Friday, April 17, 2026

 "  वृत्तपत्रीय टिप्पणी  "

 "  शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 "

नांदेड – महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरीता राज्यात प्रतिभावंत खेळाडूची निवड करुन शास्त्रोक्त प्रशीक्षण शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधीनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्यातुन जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अदयावत क्रीडा सुविधा पूरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी,पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.

सन 2026-27 साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सदर 06 क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (50%) व कौशल्य चाचणी (50%) प्रक्रियेअंतर्गत खालील निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. सदर प्रवेश प्रक्रीयासाठी खालील प्रमाणे नियम अटी व शर्ती राहणार आहेत.


क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे –

                राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 ठिकाणी क्रीडा प्रबेाधिनीची स्थापना करण्यात आली होती. सदर ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.


क्रीडाप्रबोधिनी मधिल क्रीडा प्रकार –

                ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबलटेनिस, वेटलिफटींग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सींग अशा 16 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.


प्रवेश प्रक्रीया सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी –

·         सरळ प्रवेश प्रक्रीया – क्रीडा प्रबोधिनीतील असलेलया सबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षआतील आहे अशा खेळाडूंना सबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. तथापी सरळ प्रवेश प्रक्रियेमध्ये जर इच्छुकांची संख्या 50% पेक्षा जास्त असल्यास प्रथम प्राधान्य सरळ प्रवेश अंतर्गत पात्र होणा-या निवासी व अनिवासी खेळाडूंना राहील.

·         खेळनिहाय कौशल्य चाचणी – क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या सबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षे आतील आहे अशा खेळाडूंना सबंधीत खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल.

·         खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र, पुणे-  ॲथलेटिक्स, सायकलींग, शुटींग खेळात ज्यांचे वय 20 वर्षे आतील आहे अशा खेळाडूंना सबंधीत खेळाबाबतची कोशल्य चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.

·         वैदयकीय चाचणी – उपरोक्त चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैदयकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिक दृष्टया सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येत आहे.


जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर चाचण्या आयोजित करताना करावयाची कार्यवाही-

अ) जिल्हास्तर –

1)       आपल्या शाळेच्या/ संस्थेच्या/ संघटनेच्या वतीने जिल्हा, विभाग व राज्य क्रीडा प्रबोधिनी चाचण्यांबाबत माहिती सर्वांना अवगत करण्यात यावी.

2)      जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होणा-या खेळाडूंची नांवे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल,नांदेड येथे नोंदणी करण्यात यावी. खेळाडूंचे नांव, जिल्हा, खेळप्रकार, जन्मदिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र याबाबत माहिती संकलित करुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांचेकडे दि.22 एप्रिल,2026 पर्यंत सादर करावीत.

 

ब) विभागस्तर –

विभागस्तरावर कौशल्य व सरळ प्रवेश चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सन 2026-27 विभागस्तरीय प्रवेश प्रक्रिया क्रीडा कौशल्य व सरळ प्रवेश चाचणी वयोमर्यादा व आयोजन दिनांक

 सरळ प्रवेश- खेळ- हॅन्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन (अनिवासी ठाणे करिता)


कौशल्य चाचणी- खेळ-  हॅन्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स

सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी छत्रपती संभाजीनगर करिता- ॲथलेटिक्स, हॉकी याची वयोमर्यादा दि.01/01/2007 नंतर जन्मलेला असावा तसेच विभागस्तरीय चाचचणी आयोजन दि.27 ते 30 एप्रिल , 2026 दरम्यान राहील.


खेलो इंडिया निपुणता केंद्र, पुणे – खेळ- सायकलींग, शुटींग, ॲथलेटिक्स – खेळाडूची जन्तारीख दि.01/01/2006 नंतर जन्मलेले परंतु 20 वर्षे वयोमर्यादेपेक्षा जास्त असलेले खेळाडू पात्र नाही.


क)    राज्यस्तर चाचणी सरळ प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम.

 हॅण्डबॉल या खेळाकरीता चाचणी दि.04 ते 05 मे,2026 स्थळ- क्रीडा प्रबोधिनी नागपूर.

हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन (अनिवासी ठाणे करीता), हॉकी- छत्रपती संभाजीनगर करिता चाचणी दि.04 ते 05 मे,2026 स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे- 45.

ॲथलेटिक्स, शुटींग, सायकलिंग (थेट राज्यस्तर) - खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र- (ॲथलेटिक्स करीता- छत्रपती संभाजीनगर) स्थळ - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे- 45 चाचणी दि.11 ते 12 मे,2026.

फुटबॉल-  सरळ प्रवेश – दि.15 ते 16 मे,2025 व फुटबॉल – कौशल्य चाचणी- दि.17 ते 18 मे,2026 स्थळ - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे

शुटींग (थेट राज्यस्तर) – खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र- दि.18 ते 19 मे,2026 शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे


राज्यस्तर खेळ निहाय कौशल्य चाचणी वेळापत्रक

हॅण्डबॉल- चाचणी दि.06 ते 07 मे,2026, स्थळ- क्रीडा प्रबोधिनी, नागपूर.

 हॅण्डबॉल, जलतरण, सायकलींग, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, बॅडमिंटन (अनिवासी ठाणे करीता), हॉकी- छत्रपती संभाजीनगर करिता चाचणी दि.06 ते 07 मे,2026, स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे 


बालेवाडी, पुणे

 ॲथलेटिक्स, शुटिंग, सायकलींग खेलो इंडिया निपुणता केंद्र, पुणे, ॲथलेटिक्स छत्रपती संभाजीनगर करिता- चाचणी करीता चाचणी दि. 11 व 12 मे,2026, स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे

क्रीडा प्रबोधिनी मध्ये खेळाडूंच्या रिक्त पद संख्या –

राज्यातील क्रीडा प्रबोधिनी मध्ये खेळ निहाय रिक्त पदांची रिक्त संख्या तसेच खेळाडूंची क्षमता, कौशल्य विचाारात घेवून प्रवेश देण्यात येईल. निवडण्यात येणा-या खेळाडूंना राज्यातील कोणत्याही क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण स्थळ हे क्रीडा संचालनालय स्तरावर निश्चित करण्यात येईल. त्यानुसार प्रवेश सबंधित क्रीडा प्रबोधिनी मध्ये घेणे आवश्यक राहील.

सर्वसाधारण सूचना  -

सदर चाचण्यांकरीता येणा-या खेळाडूंनी स्वत: निवास, प्रवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे.

सदर चाचण्यांकरीता येणा-या खेळाडूंनी सबंधित स्पर्धेचे प्राविण्य/ सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, आधार कार्ड इत्‍यादी मूळ कागदपत्रे चाचणी स्थळी आणणे बंधनकारक आहे.


गुगल लिंक बाबत :-

गुगल लिंक मध्ये नोंदणी करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२६ आहे. तद्नंतर नोंदणी केलेल्या खेळाडूंची यादी खेळ व चाचणी निहाय संबंधित विभागीय उपसंचालक यांना पाठविण्यात येणार आहे.


जे खेळाडू गुगल लिंकवर नाव नोंदणी करणार नाहीत अश्या खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड येथे नांव नोंदणी करावेत, जेणे करुन सदरचे खेळाडूं ऐनवेळी चाचणीच्या दिवशी उपस्थित राहिल्यास अश्या खेळाडूना चाचणी देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल.


 क्रीडा प्रबोधिनी करिता घेण्यात येणाऱ्या चाचण्या विभाग व तद्नंतर राज्यस्तरावर आयोजित केल्या जाणार आहेत.

https://forms.gle/aqnpWXJKP2wsMVpdA

               

या करीता या कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर प्रसिध्दी व अर्ज संकलन करणेकरीता जिल्हयातील खेळाडूंनी आपले विहित नमुन्यातील अर्ज, जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरी बाबत आवश्यक कागदपत्रे ( क्रीडा प्रमाणपत्रे,/ आधारकार्ड/ जन्म दाखला इत्यादी) माहितीसह अर्ज  दि. 22 एप्रिल,2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे सादर करावेत. व अधिक माहितीकरीता श्री. राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) यांचेशी संपर्क साधावा असे  महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.

0000000

वृत्त क्रमांक

विकास कामांना गती देऊन दर्जेदार सेवा तत्परतेने पुरवा - पालकमंत्री अतुल सावे

महापालिकेच्या 100 दिवस कृती आराखड्याचा घेतला आढावा

नांदेड, दि.१७ एप्रिल :- नांदेड शहरातील विकास कामांना गती देऊन शहरातील नागरीकांना मुलभुत नागरी सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचे कौतुक करुन दर्जेदार सेवा वेळेत देणे, डिजिटल क्लासरुम, महिलांसाठी शौचालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळास्थळी त्यांच्या कविता लावाव्यात, शहर स्वच्छतेसाठी आवश्यकतेनुसार वाहणे व मनुष्यबळामध्ये वाढ करणे, पूर्ण क्षमतेने डोर टु डोर कचऱ्याचे संकलन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजण कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात महानगरपालिकेच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा आराखड्यात विविध कामांमध्ये समावेश असलेल्या कामांचा व पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी महापौर सौ.कविता संतोष मुळे, पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते ॲड महेश कदकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नांदेड शहरातील नागरिकांना १०० दिवसांच्या कृती अराखड्याच्या माध्यमातुन दर्जेदार सेवा ह्या विहीत वेळेत प्राप्त व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतांना या कृती आराखड्याचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. या कृती आराखड्याच्या माध्यमातुन होऊ घातलेल्या घरोघरी स्वच्छता, आपत्ती सौम्यीकरण, डीप क्लीनिंग, गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करणे, पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील सुधारणा, अत्याधुनिक गॅस शव दाहीणी, मुख्य चौकातील सुशोभीकरण, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणे, महिलांसाठी शौचालय उभारणे, अत्याधुनिक वाहतुक व्यवस्था, इलेक्ट्रीक चार्जर स्टेशन, धोकादायक विद्युत वाहीणी भुमिगत करणे, आरटीएस अंतर्गत ७४ सेवा ऑनलाईन इत्यादी उपक्रमांचे पाकमत्र्यांनी कौतुक करुन महापालिकेच्या कामाची प्रशंसा केली.

दरम्यान, बैठकीत महापालिकेच्या विविध विभागांच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. शहरातील प्रस्तावित उड्डान पुले, वाहतुक नियोजन, स्टेडीयम उभारणी, मल्टीपार्कींग, पालिका शाळांचे अद्यावतीकरण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

चौकट

शहरातील नागरीकांना दर्जेदार सेवा विहीत वेळेत प्राप्त व्हाव्यात, यासाठी विकासकामांना गती देण्याच्या सुचना देऊन महापालिका राबवित असलेला १०० दिवसांचा कृती आराखडा हा अगदी स्तुत्य उपक्रम असुन शहर विकासाशी संबंधित कामांमध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिले.

00000






वृत्त क्रमांक

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; 

जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

नांदेड, दि. 17 एप्रिल :- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली असून सर्व विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात वेळोवेळी जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांदरम्यानही महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अनेक संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

19 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जातो. या काळात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही बालविवाह घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने दक्ष राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक

नांदेड तालूक्यातील विकास कामाचा दोन्ही आमदार यांनी घेतला आढावा

नांदेड,१७ एप्रिल:- नांदेड तालुक्यात शासकिय कामे प्रामुख्याने तात्काळ निकाली काढण्यासाठी  नांदेड उत्तर विधानसभा मतदारनसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर व  नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव तिडके बोंढारकर यांच्या अध्यक्षेखाली  तालूक्यातील  सर्व  तालुका स्तरीय अधिकारी,तालूका कार्यालय प्रमुख विभाग यांचा महत्वाच्या विषयावर आढावा घेतला व अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या.

विशेषता मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते, अन्न नागरी पुरवठा, सामाजिक सुरक्षा योजना,पाणी टंचाई,SIR, वीज पुरवठा , कृषी विषयक बाबी,खत बी बियाणे पुरवठा,छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व शिबिर अभियान,नैसर्गिक आपत्ती अनुदान,विशेष सहाय्य अनुदान वाटप,ई फेरफार,जलजीवण पाणीपुरवठा,महावितरण,कायदा व सुव्यवस्था अदि विषयावर आढावा घेतला दोन्ही आमदार महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगले व व्यवस्थित काम करण्याची सूचना दिली नांदेड तालुक्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये असे पहावे व इतर काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे सांगितले.

बैठकिस उप विभागीय अधिकारी डाॅ.सचिन खल्लाळ,तहसिलदार नांदेड संजय वारकड,उप विभागिय पोलिस अधिकारी नांदेड शहर,इतवारा ,गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर,उप अधिक्षक भूमिअभिलेख,मृदणव जलसंधारण,तालूका कृषी अधिकारी,पुर्णा पाटबंधारे ,ग्रामीण पाणी पुरवठा,गट शिक्षण अधिकारी,पोलिस निरिक्षक शिवाजीनगर,लिंबगांव,नांदेड ग्रामिण,इतवारा,विमानतळ,नायब तहसिलदार सुनिल माचेवाड,संजय नागमवाड,नितिशकुमारनबोलेलू,इद्रजित गरड व तालूक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

००००००



वृत्त क्रमांक

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी: 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

नांदेड दि. 17 एप्रिल:- राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' (KCC) मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी (खेळते भांडवल) आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाईल. दूध संस्थेने हमी दिल्यास ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. तसेच, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडीट कार्ड आहे, त्यांनाही ३ लाखांपर्यंतची पतमर्यादा वाढवून घेता येईल.

कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ३ टक्के आणि राज्य शासनाच्या ११ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार ४ टक्के अशी एकूण ७ टक्के पर्यंत व्याज सवलत मिळू शकते. बँकांनाही यात २ टक्के व्याज सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालक / शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शून्य टक्के व्याजदराचाही लाभ घेता येऊ शकतो. सन २०२६-२७ पासून 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' (राज्य व जिल्हास्तर) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या क्रेडिट कार्डद्वारे खेळते भांडवलाचा लाभ घेता येईल. राज्यातील १० लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाने ठेवले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात अथवा 1962 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा.

जे पशुपालक दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद आहेत व ज्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही, असे सर्व शेतकरी या मोहिमेसाठी पात्र आहेत. जिल्ह्याचे 'पशुसंवर्धन उपआयुक्त' या योजनेचे सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. सद्यस्थितीत पशुपालन करणाऱ्या ज्या पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा पात्र पशुपालकांना या योजनेंतर्गत लाभ घेता येईल. 

पात्रता

प्रकल्प धारकाने केंद्र/राज्य शासन/जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभघेतलेला नसावा.

पशुपालन प्रकल्पांमधील सर्व पशुधनाची एनडीएलएम (भारत पशुधन) पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.

व्याज परतावा सवलत पुढीलप्रमाणे कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांनाच अनुज्ञेय राहिल.

।. २५,००० मांसल कुक्कुट पक्षी / ५०,००० किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी

॥. ४५,००० किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट

III. १०० किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा

IV. ५०० किंवा त्यापेक्षा कमी मेंढी / शेळी गोठा

V. २०० किंवा त्यापेक्षा कमी वराह

पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणे आवश्यक राहील.

सदर योजनेच्या निकषाप्रमाणे तसेच, त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलास अनुसरुन आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे लाभार्थ्यांस बंधनकारक असेल.

“पशुधनाच्या संगोपनासाठी आर्थिक अडचण भासू नये, तसेच ग्रामीण भागात पशुधन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी जास्तीत जास्त पात्र पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा दूध संस्थेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.”

डॉ. किरण पाटील, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे 

00000

वृत्त क्रमांक

नाळेश्वर महसुल मंडळात महाराजस्‍व समाधान शिबीर संपन्न 

शिबिराच्या माध्यमातून मिळतोय विविध योजनांचा लाभ- आमदार कल्याणकर

नांदेड दि. 17 एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला एकाच ठिकाणी मिळत आहे, असे मत नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी व्यक्त केले.   

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एक अंतर्गत नांदेड तालुक्यातील नाळेश्वर महसूल मंडळात आज 17 एप्रिल रोजी नाळेश्वर येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार कल्याणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण मुंडे, लिंबगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरी बोधनकर, नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड, नायब तहसीलदार निवडणूक इंद्रजीत गरड, सरपंच उषाताई वाघ,  नरहरी वाघ, पंढरी पाटील बोकारे, नारायण पाटील कदम खडकीकर, अनिल पाटील क्षीरसागर, संतोष भारसावडे, धनंजय पावडे, नवनाथ काकडे, वैद्यकीय अधिकारी रहाटी डॉ.राठोड, मंडळ कृषी अधिकारी सानप ,पोलीस उपनिरीक्षक पोफळे, अनुलोमचे पांडुरंग बुद्धेवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 आमदार कल्याणकर पुढे बोलताना म्हणाले की, महाराजस्‍व समाधान शिबिरात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येऊन विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. जनतेला याचा फायदा होत आहे. 

कार्यक्रमाचे आरंभी जिल्हा परिषद नाळेश्वर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. उपविभागीय अधिकारी नांदेड डॉ.सचिन खल्लाळ यांनी विविध विभागांचे स्टॉल लावून योजना सामान्य पर्यंत पोहचत असल्याने नागरिक आणि प्रशासन यांच्‍या मधील नाळ अधिक घट्ट होत असल्याचे सांगितले.  

या कार्यक्रमात 180 शेतकऱ्यांना सातबारा व 180 शेतकऱ्यांना 8-अ चे  दाखले वाटप करण्यात आले. तसेच उत्पन्नाचे-65, रहिवासी-140, जातीचे-60 प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी योजनेच्या-16  लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या कार्यक्रमात विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते त्यात प्रामुख्याने महसूल विभाग, निवडणूक विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, कृषी विभाग, महिला व बाल विकास प्रकल्प विभाग, पुरवठा विभाग,आरोग्य विभाग, विशेष सहाय्य विभाग, आपले सरकार सेतू केंद्र, ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख विभाग, शिक्षण विभाग व अनुलोम सामाजिक संस्था यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ दिला. या कार्यक्रमास नाळेश्वर महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी कुणाल जगताप, ग्राम महसूल अधिकारी मारोती कदम, राजेश बरोडा, अंकुर सकवान, महेश जोशी, गजानन होळगे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच सुनीता परोडवाड, प्रितीका  मुडगुलवार, प्रतिभा मारतळेकर, संतोष वाघमारे, अनुलोमचे कृष्‍णा इंगळे, मंडळ अधिकारी रूपाली वाठोरे, श्रीकृष्ण ऐलमटे , प्रमोद बडवणे, शिवाजी तोटरे, मारुती जमदाडे, मनोज सरपे, रमेश गिरी, माधव भिसे, मारुती श्रीरामे व तालुक्यातील सर्व महसूल सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसुल अधिकारी अश्विनी गिरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी नाळेश्वर कुणाल जगताप यांनी मानले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000




विशेष वृत्त क्रमांक

श्रीक्षेत्र माहूरगड येथे विकासकामांना गती ; भाविकांसाठी दर्जेदार सुविधांवर भर – पालकमंत्री अतुल सावे

विविध विकास कामांची केली पाहणी व घेतला आढावा

नांदेड, दि. 16 एप्रिल :- श्रीक्षेत्र माहूरगड येथे सुरू असलेल्या विकासकामांमधून भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून नियोजनबद्ध कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

आज माहूर येथे श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनीतचंद्र दोन्तुला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

माहूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे भाविकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विकासकामांना गती देण्याच्या सूचना पालकमंत्री अतुल  सावे यांनी दिल्या. तसेच या पवित्र स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असून अडचणी तात्काळ सोडविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री श्री.सावे यांनी श्री रेणुका देवी मंदिर परिसर, मातृतीर्थ कुंड, पर्यटक सुविधा केंद्र, वाहनतळ तसेच इतर पायाभूत सुविधांच्या पहिल्या टप्प्यातील कामांचा सविस्तर आढावा घेतला. यासोबतच दुसऱ्या टप्प्यातील श्री दत्त मंदिर व शिखर परिसर, श्री अनुसया देवी मंदिर, कैलास टेकडी, श्री महादेव मंदिर, वनदेव मंदिर, कपिलेश्वर मंदिर, विविध दर्गे, बौद्ध विहार, जमदग्नी कृषी मंदिर, गणपती मंदिर परिसर तसेच पोचमार्ग विकास, वन विभाग व पुरातत्व विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. एकूण सुमारे 829.13 कोटी रुपयांच्या विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.

यापूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले तसेच श्री दत्तशिखर संस्थानास भेट देऊन महंत धनेश्वर भारती (योगी श्याम भारती महाराज) यांची भेट घेतली. तसेच परमपूज्य मधुसुदनजी भारती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले.

दरम्यान, बैठकीत आदिवासी विभागाच्या विविध योजनांचाही आढावा घेण्यात आला. किनवट येथील रेल्वे उड्डाणपूल प्रस्ताव, वीजपुरवठा समस्या, कापूस जिनिंग युनिट विस्तार, प्राथमिक आरोग्य केंद्रांची प्रगती, गोदाम उभारणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

०००००










  "    वृत्तपत्रीय टिप्पणी    "   "   शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य  चाच...