Thursday, April 30, 2026

वृत्त क्रमांक 

समाज कल्याण कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न

नांदेड दि. 1 मे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेडच्या प्रांगणामध्ये 1 मे महाराष्ट्र दिनानिमीत्त समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सकाळी 7.30 वा. ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात सुरुवातीला वंदे मातरम गीत घेण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण व राष्ट्रगीत घेण्यात आले. यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व राज्य गीत घेण्यात आले. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथील समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हा जात पडताळणी कार्यालय, इतर बहुजन कल्याण कार्यालय व समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असणाऱ्या विविध महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यानंतर महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपस्थितांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांनी शुभेच्छा दिल्या.
000000

वृत्त क्रमांक 

बारावी परीक्षेचा निकाल 2 मे रोजी होणार जाहीर    

नांदेड दि. 1 मे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार २ मे २०२६ रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते  

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

https://www.tv9marathi.com

https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-

12-results. 

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे डिजीलॉकर ॲप Digilocker App मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 

निकालाबाबत अन्य तपशील

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत: च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. 

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छाया प्रतीसाठी रविवार 3 मे 2026 ते रविवार 17 मे 2026 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card / UPI / Net Banking याद्वारे भरता येईल. 

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. 

जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्याच्या तारखांचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील 

पात्र लाभार्थ्यांचा कला सादरीकरण कार्यक्रम

नांदेड दि. 1 मे :- जिल्हा परिषद विभागाच्यावतीने राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना सन 2023-24, 2024-25 व 2025-26 मधील पात्र लाभार्थ्यांचा कला सादरीकरण कार्यक्रम  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 4 ते 8 मे 2026 कालावधीत तालुकानिहाय सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर वृद्ध कलावंताची अंतिम निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजनेचे सदस्य सचिव यांनी केले आहे. 

तालुका निहाय सादरीकरणाचा तपशील पुढीलप्रमाणे राहील. सोमवार 4 मे 2026 रोजी अर्धापूर, मुदखेड, नांदेड, भोकर. मंगळवार 5 मे रोजी नायगाव, बिलोली, उमरी, हिमायतनगर. बुधवार 6 मे रोजी लोहा, कंधार, देगलूर, मुखेड तर गुरुवार 7 मे रोजी हदगाव, किनवट, माहूर, धर्माबाद याप्रमाणे राहील. या सादरीकरणास काही करणामुळे येऊ न शकलेल्या सर्व तालुक्यातील लार्थ्यांसाठी शुक्रवार 8 मे 2026 रोजी राखीव राहील. 

000000

विशेष वृत्त 

जिल्ह्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी सदैव कटिबध्द :  पालकमंत्री अतुल सावे

 

·         महाराष्ट्र स्थापनेचा 67 वा स्थापना दिन  उत्साहात साजरा

·         नागरिकांना जनगणना 2027 मध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन

·         जिल्ह्याला प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 813 कोटी रुपये मंजूर व वितरण

·         हिट वेव्हच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना काळजी घ्यावी

·         उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार  

नांदेड दि. 1 मे :- केंद्र व राज्य शासनाकडून समाजातील सर्व घटकांचा विचार करून विविध कल्याणकारी योजना राबविण्यावर नेहमीच भर आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, रोजगार, आरोग्य यासह सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. विकसित भारत 2047 अनुषंगाने वाटचाल करुन सर्वांगीण विकास व जनकल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.   

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी 8 वा. ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण,  महापौर कविता मुळे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर अन्य वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारस पत्नींची भेट घेतली. पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.    

देशात जनगणना 2027 चा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला आहे. या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत स्व-गणना 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होणार असून, घरांची नोंदणी 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महत्त्वाच्या अभियानात सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.  

यंदाचा ‘अर्थसंकल्प' हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदर्शी पाऊल आहे. हा अर्थसंकल्प राज्याच्या शेतकरी, महिला, युवक, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांना समर्पित आहे. विशेषत: शेतकरी कल्याणाला प्राधान्य देत हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात खरा बदल घडवणारा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत रुपये 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची मोठी घोषणा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारी आहे असे त्यांनी सांगितले.  

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूक्ष्म व प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याला प्रधानमंत्री पिक विमा योजना (खरीप हंगाम 2025-26) अंतर्गत 813 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून, लाभार्थ्यांना विमा रकमेचे वितरण सुरू आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट (हिट वेव्ह) निर्माण झाली आहे. सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 या वेळेत कष्टाची कामे टाळावीत. तसेच उष्माघाताची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन पालकमंत्री सावे यांनी केले.  

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2026 च्या मान्सूनवर 'एल-निनो' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.  

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध विभागाच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.  

यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार नागेश देवराव कंकाळ, नागरी हक्क संरक्षण विभागाचे लिंगुराम बळीराम पोकलवार व महिला पोलीस शिपाई जयश्री विठ्ठल मुरकुटे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेले आदर्श ग्राम महसूल अधिकारी माधव कोंडजी पाटील यांना 5 हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र देवून सन्मान केला. महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाजसेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार सुरेखा किनगावकर, अर्चना झाडबुके यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. जिल्हास्तरीय युवक-युवती पुरस्कार लवकुश मधुकर जाधव व साधना कैलास गायकवाड यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व श्रीमती अंजली नातु यांनी केले.   

जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने सुरवातीला वंदे मातरम गीताचे व राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले.  यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर वैभव पडवळ, सेंकड इन कमांडर विजय कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात जलद प्रतिसाद दल, सशस्त्र पोलीस पुरुष पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक,  गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, गृहरक्षक दल पुरुष पथक, राष्ट्रीय छात्रसेना,  अग्नीशमन दलाचे पथक, पोलीस वाद्य पथक, डॉग स्काड युनिट,   बॉम्ब शोधक व नाशक पथक,  सर्व्हिलेन्स वाहन,  फोरेसिक वाहन, रुग्णवाहिका 108, अग्निशामक वाहन देवदूत यांचा पथसंचलनात सहभाग होता.   

तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

0000






























वृत्त क्रमांक

दिल्लीत महिला साहित्य संमेलन; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल 

नांदेड, दि. 30 : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे दि. 11 व 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात नांदेड जिल्ह्याच्या डॉ. शारदा चोंडेकर यांनी आपल्या काव्यप्रतिभेने ठसा उमटवला. महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या या संमेलनात विविध राज्यांतील महिला अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला. ‘जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा’ या ब्रीदाखाली झालेल्या या उपक्रमात साहित्य आणि प्रशासन यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

किनवट सारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम भागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शारदा चोंडेकर या संमेलनाच्या निमंत्रित प्रतिनिधी होत्या. बहिणाबाई चौधरी सभागृहात त्यांनी सादर केलेल्या काव्यमय अभिव्यक्तीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या साहित्यकृतीतून उमटलेले संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले विचार विशेष लक्षवेधी ठरले. त्यांच्या सहभागामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर ठळकपणे अधोरेखित झाले.

या संमेलनात देशभरातील महिला शासकीय अधिकारी सहभागी झाल्या होत्या. प्रशासनात कार्यरत असलेल्या महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात सरहद संस्था व नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त सचिव श्रीमती आर विमला यांनी केले होते. ग्रंथदिंडी, चर्चासत्रे, प्रकट मुलाखती आणि कविसंमेलने अशा विविध उपक्रमांद्वारे उत्साहात संपन्न झाले.

या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्ष लीना मेहेंदळे, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सरहद, पुणे’ आणि सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या पुढाकारात राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्त्री-अधिकाऱ्यांच्या साहित्य निर्मितीतून प्रशासन अधिक संवेदनशील, सृजनशील आणि लोककल्याणकारी होऊ शकते, हा विचार केंद्रस्थानी होता.

सरकारी कामाच्या धकाधकीतही सर्जनशीलता जपणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरले. ग्रंथदिंडीपासून कविसंमेलनांपर्यंत विविध कार्यक्रमांनी या साहित्यिक मेळाव्याला वेगळी उंची दिली. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने मराठी वाङ्मय इतिहासात त्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.

 नांदेडचे प्रतिनिधित्व ठरले लक्षवेधी 

डॉ. शारदा चोंडेकर यांच्या प्रभावी काव्यसादरीकरणामुळे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विशेष लक्षवेधी ठरले. प्रशासन आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी साधलेला समतोल हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

00000



वृत्त क्रमांक 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 30 एप्रिल :- राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे 1 मे 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 1 मे 2026 रोजी पुसद येथून मोटारीने सायं 5.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6.25 वा. नांदेड विमानतळ येथून पुणे विमानतळाकडे विमानाने प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात धरती माता बचाव निगराणी समितीची स्थापना 

नांदेड दि. 30 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार व कृषि आयुक्तालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी  राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली 29 एप्रिल रोजी धरती माता बचाव अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय धरती माता बचाव निगरणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकी रसायनिक खतांच्या अतिरिक्त वापर आणि बिगर कृषि कारणासाठी होणाऱ्या रसायनिक खत वापरावर लक्ष ठेण्याकरिता ग्रामस्तरावरील ग्राम कृषि विकास/धरती माता बचाव निगरणी समिती मार्फत गाव पातळीवर कळविण्यात आले आहे. तालुका/उपविभागस्तरावर धरती माता बचाव निगरणी समिती स्थापन करुन प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर नियमीत ग्रामसभा होत आहेत किंवा नाही याच्यावर लक्ष ठेवेल. 

रासायनीक खतांचा वापर वाढत असल्याचे दिसुन आले आहे, याचे एक कारण म्हणजे शेतकऱ्यांमध्ये खतांच्या काटकसरीने वापराबाबत जागरुकता नसणे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यापक बहूस्तरीय यंत्र प्रस्तावीत आहे. या यंत्रणेला धरती माता बचाव अभियान ज्यामध्ये गाव, उपव‍िभाग आणि जिल्हा सम‍ित्या असतील त्याव्दारे योजनेची प्रभावी जागरुकता न‍िर्माण करण्याची गरज आहे. 

जिल्ह्यामध्ये धरती माता बचाव अभियान अंतर्गत बागायत क्षेत्र व खताचा जास्तीचा वापर असणाऱ्या ग्रामपंचायत स्तरावर 100 गावांची निवड करण्यात आलेली असुन सदर निवडलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतमार्फत धरतीमाता बचाव निगराणी समितीची बैठक घेऊन रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी व बिगर कृषि कामासाठी वापर न होण्याकरिता कृषि विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ व समिती सदस्यद्वारे गावपातळीवर प्रचार व प्रस‍िद्धी करणे. रासायनिक खताचा जास्तीचा वापरावर लक्ष ठेवून असा प्रकार होत असल्यास तो वेळीच तालुका व जिल्हापातळीवरील संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.आर. कळसाईत, कृषि विकास अधिकारी डॉ. निलकुमार तवडे, डॉ. देविकांत देशमुख, डॉ. प्रविण चव्हाण  प्रमुख शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, सचिन कपाळे मोहीम अधिकारी,  अमोल पेकम जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, बजरंग कापसे आर. सी. एफ. कंपनी जिल्हा प्रतीनिधी, अतुल लहाने कोरेामंडल ली. खत कंपनी जिल्हा प्रतिनीधी  उपस्थित होते.

000000

 जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास भेट ; विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी नांदेड, दि. 13 मे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यां...