Monday, June 8, 2026

वृत्त क्रमांक 

कृष‍ि विभागाची धडक कारवाई

अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

नांदेड दि.८ जून:- भोकर तालुक्यातील मौजे बल्लाळ तांडा येथे अनधीकृतरित्या डयुपलीकेट रासायनीक खते (20:20:013)विक्री करत असल्याची गोपनीय माहीती जिल्हा व विभागीय विभागीय भरारी पथक भरारी पथकास मिळाली. त्यानुसार बालाजी माणिका करंडेकर राहणार भोकर या आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन भोकर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बल्लाळ तांडा ता. भोकर जि. नांदेड येथे श्रीदेव लक्ष्मण चव्हाण यांच्या घरासमोर अनधीकृतपणे बेकायदेशीररित्या व विना ई-पॉस व्दारे भेसळयुक्त रासायनीक खत विकत असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी असलेली अशोक लीलॅड MH-26/ BE9407 या गाडीमध्ये भेसळयुक्त रासायनीक खत एनपीके (20:20:013) एकुण 60 बॅग प्रत्येकी वजन 50किलो ग्रॅ.किंमत 1800/- रुपये प्रती बॅग असे एकुण 108000/- व गाडीची आंदाजे किंमत 600000/- असा एकुण 708000/-किंमतीचा मुददेमाल करुण पोलीस स्टेशन भोकर येथे जमा करण्यात आला आहे.

सदरील कार्यवाही विभागीय कृष‍ि सहसंचालक कार्यालयातील गुणन‍ियंत्रण तंत्र अध‍िकारी बालाजी मुंडे, जिल्हास्तरीय भरारी पथकातील पथक अध्यक्ष सचीन कपाळे, मोहिम अध‍िकारी जिल्हा परीषद,नांदेड, ज‍िल्हा भरारी पथकातील सदस्य सचीव अमोल पेकम, जिल्हा गुणवत्ता न‍ियंत्रण निरीक्षक, तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव, भोकर पंचायत समितीचे कृष‍ि अध‍िकारी(गुन‍ि)संदीप कोसकेवार, भोकर कृष‍ि अध‍िकारी कार्यालयातील गुणनियंत्रण निरिक्षक श्री पी.एम.कद्रेकर यांच्या पथकाने संयुक्त कार्यवाही केली.

जिल्ह्यामध्ये रासायन‍िक खतांची जादा दराने विक्री होत असल्यास क‍िंवा विनापरवाना विक्री होत असेल अथवा खते उपलब्ध असतांना व‍िक्री करत नसल्यास तात्काळ कृषी विभागाकडे संपर्क साधावा, परवानाधारक कृषि निविष्ठा केंद्रातूनच निविष्ठा खरेदी कराव्यात असे आवाहन कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

००००००

वृत्त क्रमांक 

अल-निनोच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाच्या

गावोगावी 13 हजार गाव बैठकांचे आयोजन 

नांदेड, दि. 8 जून : उत्पन्न आणि उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी कृषी विभागाने जनजागृती मोहिमेला वेग दिला आहे. यंदा मान्सूनवर ‘अल-निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात आहे.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 13 हजार जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या असून, एका सहायक कृषी अधिकाऱ्याने सरासरी 37 मोहिमा पूर्ण केल्या आहेत. या मोहिमा पुढेही सुरू राहणार असून, त्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या नियोजनानुसार प्रत्येक सहायक कृषी अधिकाऱ्याने किमान 50 मोहिमा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पेरणीपासून काढणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पेरणीपूर्व काळात प्रत्येक सहायक कृषी अधिकाऱ्याने दोन कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

गेल्या वर्षी खरीप पिके अंतिम टप्प्यात असताना अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली होती. यंदा पेरणीपूर्वीच ‘अल-निनो’चे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने कृषी विभाग अधिक सतर्क झाला आहे. संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध मोहिमा आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.

या कार्यशाळांचे आयोजन गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या सहभागाने सकाळी किंवा रात्री केले जात आहे. विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत.

बदलत्या हवामानाचा विचार करून पीक नियोजन, पीक पद्धतीतील बदल, पाणी व्यवस्थापन आणि इतर आवश्यक कृषी उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना संभाव्य हवामान बदलांचा सामना करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मोहिमांचे स्वरुप काय ?

शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य नियोजनाची जोड मिळावी याकरिता कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये पेरणी पुर्व मोहीम व पेरणी पश्चात मोहीमेचा समावेश आहे.

पेरणी पुर्व मोहीम :- माती परीक्षणाच्या आधारे कृषी निविष्ठाच्या वाजवी वापरासाठी मोहीम, टंचाई परिस्थितीत फळबागा वाचविणे व फळबाग लागवडीमध्ये सीआरए तंत्रज्ञानाचा वापर, अल निनो बाबत जागरुकता करणेसाठी शिवार फेरीचे आयोजन, घरगुती चाचणी पद्धतीने बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक मोहीम, बीज प्रक्रिया मोहीम, बीबीएफद्वारे उताराला आडवी पेरणीचा प्रचार व प्रसार करणे, सापळा पिकांची लागवड बाबत प्रचार व प्रसार करणे, शून्य/कमी मशागत पद्धत अवलंब करणे, खरीप हंगाम तयारी व प्रमुख खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गावनिहाय प्रशिक्षण, पाणी फौंडेशन डिजिटल शेतीशाळा बाबत प्रचार व प्रसिद्धी, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड प्रचार व प्रसिद्धी, महाविस्तार ॲप व कृषी विषयक माहिती तंत्रज्ञानाच्या साधने बाबत प्रचार व प्रसिद्धी.

पेरणी पश्चात मोहीम :- 

हिरवळीच्या खतांची निर्मिती, बायोफर्टीलायझर, बायोपेस्टीसाईड निर्मितीसाठी शेतावर फार्म लॅब स्थापन, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, जीवामृत, बिजामृत, घनजीवामृत यांसारख्या जैविक निविष्ठा निर्मिती करणेबाबत प्रचार प्रसिद्धी करणे,ऊस पाचट व्यवस्थापन,हुमणी कीड एकात्मिक व्यवस्थापन मोहीम,शंखी गोगलगाय निर्मुलन जनजागृती मोहीम,बोंड अळी एकात्मिक व्यवस्थापन मोहीम तसेच कार्यशाळा गावोगावी आयोजित करण्यात येत आहेत.

00000

वृत्त क्रमांक 

जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. ८ जून:- जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य असून शालेय विद्यार्थी आरोग्यदूत म्हणून गावागावांमध्ये आरोग्य जनजागृती घडवून आणतील आणि गावांचा कायापालट करतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित आरोग्यदूत प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सागर, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त एस. बी. खुणे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. राजाभाऊ गुट्टे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. शिवशक्ती पवार, डॉ. सलमा हिराणी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागात आजही अनेक नागरिक किरकोळ आजारांवर योग्य वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी अंगावर दुखणे काढण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्याविषयी प्राथमिक माहिती देणारी आरोग्यदूत संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आरोग्यदूत ही लोकचळवळ जिल्ह्यात आरोग्यसंपन्न समाज घडविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणाबरोबरच कृषी, पशुसंवर्धन, स्वच्छता, पोषण आहार याविषयी माहिती द्यावी. या उपक्रमातून प्रशिक्षित विद्यार्थी आपल्या कुटुंबात आणि गावात आरोग्यविषयक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतील, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्यदूत उपक्रमातून जनजागृतीसह वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना- मेघना कावली

ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध व्हावी, आरोग्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात आरोग्यदूत उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.

त्या म्हणाल्या, या उपक्रमाद्वारे गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती, मार्गदर्शन आणि लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्यदूतांच्या माध्यमातून विविध आजारांबाबत प्राथमिक माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छतेचे महत्त्व, पोषण, पशू व मानव आरोग्याशी संबंधित बाबी तसेच अपघात व आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर आणि विविध विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागरूकतेची व्यापक चळवळ उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थी व प्रशिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्यदूत या दोन मार्गदर्शक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले, तर आभार रेणुका दराडे यांनी मानले.

या प्रशिक्षण कार्यशाळेत शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी शिक्षण विषयक, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी कृषी विषयक, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले यांनी पशुसंवर्धन विषयक, तर जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेस जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुनेद सलीम, सुभाष खाकरे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

०००००





वृत्त क्रमांक 

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

नांदेड दि. 8 जून : जिल्ह्यात महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रीत) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 रविवार 14 जून 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जिल्ह्यातील 58 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रभारी पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.

या परीक्षा केंद्रापासून 500 मिटरच्या परिसरात रविवार 14 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या अधिकारी-कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॉपटॉप इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 500 मीटर पर्यंतच्या परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास, तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास, त्याचप्रमाणे वर दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 500 मीटर पर्यतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर व ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. 

0000

वृत्त क्रमांक 

ज्ञानभारतम अभियानासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित

घराघरांतील हस्तलिखित ग्रंथ, पोथ्या व दुर्मिळ साहित्याची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जाणार

नांदेड, दि. ८ जून : भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारशाचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयामार्फत ‘ज्ञानभारतम’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ‘हर घर दस्तक’ संकल्पनेनुसार घराघरांत उपलब्ध असलेल्या हस्तलिखित ग्रंथ, पोथ्या आणि तत्सम साहित्याची माहिती संकलित केली जाणार असून, नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सचिव, सांस्कृतिक विभाग व मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या १५ एप्रिल २०२६ रोजीच्या पत्रानुसार या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ‘ज्ञानभारतम’ योजनेचा उद्देश देशातील हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन आणि व्यापक प्रसार करणे हा आहे.

या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने देशभरातील एक कोटींपेक्षा अधिक हस्तलिखितांचा संग्रह करण्याचे लक्ष्य केंद्र शासनाने निर्धारित केले आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे.

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने ‘Gyan Bharatam’ हे विशेष मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून नियुक्त सर्वेक्षकांना विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, मंदिरे, मठ, ग्रंथालये आणि इतर अभिरक्षक संस्थांमधील हस्तलिखित संग्रहांचे क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरण करणे सुलभ होणार आहे.

‘हर घर दस्तक’ अभियानांतर्गत गावपातळीवर घराघरांशी संपर्क साधून वैयक्तिक संग्रहातील हस्तलिखित पोथ्या, ग्रंथ आणि इतर हस्तलिखित साहित्याची माहिती संकलित केली जाणार आहे. संबंधित साहित्याची माहिती ‘Gyan Bharatam’ मोबाईल ॲपवर स्कॅन करून अपलोड करण्यात येणार आहे.

भारताच्या अमूल्य ज्ञानपरंपरेचे जतन करण्याच्या या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 

दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई

भेसळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होणार; जिल्हास्तरीय पथकाकडून तपासणी मोहीम

नांदेड, दि. ८ जून : जिल्ह्यातील दूध उत्पादक, विक्रेते, सहकारी व खासगी दुग्ध प्रकल्प, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक तसेच संबंधित दुकानदारांची जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार असून, तपासणीत भेसळ आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष यांनी दिले आहेत.

दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली २ जून २०२६ रोजी दूध भेसळ प्रतिबंधक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील भेसळीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली.

समितीच्या माध्यमातून विशेष पथके तयार करून जिल्ह्यातील विविध दूध संकलन केंद्रे, दुग्ध प्रकल्प, विक्री केंद्रे आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता आणि शुद्धता तपासली जाणार आहे.

भेसळमुक्त व सुरक्षित अन्नपदार्थ नागरिकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

००००००

 वृत्त क्रमांक 

कपास क्रांती’ प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी गट व संस्थांनी ऑनलाइन अर्ज करावेत

कापूस उत्पादकता वाढीसाठी नवनिर्मिती केंद्र पुरस्कृत योजनेचे आवाहन

नांदेड, दि. ८ जून : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, कापूस पिकाची उत्पादकता व गुणवत्ता सुधारणे तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने नवनिर्मिती केंद्र पुरस्कृत “कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) – MCP” योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विविध पीक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत असून पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यंदा संभाव्य अल-निनो परिस्थितीचा विचार करून कपाशीची लागवड बेड पद्धतीने करणे तसेच मुलस्थानी जलसंधारण उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत क्लोजर स्पेसिंग (CS) पद्धतीने कापूस लागवड (९० x ३० सेमी.), सघन कापूस लागवड (HDPS) (९० x १५ सेमी.) तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन (ICM) (९० x ६० सेमी.) या तंत्रज्ञानांची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

एकात्मिक पीक व्यवस्थापनांतर्गत कपाशीसोबत मूग व उडीद या आंतरपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते तसेच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक विविधीकरणामुळे जोखीम कमी करण्यासही मदत मिळते.

क्लोजर स्पेसिंग आणि सघन कापूस लागवड तंत्रामुळे प्रति हेक्टर झाडांची संख्या वाढून अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता असते. तसेच संतुलित खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या योजनेसाठी अर्जाची सुविधा महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin) वर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्थांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

मागील दोन वर्षांत पीक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घेतलेल्या गटांची यावर्षी निवड करण्यात येणार नाही. तसेच शेतकरी गट किंवा कंपनीमधील फार्मर आयडीधारक सदस्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 

शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये; दुबार पेरणीचे संकट टाळण्याचे कृषी विभागाचे आवाहन

नांदेड, दि. ८ जून : खरीप हंगाम २०२६ मध्ये संभाव्य ‘अल-निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी त्याचे स्वरूप वादळी वाऱ्यासह अधूनमधून पडणाऱ्या सरींचे असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ जूनपासून जिल्ह्यात सरासरी चार पावसाचे दिवस नोंदविण्यात आले असून, सरासरी २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा ‘अल-निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पावसात मोठा खंड पडू शकतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत, म्हणजे किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

अपुऱ्या पावसाच्या आधारे पेरणी केल्यास बियाण्यांची उगवण बाधित होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाच्या शिफारशी व स्थानिक परिस्थितीनुसारच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रत्येक गावातील सहाय्यक कृषी अधिकारी गावनिहाय व्हॉट्सॲप गट आणि इतर संपर्क माध्यमांद्वारे पेरणीबाबत सल्ला देत आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील शेतकरी व्हॉट्सॲप गटांमध्ये सहभागी व्हावे तसेच ‘महाविस्तार’ ॲप डाउनलोड करून कृषीविषयक अद्ययावत माहितीचा लाभ घ्यावा, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता स्वतः तपासून पाहावी. तसेच शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करूनच पेरणी केल्यास पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल, असे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 

मोटार सायकल वाहनासाठी नवीन मालिका सुरु

नांदेड दि. 8 जून :- परिवहनेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26-DC ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज बुधवार 10 जून 2026 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. या अर्जासोबत संबंधीत पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डी.डी) सुध्दा सादर करावा. मुदतीनंतर व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास  10 जून 2026 रोजी दुपारी 4 वा. दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

अल-निनोच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाच्या

गावोगावी 13 हजार गाव बैठकांचे आयोजन 

नांदेड, दि. 8 जून : उत्पन्न आणि उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी कृषी विभागाने जनजागृती मोहिमेला वेग दिला आहे. यंदा मान्सूनवर ‘अल-निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात आहे.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 13 हजार जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या असून, एका सहायक कृषी अधिकाऱ्याने सरासरी 37 मोहिमा पूर्ण केल्या आहेत. या मोहिमा पुढेही सुरू राहणार असून, त्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या नियोजनानुसार प्रत्येक सहायक कृषी अधिकाऱ्याने किमान 50 मोहिमा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पेरणीपासून काढणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पेरणीपूर्व काळात प्रत्येक सहायक कृषी अधिकाऱ्याने दोन कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

गेल्या वर्षी खरीप पिके अंतिम टप्प्यात असताना अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली होती. यंदा पेरणीपूर्वीच ‘अल-निनो’चे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने कृषी विभाग अधिक सतर्क झाला आहे. संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध मोहिमा आणि कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.

या कार्यशाळांचे आयोजन गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या सहभागाने सकाळी किंवा रात्री केले जात आहे. विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत.

बदलत्या हवामानाचा विचार करून पीक नियोजन, पीक पद्धतीतील बदल, पाणी व्यवस्थापन आणि इतर आवश्यक कृषी उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना संभाव्य हवामान बदलांचा सामना करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मोहिमांचे स्वरुप काय ?

शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य नियोजनाची जोड मिळावी याकरिता कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये पेरणी पुर्व मोहीम व पेरणी पश्चात मोहीमेचा समावेश आहे.

पेरणी पुर्व मोहीम :- माती परीक्षणाच्या आधारे कृषी निविष्ठाच्या वाजवी वापरासाठी मोहीम, टंचाई परिस्थितीत फळबागा वाचविणे व फळबाग लागवडीमध्ये सीआरए तंत्रज्ञानाचा वापर, अल निनो बाबत जागरुकता करणेसाठी शिवार फेरीचे आयोजन, घरगुती चाचणी पद्धतीने बियाण्यांची उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक मोहीम, बीज प्रक्रिया मोहीम, बीबीएफद्वारे उताराला आडवी पेरणीचा प्रचार व प्रसार करणे, सापळा पिकांची लागवड बाबत प्रचार व प्रसार करणे, शून्य/कमी मशागत पद्धत अवलंब करणे, खरीप हंगाम तयारी व प्रमुख खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गावनिहाय प्रशिक्षण, पाणी फौंडेशन डिजिटल शेतीशाळा बाबत प्रचार व प्रसिद्धी, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड प्रचार व प्रसिद्धी, महाविस्तार ॲप व कृषी विषयक माहिती तंत्रज्ञानाच्या साधने बाबत प्रचार व प्रसिद्धी.

पेरणी पश्चात मोहीम :- हिरवळीच्या खतांची निर्मिती, बायोफर्टीलायझर, बायोपेस्टीसाईड निर्मितीसाठी शेतावर फार्म लॅब स्थापन, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, जीवामृत, बिजामृत, घनजीवामृत यांसारख्या जैविक निविष्ठा निर्मिती करणेबाबत प्रचार प्रसिद्धी करणे,ऊस पाचट व्यवस्थापन,हुमणी कीड एकात्मिक व्यवस्थापन मोहीम,शंखी गोगलगाय निर्मुलन जनजागृती मोहीम,बोंड अळी एकात्मिक व्यवस्थापन मोहीम तसेच कार्यशाळा गावोगावी आयोजित करण्यात येत आहेत.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शे...