Friday, May 15, 2026

वृत्त क्रमांक 

सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड, दि. 15 मे :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 18 मे 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी 

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांचे आवाहन 

नांदेड दि. 15 :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रूपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्याची आवश्यकता आहे.  

नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन गुरुवार 16 मे 2026 रोजी साजरा होत आहे. 2026 या वर्षीचे  घोषवाक्य  डेग्यु नियंत्रणासाठी लोकसहभाग : साठलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकूण ठेवा असे आहे. नागरिकांमध्ये जागरुकता आणून डासांपासून होणाऱ्या डेंग्यू आजारास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. सिंमेट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंटया, घरातील शोभेच्या कुंडया, निरउपयोगी वस्तू, टायर्स व कुलर ईत्यादी. जास्त दिवस साठलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळी दिडशे ते दोनशे अंडी घालते व यातून या डासाचा मोठा फैलाव होतो. 

डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्ततपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे. 

नांदेड जिल्ह्यात मागील तीन वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. ( घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन 2023- (1490) 292 (निरंक). सन 2024  (1302) 297 (निरंक). सन  2025 -(1039) 161 (निरंक) तर एप्रिल 2026 अखेर- (208) 09 (निरंक). 

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरुन झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑइल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे. 

नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांनी केले आहे.

00000

 

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात 16 मेपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात

नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 15 मे : नांदेड जिल्ह्यात जनगणना 2027 अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला 16 मेपासून प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरी प्रगणक आणि पर्यवेक्षक भेट देणार असून नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी शक्यतो सकाळी व सायंकाळी जनगणनेची कामे पूर्ण करावीत, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही, अशी सूचनाही त्यांनी दिली.

तसेच, घरी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांशी ‘अतिथी देवो भवः’ या भावनेतून वागून त्यांना पाण्याची विचारपूस करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी नागरिकांना केले. उद्यापासून सुरू होणाऱ्या जनगणनेसाठी त्यांनी सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना शुभेच्छा दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी किरण अंबेकर, सहायक संचालक जनगणना कार्यालय मुंबई बी. प्रसाद, जिल्हा जनगणना समन्वय अधिकारी नेहाल धुरंधरे आणि तहसीलदार (महसूल) तथा जिल्हा जनगणना कक्ष प्रमुख विपिन पाटील यांनीही ग्रामीण भागात काम करणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांनी उन्हापासून संरक्षणाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 

शेतकरी, सामान्य नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवा- महापौर कविता मुळे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न ; 

मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

नांदेड, दि. 15 मे : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, सामान्य नागरिक तसेच विविध घटकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम सुरू आहे. या अभियानामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळत असून शासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन नांदेडच्या महापौर कविता मुळे यांनी केले.

नांदेड तहसील कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, उपमहापौर दीपकसिंह रावत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर कविता मुळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. त्याच प्रेरणेने महसूल विभाग आणि इतर शासकीय यंत्रणा नागरिकांची कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्याचे काम या अभियानातून प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार आनंदराव बोंढारकर यांनी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की, शासनाने नागरिकांना थेट लाभ देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख निर्णय घेतले जात असून या शिबिरांमुळे नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवले जात आहेत. लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ तत्काळ देण्यात येत असल्याने प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले की, नांदेड तहसील कार्यालयाने आतापर्यंत आठ मंडळांमध्ये महाराजस्व समाधान शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून अधिकारी थेट गावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना सेवा आणि योजनांचे लाभ देत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि कार्यालयीन त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला असून आतापर्यंत सुमारे २५ हजार लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

एजंटांच्या माध्यमातून नव्हे, थेट प्रशासनाशी संपर्क साधा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणत्याही मध्यस्थ किंवा एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले. प्रशासनाकडून थेट सेवा देण्यावर भर दिला जात असून नागरिकांनी अधिकृत माध्यमातूनच अर्ज आणि संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात “आपले सरकार सेवा केंद्र” अधिक सक्षम करण्यात येत असून ग्रामपंचायत स्तरावर सुमारे ५०० सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना तालुका किंवा जिल्हा स्तरावर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.

शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा योग्य आणि उत्पादनक्षम वापर करावा, असे आवाहन करताना त्यांनी ट्रॅक्टरसोबत श्रेडर मशीनचा वापर केल्यास शेतीत अधिक फायदा होईल, असे सांगितले. तसेच रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचेही त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचे लाभ उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत आहे. महसूल विभागाने अशा प्रकारची शिबिरे सातत्याने आयोजित करावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी सांगितले की, आतापर्यत नांदेड तालुक्यात विविध महसूल मंडळामध्ये 8 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून आजचे 9 वे शिबिर हे शेवटचे अंतिम शिबिर आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना विविध विभागचे लाभ त्यांच्या गावात जावून देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना तहसिल कार्यालयात कामासाठी फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये यासाठी नांदेड तहसील कार्यालय पूर्णपणे डिजिटल करण्यात आले असून प्रत्येक सेवेसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिक हे क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलवरूनच विविध सेवांची माहिती सहज मिळवू शकतात. मागील दहा महिन्यांत सुमारे ३९ हजार नागरिकांना घरबसल्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी नांदेड केंद्राच्या निवेदिका  राजश्री मिरजकर यांनी केले. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डिजिटल सातबारा उपलब्ध करून देणाऱ्या क्यूआर कोड सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विविध योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, साहित्य आणि इतर लाभांचे वितरण करण्यात आले.

नांदेड तालुक्यात आतापर्यत तुप्पा, लिंबगाव, विष्णूपुरी, नाळेश्वर, नांदेड ग्राामीण, वाजेगाव, तरोडा बु, वसरणी, नांदेड शहर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान  शिबिरात एकूण वितरीत प्रमाणपत्रे व देण्यात आलेल्या महसूलसह इतर विभागांच्या सेवा याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

फेरफार-3 हजार 804, सातबारा दुरुस्ती व निकाली-244, डिजीटल सातबारा-7 हजार 557, आठ-अ- 6 हजार 443, विविध प्रमाणपत्रे- 6 हजार 389, इतर अर्जावर निर्णय-474, भूसंपादन कमी जास्त प्रमाणपत्र-19, कृषी प्रकरणात केलेले कमी जास्त पत्रक-75, जिवंत सातबारा मोहिम उपलब्ध कागदपत्र-182, ॲग्रीस्टॅक कार्ड-296 असे एकूण 25 हजार 487 प्रमाणपत्र व सेवा उपलबध करुन देण्यात आल्या. 

याशिवाय आयुष्यमान भारत कार्ड 1 हजार 349, आरोग्य तपासणी 2 हजार 610, कृषी ट्रॅक्टर वाटप- 38, रोटाव्हेटर-4, कल्टीवेटर- 3 इत्यादीचे वितरण या शिबिरांच्या माध्यमातून करण्यात आले. 

00000














वृत्त क्रमांक   सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन   नांदेड , दि. 15 मे :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी...