Tuesday, May 20, 2025

 वृत्त क्रमांक 517

येळी घाटावर अवैध वाळू उत्खननाविरोधी पोलिस व महसूल प्रशासनाची धडक कारवाई 

दिनांक 20 मे:- आज सकाळी येळी घाटावर पोलीस व महसूल प्रशासानाने अवैध वाळू उत्‍खनना विरोधी धडक कारवाई करुन 9 इंजिन 3 जेसीबी एक हायवा ट्रॅक आणि एक टिपर जप्‍त करुन पोलीस स्‍टेशन उस्‍माननगर येथे ठेवण्‍यात आल्‍या आहेत. त्‍याविरुध्‍द पोलीस विभागा तर्फे फौजदारी कारवाई करण्‍यात येणार असून महसूल विभागामार्फत दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे.

ही कारवाई ही जिल्‍हाधिकारी राहूल कर्डीले, पोलीस अधिक्षिक अबिनाश कुमार यांच्‍या मागर्दशनाखाली तहसिलदार लोहा तसेच खंडेराय पोलीस निरीक्षक स्‍थानिक गुणे शाखा नांदेड श्री. मुळीक सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्‍माननगर तसेच मंडळ अधिकारी कटारे, सहारे, तलाठी एकाडे, तलाठी बोधने, तलाठी आस्‍कुलकर, तलाठी रायाजी, तलाठी बोधगीरे, तलाठी परशुराम जाधव, तलाठी डी.जी. शिंदे, तलाठी मोतीराम जाधव, तलाठी मेवणकर, तलाठी लाडेकर यांनी उपरोक्‍त कारवाई केली,अशी माहिती तहसीलदार लोहा यांनी दिली.

०००००

 वृत्त क्रमांक 516

तांत्रिक पदवीधारकांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी  

नांदेड दि. 20 मे :- भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध असून तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम (TGC-142) ची अधिसूचना नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही अधिसुचना www.joinindianarmy.nic.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.  

तांत्रिक पदवीधारकांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सामील होण्यासाठी ही योजना खुली आहे. सर्व विद्यार्थी www.joinindianarmy.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 29 मे 2025 पर्यंत भरता येतील, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर सैन्य भारती कार्यालयाचे कर्नल डायरेक्टर रिक्रूटिंग यांनी केले आहे. 

0000

 वृत्त क्रमांक 515

मधुमित्र व मधुसखी पुरस्काराचे नाशिक येथे वितरण   

नांदेड दि. 20 मे :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा मधुमित्र व मधुसखी पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधुन आज 20 मे रोजी हा कार्यक्रम नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. मधुमित्र पुरस्कारसाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सचिन उगले व राजु मंडळ (कोसबाड, डहाणु, पालघर) तर कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तेजा घोरपडे यांची मधु सखी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मधमाशी पालन करण्याऱ्या मधपालनास प्रोत्सहान देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने 2023 पासुन ही योजना सुरु केली आहे. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि बसंवत हनी पार्क नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा हा कार्यक्रम घेण्यात आला. 20 मे रोजी बसंवत हनी पार्क, पिंपळगाव नाशिक येथे सकाळी 11 वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आली. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी काही उपस्थित मधपालना उत्तेजनार्थ पुरस्कारही दिले. या कार्यक्रमास बहुसंख्येने मधपालानी व याविषयात रुची असणारे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. 

0000

वृत्त क्रमांक 514

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे नांदेड विमानतळ हस्तांतरण प्रक्रियेस प्रारंभ

कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसी प्राधिकरणाला केल्या विविध सूचना

तीन महिन्यानंतर हस्तांतरणाची कार्यवाही

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी केली विमानतळ व परिसराची पाहणी

नांदेड दि. 20 मे : नांदेड येथून सध्या अनेक मोठया शहरात विमानसेवा सुरु आहे. नांदेड येथील विमानतळ सध्या एमआयडीसीच्या ताब्यात असुन लवकरच ते महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. यासाठी आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षा व  व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करुन औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे एसआर मॅनेजर रोहित राहपाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत देशपांडे, नियोजन अधिकारी भक्ती चितळे,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता  कल्पेश लहीवाल, मो जावेद व बेग उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आदीची उपस्थिती होती.

विमानतळावरील विविध सुविधांबाबत औद्योगिक विकास महामंडळाने येत्या तीन महिण्यात सुधारणा करावी. विमानतळावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षा व  व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे केली. तसेच विमानतळावरील मनुष्यबळ भरती प्रक्रीया, पाणीपुरवठा तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईल यांची दक्षता घेणे. विमानतळावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधामध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच येत्या तीन महिण्यात या सर्व सुविधा उपलब्ध केल्या नंतर  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे विमानतळ हस्तातंरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विमानतळावरील धावपट्टी, ॲब्युलन्स, अग्निशामक व इतर आवश्यक त्या वाहनाची, तसेच स्कॅनर मशिन अशा सर्व बाबीची पाहणी केली.   

00000










  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...