Tuesday, August 4, 2026

वृत्त क्रमांक 

BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा ; 

अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

नांदेड, दि. ४ ऑगस्ट २०२६ : BH (भारत) सिरीज अंतर्गत नोंदणीकृत वाहनधारकांनी थकीत वाहन कर तातडीने भरावा, अन्यथा विशेष तपासणी मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, BH सिरीज वाहनांचा कर नोंदणीवेळी दोन वर्षांसाठी स्वीकारला जातो. त्यानंतर प्रत्येक दोन वर्षांनी वाहनाचा कर भरणे बंधनकारक आहे. कर भरण्याची मुदत संपल्यानंतर सात दिवसांचा ग्रेस पिरियड दिला जातो. त्यानंतरही कर न भरल्यास प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो.

कार्यालयाच्या संगणकीय अभिलेखांनुसार सध्या काही BH सिरीज वाहनांचा कर थकीत असून संबंधित वाहनधारकांनी विलंब न करता थकीत कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

थकीत कराची वसुली करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेडमार्फत लवकरच विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान थकीत कर असलेली वाहने आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंफरे यांनी कळविले आहे.

000000

वृत्त क्रमांक 

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचा दौरा

नांदेड दि. 4 ऑगस्ट :- राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

बुधवार 5 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर विमानतळ येथून विमानाने नांदेड विमानतळ येथे दुपारी 12 वा. आगमन व मोटारीने सप्तगिरी बॅक्वेट हॉल नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. राखीव. दुपारी 1 वा. नांदेड जिल्हा शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मतदारसंघनिहाय आढवा बैठक स्थळ- सप्तगिरी बॅक्वेट हॉल कौठा नांदेड. 

दुपारी 3 वा. नांदेड जिल्हा उद्योग विभाग व म.औ.वि.म.आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड. दुपारी 4 वा. नांदेड जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनासमवेत संवाद. स्थळ- उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड. सायं. 5 वा. मराठी भाषा विभाग आढावा व साहित्यिकांसमवेत संवाद. स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह नांदेड. सायं. 6 वा. पत्रकार परिषदेस उपस्थिती.  स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह नांदेड. सायं. 6.30 नांदेड येथून मोटारीने नांदेड विमातळाकडे प्रयाण. सायं. 7 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण करतील. 

00000

वृत्त क्रमांक 

शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा  

राज्य पुरस्कृत योजनेतून अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 4 ऑगस्ट :  राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि क्षमता उंचावण्यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2026-27 ही योजना राबविण्यात येत आहे. परदेश अभ्यास दौऱ्याकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी आपले अर्ज व प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधून सादर करावेत.

शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर/शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबीची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी कृषी विभागाकडून राज्य पुरस्कृत योजना 2026-27 राबविण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 5 शेतकऱ्यांची निवड होणार असून यात महिला शेतकरी 1,  केंद्र, राज्य कृषि पुरस्कार प्राप्त / पिकस्पर्धा विजेता शेतकरी 1, इतर सर्वसाधारण शेतकरी 3 याप्रमाणे एकुण 5 लक्षांक आहे.

नांदेड तालुक्यातील जास्तीत जास्त इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधून आपल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, तालुक्यातील शेतक-यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे अवाहन तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल  यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, नांदेड  कार्यालयाशी संपर्क साधावा

00000

वृत्त क्रमांक 

शासकीय तंत्रनिकेतन येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड, दि. 4 ऑगस्ट : शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम संस्थेच्या प्रांगणात 30 जूलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाची जागरुकता निर्माण व्हावी, तसेच संस्थेच्या परिसरात एक निसर्गरम्य व पर्यावरण पूरक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने प्रेरित होऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांच्या हस्ते झाले, त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचे महत्व स्पष्ट केले. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून हरित व समृध्द भारताच्या निर्मितीसाठी वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करुन अशा उपक्रमांमधून सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले. वृक्षारोपण समिती सचिव व्ही.बी. उश्केवार यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्व स्पष्ट करुन प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात शिव सुराणा, अनिल मुद्दमवार, सुशील जैन, बलवीर ठाकूर, शंकर मेडेवाड, भारत देशमुख व संजय शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने आपला सहभाग नोंदविला. संस्थेच्या परिसरात कडुलिंब, करंज या प्रकारची रोपे लावण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मोहित मेश्राम व सर्व समिती सदस्य सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. सर्वाच्या संयुक्त प्रयत्नातून महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण करणारा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रेरणादायी ठरला.

00000

वृत्त क्रमांक 

शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती करावी 

- जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे

नांदेड, दि. 4 ऑगस्ट : पंचायत समिती सभागृह, कंधार येथे अति प्रभावित मेघा पाणलोट क्षेत्र संस्थेच्या पुढाकारातून रेशीम शेती विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे होते.

कार्यक्रमात जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, मेघा पाणलोट प्रकल्पाचे समन्वयक दिनेश खडसे, एसबीआय आरसेटीचे आशिष राऊत, अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके तसेच मनरेगाचे सर्व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला.

अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांनी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वीकार करून स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी सांगितले की, पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम शेती अधिक फायदेशीर असून त्यामध्ये वारंवार लागवडीचा खर्च करावा लागत नाही. कमी अथवा अधिक पाऊस पडला तरी या शेतीवर त्याचा तुलनेने कमी परिणाम होतो. सध्या रेशीम कोषाला प्रतिक्विंटल सुमारे ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

रेशीम शेतीमुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो. अळ्यांनी खाऊन उरलेला तुतीचा पाला हा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयुक्त ठरतो. तसेच या व्यवसायात पती-पत्नी दोघांचाही सहभाग असल्याने कुटुंबातील समन्वय वाढतो आणि वाढीव उत्पन्नामुळे समाजात आर्थिक विश्वासार्हताही निर्माण होते. त्यामुळे “शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती” प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश खडसे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोनकांबळे, लोभाजी मुळे, सतीश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000






वृत्त क्रमांक 

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 11 ऑगस्ट रोजी पेन्शन अदालत 

नांदेड दि. 4 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

जिल्ह्यातील 5 पात्र शेतकऱ्यांना मिळणार देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याची संधी

शासनाकडून मिळणार 50 टक्के अनुदान  

नांदेड दि. 4 ऑगस्ट :- राज्यातील शेतकऱ्यांना जगभरातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी समजून घेता यावी आणि शेतमाल निर्यातीला चालना मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने देशाबाहेरील अभ्यास दौरा योजना 2026-27 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 5 पात्र शेतकऱ्यांना परदेशात जाऊन प्रगत शेतीचे धडे गिरवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. परदेश अभ्यास दौरा योजना 2026-27 साठी युरोप व चीन या देशाची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांना गुरूवार 20 ऑगस्ट 2026 पर्यंत सायं 5 वा. पर्यंत आपले अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले आहे. 

अशी असेल वर्गवारी

महिला शेतकरी 1 जागा. कृषी पुरस्कार प्राप्त / पीक स्पर्धा - 1 जागा. इतर सर्वसाधारण शेतकरी- 3 जागा याप्रमाणे एकूण 5 शेतकरी असतील.

पात्रतेचे निकष

शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. अर्ज सादर करतेवेळी पारपत्राची वैध मुदत किमान एक वर्ष असावी. अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटंट), अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी.

शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. यासाठी सदर योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषी आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7-10 दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारिरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील.

शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु. २.०० लाख (रुपये एक लाख फक्त) यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज गुरूवार 20 ऑगस्ट पर्यंत सायं 5 वा. पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयात करावा. यासाठी इच्छुकांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडतीद्वारे पात्र प्रस्तावातून निवड यादी तयार करण्यात येईल तसेच ज्येष्ठता क्रमवारीनुसार प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. जिल्हास्तरीय समिती समोर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात येथे सोडत होईल सोडत 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता होईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000


 

#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सहाय्यक निबंधकांना देण्यात आल्या आहेत.

योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक काढून आपले आधार प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण श्री. प्रकाश जगताप यांनी केले आहे.

राज्यात एकाचवेळी झालेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून जलसंधारण...