Monday, August 24, 2026

 वृत्त  

'वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. २४ : माती वाचवणे, पाणी जपणे आणि जलसंधारणाच्या कार्याला व्यापक लोकसहभागाची जोड देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील ३६ जिल्ह्यांत एकाचवेळी झालेल्या या उपक्रमात तीन लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले. या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जनतेची जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

प्रत्येक सहभागीने तीन किलोमीटर अंतर चालत जलसंधारणाचा संदेश दिला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून हा सामूहिक प्रवास पूर्ण झाला. ही केवळ आकडेवारी नसून माती आणि पाणी संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या जनतेने व्यक्त केलेली सामूहिक बांधिलकी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईतील वरळी येथे या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याचवेळी राज्यातील ३६ जिल्ह्यांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणाई तसेच विविध सामाजिक घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः युवकांचा सहभाग हा या उपक्रमाची महत्त्वाची जमेची बाजू ठरली.

जलसंधारणाच्या योजनांना लोकसहभागाची जोड

राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘अमृत सरोवर’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमांतून जलसंधारणाची कामे राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या उद्देशांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर वॉटर’ प्रभावी माध्यम ठरले आहे.

पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि मातीची धूप रोखणे यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारक आणि शाश्वत होतील, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

जलसंधारण अभियानाला जनसहभागाचे बळ

 १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारण, पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. 

‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ला मिळालेला प्रतिसाद या अभियानाला निश्चितच नवे बळ देणारा आहे. एका दिवसाच्या उपक्रमापुरता मर्यादित न राहता जलसंधारणाचा संदेश प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.

'माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित होईल. जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजाचीही आहे. ‘वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,' असे मंत्री राठोड यांनी सांगितले.

0000



No comments:

Post a Comment

शासकीय कर्मचाऱ्यांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासनाला डेटा-आधारित, जलद आण...