Monday, August 24, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत राज्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील ₹5086 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरीत करण्यात आला. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना ₹10,115 कोटींचे वितरण करण्यात आले आहे.
कर्जमुक्तीकडून समृद्धीकडे, शेतकऱ्यांच्या प्रगतीला शासनाची साथ!
शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसरा हप्ता जारी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी वितरीत
• आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ
मुंबई, दि. २४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना एकूण ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे.आतापर्यंत १३.७० लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण ऑनलाइन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यात विभागनिहाय लाभ
अमरावती विभाग : १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना ₹१,२०८ कोटींचा लाभ.
नाशिक विभाग : ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ₹७५६ कोटींचा लाभ.
छत्रपती संभाजीनगर विभाग : ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना ₹२,२८४ कोटींचा लाभ.
पुणे विभाग : ४९ हजार २२४ शेतकऱ्यांना ₹४१७ कोटींचा लाभ.
नागपूर विभाग : ४४ हजार ८६४ शेतकऱ्यांना ₹३६६ कोटींचा लाभ.
कोकण विभाग : ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ₹५४ कोटींचा लाभ.
योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली या प्रक्रियेचे व्यवस्थापन केले जात आहे.
0000
वृत्त
'वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. २४ : माती वाचवणे, पाणी जपणे आणि जलसंधारणाच्या कार्याला व्यापक लोकसहभागाची जोड देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील ३६ जिल्ह्यांत एकाचवेळी झालेल्या या उपक्रमात तीन लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले. या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जनतेची जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.
प्रत्येक सहभागीने तीन किलोमीटर अंतर चालत जलसंधारणाचा संदेश दिला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून हा सामूहिक प्रवास पूर्ण झाला. ही केवळ आकडेवारी नसून माती आणि पाणी संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या जनतेने व्यक्त केलेली सामूहिक बांधिलकी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईतील वरळी येथे या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याचवेळी राज्यातील ३६ जिल्ह्यांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणाई तसेच विविध सामाजिक घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः युवकांचा सहभाग हा या उपक्रमाची महत्त्वाची जमेची बाजू ठरली.
जलसंधारणाच्या योजनांना लोकसहभागाची जोड
राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘अमृत सरोवर’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमांतून जलसंधारणाची कामे राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या उद्देशांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर वॉटर’ प्रभावी माध्यम ठरले आहे.
पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि मातीची धूप रोखणे यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारक आणि शाश्वत होतील, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जलसंधारण अभियानाला जनसहभागाचे बळ
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारण, पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे.
‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला मिळालेला प्रतिसाद या अभियानाला निश्चितच नवे बळ देणारा आहे. एका दिवसाच्या उपक्रमापुरता मर्यादित न राहता जलसंधारणाचा संदेश प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.
'माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित होईल. जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजाचीही आहे. ‘वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,' असे मंत्री राठोड यांनी सांगितले.
0000
वृत्त क्रमांक
जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक पदी चंद्रकांत कारभारी रुजू
नांदेड, दि. 24 ऑगस्ट : जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथील उपसंपादकपदावर चंद्रकांत कारभारी आज रुजू झाले. हिंगोली येथून बदलीने त्यांची नांदेड येथे नियुक्ती झाली आहे. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी त्यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, यापूर्वी या पदावर कार्यरत असलेल्या उपसंपादक अलका पाटील यांची हिंगोली येथे बदली झाली आहे.
चंद्रकांत कारभारी हे यापूर्वी जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली येथे उपसंपादक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच विकासकामांच्या प्रसिद्धीचे काम प्रभावीपणे पार पाडले. नांदेड येथे रुजू झाल्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
0000
वृत्त क्रमांक
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड(जिमाका), दि. 24 :- नांदेड जिल्ह्यात 25 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपासून ते 8 सप्टेंबर 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 25 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपासून ते 8 सप्टेंबर 2026 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
**
वृत्त क्रमांक
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
नांदेड (जिमाका), दि. २४ : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येतात. सन २०२६-२७ या वर्षासाठी या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन २०२६-२७ साठी समान निधी अंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेत कमाल २५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध आहे. उपरोक्त योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्याने त्यासाठी प्रस्ताव सादर करू नयेत, असे ग्रंथालय संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
असमान निधी अंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये आणि इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्याची तरतूद आहे. तसेच ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी २.५० लाख रुपये, विशेष आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी ६.२० लाख रुपये तसेच इमारत विस्तारासाठी १० लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे.
याशिवाय राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रमांच्या आयोजनासाठी १.५० लाख, २.५० लाख व ३ लाख रुपयांपर्यंत, तर ‘बालकोपरा’ स्थापन करण्यासाठी कमाल ६.८० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
या योजनांसाठीचे नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावा.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील प्रस्ताव चार प्रतींमध्ये दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
****
वृत्त क्रमांक
ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील वाहतूक मार्गात बदल
नांदेड (जिमाका), दि. 24 : ईद-ए-मिलादुन्नबी अनुषंगाने नांदेड शहरात दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने शांतता व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नांदेड शहरातील काही मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
प्रभारी पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाहतुकीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग बर्की चौक ते जुना मोंढा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
जुना मोंढा – देना बँक – महावीर चौक – गांधी पुतळा – शिवाजी महाराज पुतळा – वजीराबाद चौक – कलामंदिर – शिवाजीनगर ते आयटीआय चौक – श्रीनगर – वर्कशॉप कॉर्नर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
सिडको/हडकोकडून कोठा नाका मार्गे नवीन पुलावरून जुना मोंढ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
रविनगर-जुना कोठा गोवर्धनघाट पुलावरून वजीराबाद चौक मार्गे वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
बर्की चौकाकडून जुना मोंढ्याकडे जाणारी वाहतूक इतवारा बाजार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय – भंगार लाईन – गिट्टी क्रेशर चौक – बाफना टी पॉईंट रोडने जाण्यासाठी वापरता येईल.
जुना मोंढा ते वर्कशॉप मार्गावरील वाहतूक अबचल नगर – यात्री निवास – अण्णाभाऊ साठे चौक – महादेव दाल मिल – रोड नं. 26 ने ये-जा करतील किंवा नाईक चौक – टिळक नगर चौक - पिरबु-हान मार्गे चैतन्य नगरकडे वळविण्यात येईल.
वजीराबाद चौकाकडून श्रीनगरकडे जाणारी वाहतूक वजीराबाद चौक – तिरंगा चौक – पोलीस मुख्यालय कॉर्नर – लालवाडी अंडरब्रिज – शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईंट मार्गे वळविण्यात येईल.
रविनगर-जुना कोठा-गोवर्धनघाट पुलावरून नांदेड शहरातून वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक पोलीस मुख्यालय कॉर्नर – लालवाडी अंडरब्रिज – शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेशनगर वाय पॉईंट मार्गे वळविण्यात येईल.
जुना मोंढ्याकडून सिडको/हडकोकडे जाणारी वाहतूक भगतसिंग रोड – कविता हॉटेल – बाफना – देगलूर नाका – जुना पूल या मार्गाचा वापर करू शकेल.
नागरिकांनी दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेतील या बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड पोलिस प्रशासनाने केले आहे.
0000
वृत्त
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा
पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळत असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. पहिल्यांदाच झालेल्या या कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारावर उपचारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे करार इतर अनेक नामांकित संस्थांसोबतही प्रक्रियेत असून ते लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत होत आहे.
प्रतिक्रिया :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. याच धर्तीवर इतरही अनेक नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
0000
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
