड (जिमाका) दि. 3 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करुन विविध प्रांतातील संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्याची माहिती जनसामान्यापर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने नांदेड येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून स्थानिक प्रतीथयश कलावंताचा सन्मान त्यांच्या हस्ते होणार आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्गंत हा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जात आहे. शासन निर्णयान्वये या महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन व सुयोग्य नियोजनासाठी समन्वय व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणचे कार्यकारी अभियंता, पर्यटन विभागाचे क्षेत्रिय अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, सांस्कृतिक कार्य विभागाचे  सहाय्यक संचालक, पुरातत्व, पुराभिलेख विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आदी या समितीचे सदस्य असून निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडतील.

पाच दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे, शिव चरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोक कलेतील विविध प्रकार, कवि संमेलन/व्याखाने, जिल्ह्यातील ऐतिहासिक, पुरातत्व, भौगोलिक आणि नैसर्गिक वैभवावर आधारित छायाचित्राचे विशेष प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. हा पाच दिवशीय महोत्सव लोकसहभागातून यशस्वी करण्याचा मनोदय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. समितीची पहिली बैठक काल त्यांच्या कक्षात संपन्न झाली. यात नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

00000 

जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

 वृत्त क्र. 10

 

जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ

व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या सर्वागिण विकास व आर्थिक उन्नतीसाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाने केली आहे. या महामंडळाचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी या महामंडळाच्या योजनेचा लाभ गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या लोकांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड - 413 605 तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02462-220865 यांच्याशी संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

नशामुक्‍त भारत अभियान व संविधान जागर कार्यशाळेचे 5 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजन

 वृत्त क्र. 9

नशामुक्‍त भारत अभियान व संविधान जागर

कार्यशाळेचे 5 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :-विदयार्थ्‍यांमध्‍ये समाजभान निर्माण व्‍हावे म्‍हणुन लातूर विभागातील महाविद्यालयांचे प्राचार्य, माध्‍यमिक शाळांचे मुख्‍याध्‍यापक, वसतिगृहांचे गृहपाल यांचेसाठी शुक्रवार 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. दयानंद सभागृह, लातूर येथे नशामुक्‍त भारत अभियान व संविधान जागर कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. या कार्यशाळेस लातूर विभागातील महाविद्यालयांचे प्राचार्य, माध्‍यमिक शाळांचे मुख्‍याध्‍यापक, वसतिगृहांचे गृहपाल यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर समाज कल्‍याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्‍त अ.र.देवसटवार यांनी केले आहे.

 

काळानुरुप विविध संस्थेमध्‍ये तसेच कुटुंब व्‍यवस्‍थेमध्‍ये बदल झालेले आहेत. दिव्‍यांग व्‍यक्‍ती, तृतियपंथी, ज्‍येष्‍ठ नागरिक यांचे बाबतीत सर्वांनी संवेदनशील होणे गरजेचे आहे. तसेच संविधानाप्रती व देशाप्रती प्रत्‍येकाने जबाबदार होणे गरजेचे आहे. त्‍यादृष्‍टीने समाजामध्‍ये जागृती निर्माण व्‍हावी या दृष्‍टीने या कार्यशाळेमध्‍ये संविधान जागृती, व्‍यसनमुक्‍ती, दिव्‍यांगाच्‍या अडचणी आणि समाजाचे दायित्‍व, ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या व्‍यथा आणि उपचार, तृतीयपंथीयांच्‍या समस्‍या व अंधश्रध्‍दा निर्मुलन या विषयावर तज्ञ मान्‍यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन लातूरच्या जिल्‍हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांचे हस्‍ते होणार असून कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी अस्‍लम तडवी हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमात लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूरचे संचालक डॉ.राजेश शिंदे, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) नागेश मापारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना फुटाणे हे उपस्थित राहणार आहेत.

 

या कार्यशाळेत प्रा. सविता शेटे यांचे अंधश्रध्‍दा निर्मुलन-जागृती प्रा.डॉ.हर्षवर्धन कोल्‍हापुरे यांचे संविधान वाचन-गरज, नंदकुमार फुले यांचे दिव्‍यांग व्‍यक्‍ती-अडचणी आणि समाजाचे दायित्‍व, डॉ.बी.आर.पाटील यांचे ज्‍येष्‍ठ नागरिक व्‍यथा आणि उपचार जागृती डॉ.अनिल जायभाये यांचे तृतियपंथी आणि समाज भान व  डॉ. विजयकुमार यादव यांचे व्‍यसनमुक्‍ती जागृती या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

0000

                                       

विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची उर्वरित रक्कम 7 दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करावी - सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे

  वृत्त क्र. 8


विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची उर्वरित रक्कम

7 दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करावी

-         सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे

नांदेड (जिमाका) दि. 3 :-  गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ची सन 2021-22 व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसात जमा होणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी जमा झालेल्या रकमेमधून त्यांच्या शिष्यवृत्ती अर्जातील मंजूर एकूण निर्वाह भत्ता रकमेच्या 60 टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम 7 दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करावी. याप्रमाणे कार्यवाही न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहेया योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 17 मार्च 2022 व 7 जुलै 2023 या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60 टक्के हिश्याची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयात 7 दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

0000

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...